एकवीस दिवसानंतरही ‘मयुरी’चा शोध लागेना; वनकर्मचाऱ्यांची उडाली झोप

जितेंद्र सहारे 
Monday, 16 November 2020

यातील एका बछड्याचा मृत्यू झाला. दोन बछड्‌यांवर उपचार सुरू आहेत. वनविभाग गेल्या एकवीस दिवसांपासून त्या वाघिणीचा शोध घेत आहे. मात्र, तिचा काहीच पत्ता लागला नाही. त्यामुळे वनकर्मचाऱ्यांची झोप उडाली आहे.

चिमूर (जि. चंद्रपूर) : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या खडसंगी बफर वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ५३ मधील भुयारदेव, जोगामोगा जंगल परिसरात गेल्या २७ ऑक्‍टोबरला वाघिणीचे तीन बछडे त्यांच्या आईपासून भरकटलेले आढळून आले होते.

यातील एका बछड्याचा मृत्यू झाला. दोन बछड्‌यांवर उपचार सुरू आहेत. वनविभाग गेल्या एकवीस दिवसांपासून त्या वाघिणीचा शोध घेत आहे. मात्र, तिचा काहीच पत्ता लागला नाही. त्यामुळे वनकर्मचाऱ्यांची झोप उडाली आहे. दिवाळीनंतर शोध मोहिमेस गती येणार आहे.
भरकटलेली वाघीण मयुरी या नावाने ओळखली जाते.

अधिक वाचा - पदवीधर मतदारसंघ निवडणूक: रिंगणात होते दोन अभिजीत वंजारी; पात्र ठरले एकच

तिच्या दोन बछड्यांवर चंद्रपूर येथे प्राथमिक उपचार केंद्रात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. दुसरीकडे आपल्या बछड्यांपासून भरकटलेल्या वाघिणीचा वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी जंगलात दिवसरात्र शोध घेत आहेत.

खडसंगी बफर, तळोधी, निमढेला, खडसंगी प्रादेशिक तथा शेतशिवार असा अंदाजे हजार किलोमीटर जंगल परिसर पिंजून काढला आहे. मात्र, मयुरी अद्यापही त्यांना सापडली नाही. शोधमोहिमेने वनकर्मचारीही थकले आहेत. बछड्यांपासून दूर असलेली वाघीण आक्रमक होते. अशा परिस्थितीत ती शिवारात किंवा गावात येऊ

शकते. मात्र, तसे काहीही झालेले नाही. वाघिणीसोबत घातपात तर झाला नसेल, अशी चिंता वन्यजीवप्रेमींकडून वर्तवली जात आहे. वाघीण बछडे असलेल्या परिसरात आली नाही किंवा कॅमेऱ्यात कैद झाली नाही. त्यामुळे वनविभागाच्या चितेंत वाढ झाली आहे. दिवाळी असल्याने अनेक अधिकारी व कर्मचारी सुटीवर आहेत. त्यामुळे दिवाळीनंतर शोधमोहिमेला गती येणार असल्याची माहिती आहे.

अधिक माहितीसाठी - बालविवाह झालेल्या वृद्ध दाम्पत्याचा पुनर्विवाह; मोठा मुलगा वडिलांचा, तर लहान मुलगा आईचा पालक​

बफर, प्रादेशिकचे कर्मचारी घेत आहेत शोध

वाघिणीचा शोध घेण्यासाठी एसटीपीएफ चिमूर, मूल, प्रोटेक्‍शन टीम चंद्रपूर व बफर झोन खडसंगीचे अधिकारी, कर्मचारी यांची चमू तयार करण्यात आली आहे. भुयारदेव, जोगमोगा, तळोधी या जंगलात या टीमने हजार- बाराशे किलोमीटर जंगल, शेतशिवारात वाघिणीचा शोध घेतला. मात्र, तिचा कुठेही पत्ता लागला नाही. त्यामुळे आता बफर खडसंगी व प्रादेशिक चिमूरचे वनकर्मचारी गावशिवारात वाघिणीचा शोध घेत आहेत. विशेष म्हणजे, वनविभागाने या परिसरात ट्रॅप कॅमेरेही लावले आहेत. मात्र, त्यातही तिच्या हालचाली दिसून आल्या नाहीत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mayuri tiger still not found by forest officers