#SundaySpecial : पेशन्स और इमोशन्स क्‍या हैं अब पता चला

मोना मेश्राम
मोना मेश्राम

नागपूर : सकाळी उठणे, सरावाला जाणे, तयारी करणे, स्पर्धा, ऑफिस आणि इतर कामे असा अनेक वर्षांचा नित्यक्रम ठरला असताना कोरोना व लॉकडाउनमुळे त्यास करकचून ब्रेक लागला. त्यामुळे काही दिवस अनेकांना काहीच सुचेनासे झाले होते.

एक-दोन महिन्यानंतर गाडी पुन्हा रुळावर येऊन वेगाने पळायला लागेल, असेच विचार मनात येत होते. मात्र, गंभीरता वाढायला लागल्यावर गाडी बराच काळ जागेवरच उभी राहणार हे लक्षात आले. त्यामुळे भविष्यात गाडी वेगाने पळायला हवी असेल, तर आपण सज्ज असायला हवे, हा विचार करून क्रिकेटपटू मोना मेश्रामनेही प्रथम घरीच सरावाला सुरवात केली. मानसिकता उत्तम राहावी यासाठी आतापर्यंत न केलेल्या काही गोष्टी करून पाहण्याचा प्रयत्न केला. त्यात ती यशस्वीही ठरली. या संपूर्ण काळात संयम कसा ठेवावा व भावनेवर कसे नियंत्रण ठेवावे, हे दोन महत्त्वाचे मुद्दे मी शिकले. आपल्यापैकी अनेकांना जीवनातील या दोन मुद्‌द्‌यांना जवळून अनुभवताही आले असेल, असे म्हणायला हरकत नाही.

इंग्लंडमध्ये 2017 मध्ये झालेल्या महिला विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत उपविजेतेपद मिळविणाऱ्या भारतीय संघाची मोना मेश्राम सदस्य होती. त्याचप्रमाणे देशांतर्गत स्पर्धेत ती रेल्वे आणि विदर्भाकडून खेळते. कोरोनाच्या चार महिन्यांतील अनुभवाविषयी मोनाने आपली मते मांडली. कोरोनाचा भारतात चंचुप्रवेश झाला, त्यावेळी फार काही माहिती नव्हते. एक-दोन महिन्यात यातून बाहेर पडू, असेच विचार मनात येत होते. मात्र, हळूहळू गंभीरता जाणवू लागल्यावर काही दिवसांतच मानसिकतेवर परिणाम होऊ लागला. मैदानावरील सराव बंद झाला होता. त्यामुळे घरीच शारीरिक तंदुरुस्तीचा सराव सुरू केला. शारीरिक तंदुरुस्तीचा सराव ठीक होता. मात्र, मानसिकता अजूनही ताळ्यावर येत नव्हती. त्यामुळे मग आतापर्यंत न केलेल्या आवडीच्या कुकिंगकडे मोर्चा वळविला. बऱ्यांच गोष्टी शिकले. विशेषतः आवडते असे चांगल्या प्रकारे सॅंडविच करायला शिकले. फावल्या वेळेत घरातील कामे काढून ती करणे हा उपद्‌व्याप केला. त्यामुळे वेळ कसा निघून जात होता, हे कळलेच नाही. सराव, स्पर्धा यामुळे परिवारासोबत खूप वेळ देता येत नव्हता. तो या चार महिन्यांत देता आला. या काही सकारात्मक बाजू असल्या तरी काही नकारात्मक बाजूही आहेत, हे मान्य करायला पाहिजे.

क्रिकेट खूप मिस केले

खेळाडू म्हटले की, खेळ त्याचा जीव की प्राण असतो. क्रिकेट मोनासाठी सर्व काही आहे. कोरोनाचा प्रवेश झाला आणि लॉकडाउन लागले, त्याचवेळी महिलांच्या एकदिवसीय राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन होणार होते. मात्र, परिस्थिती बिकट झाल्याने स्पर्धा रद्द करण्यात आली. त्यामुळे इतर खेळाडूंप्रमाणे मोनाही निराश झाली. स्पर्धा रद्द, त्यानंतर सराव बंद झाल्याने काहीतरी चुकल्यासारखे वाटू लागले. मध्य रेल्वेत कार्यरत असलेली मोना म्हणते, या चार महिन्यांच्या काळात क्रिकेटला सर्वाधिक मिस केले. एकतर रेल्वेचा संघ पुन्हा एकदा विजेतेपदाचा दावेदार होता. त्यामुळे विजेतेपदाचा आनंद हिरावल्या गेला आणि एक संधीही गेली.

कोरोनाने विचार करण्यास बाध्य केले

जीवनाविषयी इतका विचार कधी केला नव्हता. असा विचार गेल्या चार महिन्यांत केला. या काळात जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला. कोरोनाने संघर्ष करून जगणे शिकविले. यापूर्वी ज्या गोष्टी सहजपणे होत होत्या. ज्यासाठी अनेक जण सहकार्य करत होते. त्याच घटनेसाठी या काळात संघर्ष करावा लागला. माझ्या मैत्रिणीचे वडील आजारी पडले, तर त्यांना दवाखान्यात नेण्यासाठी जी धडपड करावी लागली आणि जो अनुभव आला, तो फारच वेदनादायी होता. त्यामुळे जीवन किती महत्त्वाचे आहे आणि आपले जीवन आपल्यालाच सांभाळायचे आहे, हे महत्त्व पटवून दिले. दुर्दैवाने अजूनही अनेक नागरिकांना या मुद्‌द्‌याचे महत्त्व पटलेले दिसत नाही. त्यामुळे नियमांची कडक अंमलबजावणी होणे आवश्‍यक आहे आणि त्यासाठी प्रत्येक नागरिकाने सहकार्य करणे अपेक्षित आहे. नातेवाइकांकडे जावे, मित्र-मैत्रिणीला भेटावे, मज्जा करावी, बाहेर फिरायला जावे, असे मलाही वाटते. मात्र, मी माझ्या पेशन्सला रोखून धरले आणि इमोशन्सवर नियंत्रण मिळविले. त्यामुळेच इच्छा असूनही या कठीणसमयी फारशी कुठे गेली नाही. अखेर जीवन हे सुंदर आहे. तेच नसेल, तर काय फायदा. त्यामुळे या अप्रिय काळात आपल्या पेशन्सला रोखा व इमोशन्सवर नियंत्रण ठेवा आणि जीवन आनंदी करा.

संपादन - नरेश शेळके  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com