बांबूच्या राख्यांनी आमदार प्रतिभा धानोरकर भारावल्या; सकाळच्या यशोगाथेनंतर मीनाक्षी वाळके यांच्या घरी दिली भेट...

MLA Pratibha Dhanorkar visited Minakshi Walke home after seeing her Bamboo Rakhi
MLA Pratibha Dhanorkar visited Minakshi Walke home after seeing her Bamboo Rakhi

चंद्रपूर : बंगाली कॅम्प परिसरातील मीनाक्षी मुकेश वाळके या महिलेने पर्यावरणपूरक बांबूच्या राख्या तयार केल्या आहेत. या राख्यांना देशभरातून मागणी होत आहे. याबाबतची यशोगाथा सकाळमध्ये प्रकाशित झाली. त्यानंतर वरोऱ्याच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी शनिवारी (ता. २५) वाळके यांची घरी जाऊन भेट घेतली. अचानकपणे आमदार घरी पोहोचल्याने वाळके कुटुंबीय अचंबित झाले. यावेळी आमदार धानोरकर यांनी रक्षाबंधन सणासाठी राख्या खरेदी करीत महिला कारागीराचे मनोधैर्य वाढविले.

राख्यांना देशभरातून प्रचंड मागणी 

चार भिंतीत जीवन जगण्यापेक्षा शिक्षणाचा फायदा व्हावा म्हणून मीनाक्षी वाळके या महिलेने बांबूपासून वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर आदिवासी समाजातील महिलांच्या मदतीने घरीच बांबूपासून वस्तू तयार करण्याचे काम सुरू केले. रक्षाबंधनाचा सण तोंडावर असल्याने बांबूपासून पर्यावरणपूरक राख्या बनविण्याचे काम हाती घेतले आहे. या राख्यांना देशातील दिल्ली, झारखंड, जबलपूर, ठाणे, पुणे, मुंबई, गुडगाव आदी शहरांतून मोठी मागणी आहे. आतापर्यंत तब्बल ५ ते ६ हजार राख्यांची विक्रीसुद्धा केली आहे.

जिद्द महत्वाची 

मीनाक्षी वाळके यांनी स्वत: स्वयंरोजगार शोधला. सोबतच शहरापासून काही अंतरावर असलेल्या खेडेगावातील आदिवासी महिलांनासुद्धा रोजगार उपलब्ध करून दिला आहे. जीवनात काहीतरी करण्याची जिद्द मनात बाळगून प्रयत्न केल्यास यश निश्चित येते, हे मीनाक्षी वाळके यांनी दाखवून दिले आहे. हाताला काम नाही. आता पुढे कसे असे म्हणत हातावर हात मारून बसणा-यांसाठी मीनाक्षी वाळके यांनी नवा आदर्श निर्माण केला आहे.

आमदार पोहोचल्या घरी 

सकाळमध्ये यशोगाथा प्रकाशित झाल्यानंतर आमदार प्रतिभा धानोरकर यांनी बंगाली कॅम्प परिसरातील मीनाक्षी वाळके या महिलेचे घर गाठले. बांबूपासून तयार करण्यात येणा-या राख्यांबाबतची माहिती जाणून घेतली. तसेच रक्षाबंधन सणासाठी काही राख्यासुद्धा खरेदी केल्या. आमदार धानोरकर यांच्या भेटीने निश्चितच वाळके कुटुंबीयांचे मनोधैर्य उंचावले आहे.

महिला कारागिरांचे मनोधैर्य वाढविण्याचा उद्देश
मीनाक्षी वाळके यांनी बांबूपासून पर्यावरणपूरक राख्या तयार केल्या आहेत. महिला कारागिरांचे मनोधैर्य वाढविण्याच्या उद्देशातून एक महिला आमदार म्हणून भेट देऊन राख्यांची खरेदी केली आहे.
- प्रतिभा धानोरकर, 
आमदार, वरोरा

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com