वणी शहरात पेट्रोल चोरी करणारी टोळी सक्रिय; तरुणाई वाममार्गाला लागण्याची भीती 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 15 February 2021

दोन दिवसांपूर्वी एकता नगर परिसरात एका समारोहात वर्धा येथून आलेल्या पाहुण्यांच्या दुचाकीतील टाकीची नळी कापून पेट्रोल लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला. पेट्रोलची घोडदौड शंभरीकडे होत असताना पेट्रोल लंपास करणारी युवा टोळी सक्रिय होत आहे. या प्रकारामुळे तरुणाई वाममार्गाला तर लागणार नाही ना, अशी भीती निर्माण झाली आहे.

वणी (जि. यवतमाळ)  : एकीकडे पेट्रोलचे दर शंभरीत पोहचताच वाहनांतून पेट्रोल चोरी करणारी टोळी सक्रिय झाल्याचे दिसत आहे. शहरातील मंगल कार्यालये व घरासमोर उभ्या ठेवण्यात आलेल्या दुचाकीतील पेट्रोलला गळती लागल्याचा प्रकार उजेडात येत आहे.

दोन दिवसांपूर्वी एकता नगर परिसरात एका समारोहात वर्धा येथून आलेल्या पाहुण्यांच्या दुचाकीतील टाकीची नळी कापून पेट्रोल लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला. पेट्रोलची घोडदौड शंभरीकडे होत असताना पेट्रोल लंपास करणारी युवा टोळी सक्रिय होत आहे. या प्रकारामुळे तरुणाई वाममार्गाला तर लागणार नाही ना, अशी भीती निर्माण झाली आहे.

हेही वाचा - मोठ्या ठिपकेदार गरुडाची अमरावतीच्या आकाशाला गवसणी,...

शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिकवणी वर्ग व अन्य ठिकाणी भ्रमण करण्यास पालकांनी महागडी वाहने घेऊन दिली आहेत. तरुण आपल्या दुचाकीचा वापर शैक्षणिक कामासाठीच करतो की अन्यत्र फेरफटका मारतो याकडे पालकवर्ग लक्ष देताना दिसत नाही. पाल्यांना घरातून मिळणारा पाकीट खर्च अल्पसा असल्याने आपले इतर शौक पूर्णत्वास नेताना अनेकजण नकळत वाम मार्गाकडे ढकलल्या जात आहेत.

शहरातील शाळा, महाविद्यालये व शिकवणी वर्गाचा परिसर, वडगाव रोड, नांदेपेरा रोड, विवेकानंद व जनता शाळा परिसर, वरोरा मार्गावरील बाजार समिती परिसर, 7 नंबर शाळेजवळ, निलगिरी बन आदि ठिकाणी तरुणांचा घोळका सदैव भ्रमण करताना दृष्टिपथास पडतो. भरधाव वाहने हाकणे तसेच धूम स्टाइल रपेट नित्याचीच झाल्याने युवकांना आपल्या दुचाकीत टाकण्यास पेट्रोलची गरज भासते आणि त्याची पूर्तता करण्यासाठी पेट्रोल चोरीचा हतखंडा तर वापरण्यात येत नाही ना, हे तपासणे गरजेचे झाले आहे.

हेही वाचा - रात्री गस्त घालत होते पोलिस; मैदानात अंधारात चमकली वस्तू आणि झाला भांडाफोड

शहरात घरासमोर उभ्या ठेवण्यात आलेल्या दुचाकीतील रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत पेट्रोल लंपास केल्या जात असल्याच्या घटनांत वाढ झाली आहे. परंतु या बाबत दुचाकीधारक ऊहापोह करीत नाहीत. तसेच तक्रारसुद्धा होत नसल्याने पेट्रोल चोरट्यांचे फावत आहे. एकता नगर परिसरात पाच-सहा दुचाकीतील पेट्रोल लंपास झाल्याने पेट्रोल चोरी करणारी युवा टोळी सक्रिय झाल्याचे वास्तव नाकारता येत नाही.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: men thefting Petrol in wani