Video : हट्ट करून मोबाईल विकत घेतला खरा, पण...

नीलेश झाडे-सीताराम मडावी
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या जिवती तालुक्‍यातील अनेक गावांत आजही मूलभूत सुविधांचा अभाव आहे. लखमापूर गावातील नागरिकांनी मोबाईल विकत घेतले खरे, पण गावात वीजच पोहोचली नसल्याने नागरिकांना तीन किमी अंतरावर जाऊन मोबाईल चार्ज करावा लागत आहे. त्यामुळे हेच का स्मार्ट व्हिलेज, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 

जिवती (जि. चंद्रपूर) : सरकारने स्मार्ट व्हिलेजची संकल्पना मांडली आहे. मात्र, राज्यातील आजही अनेक गावे आजही अंधार पांघरून बसली आहे. असेच एक गाव आहे लखमापूर... या गावातील युवकांनी हट्ट करून, मजुरी करून मोबाईल विकत घेतला पण गावात अद्याप वीज पोहोचलेली नाही. मोबाईल चार्ज करण्यासाठी त्यांना तीन कि.मी.चे अंतर कापावे लागत आहे. हे गाव चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटचा टोकावर असलेल्या जिवती तालुक्‍यात आहे. 

चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या जिवती तालुक्‍यातील अनेक गावांत आजही मूलभूत सुविधांचा अभाव आहे. राजुरा विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या भारी ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लखमापूर या आदिवासीबहुल गावात अद्यापही वीज पोहोचलेली नाही. लखमापूर गावात 16 कुटुंब वास्तव्य करतात. गावाची लोकसंख्या 150च्या आसपास आहे. गावात मोबाईल पोहोचला आहे. मात्र वीज पोहोचली नाही. 

काय आहे या लिंकमध्ये? - हॅलोऽऽ हॅलोऽऽ, तुकाराम मुंढे यांच्या तावडीतून कसे सुटायचे, सांगता का?

मोबाईल चार्ज करण्यासाठी लखमापूर गावापासून तीन कि.मी.अंतरावर असलेल्या येरवा गावाला मोबाईल धारकांना प्रवास करावा लागतो. ओळखीच्या व्यक्तीकडे मोबाईल देऊन ते परत गावाला येतात. ओळखीचा इसम रात्रभर मोबाईल चार्ज करून ठेवतो. चार्ज झालेला मोबाईल आणण्यासाठी दुसऱ्या दिवशी तीन कि.मी.चे अंतर कापावे लागते. सरकारने "स्मार्ट व्हिलेज' ही संकल्पना पुढे आणली आहे. मात्र, लखमापूर सारखे गावे आजही स्वतःचा स्मार्टपणा हरवून बसली आहेत. 

दिव्याखाली अंधार

लखमापूर गावातील विद्यार्थी शालेय शिक्षण घेत आहेत. या मुलांना केरोसीनच्या दिव्याखाली अभ्यास करावा लागतो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अशाप्रकारे अंधारात शिक्षणाचे धडे गिरवावे लागावे ही मोठी शोकांतिका आहे. स्मार्ट व्हिलेजची जाहिरात करणाऱ्या सरकारला दिव्याखालील अंधार केव्हा दिसणार, असा प्रश्‍न गावकऱ्यांनी उपस्थित केला. 

वीज खांब कोलमळले

लखमापूर गावात वीजपुरवठा करण्यासाठी दहा वर्षांपूर्वी विद्युत खांब उभे करण्यात आले. आज मात्र विद्युत खांब कोलमडून पडले आहे. तारा तुटल्या आहेत. नव्याने विद्युत पुरवठा करण्यासाठी वीज खांब उभे करावे अशी मागणी आदिवासी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष कंटू कोटनाके यांनी केली आहे. 

अधिक माहितीसाठी - मुख्याध्यापिका पत्नी करायची मारहाण, अपमान असह्य झाल्याने पतीचा राग झाला अनावर...

नव्या पिढीला उजेड द्या!

माझ्या जन्मापूर्वीपासून गावात वीज नाही. एकदा नव्हे तर तीनदा सर्व्हेक्षण होऊन काहीच झाले नाही. अनेक वेळा अर्ज करूनही गावात वीज आली नाही. माझ्या जीवनात मी अंधारच बघितला. मात्र, नव्या पिढीला तरी प्रकाश मिळावा ही अपेक्षा आहे. अशी भावना भीमराव वेडमे, चिंन्नू कोटनाके, जागेराव कोटनाके, रघुनाथ कोटनाके, देवराव कोटनाके, गुणवंत कुमरे, पोट्टी कोटनाके, चांदशह आडे, राजू वेडमे, सुरेख कोटनाके, जंगूबाई कोटनाके, जनाबाई कोटनाके, राधाबाई वेडमे, लिंगुबाई आडे, रूपाबाई कोटनाके यांनी बोलून दाखविल्या. 

नवीन लाइन प्रस्तावित 
लखमापूर गावात विद्युत पुरवठ्यासाठी विद्युत खांब उभे करण्यात आले. परंतु, पहाड व जंगलातून विद्युत लाइन गेल्याने अनेक पोल पडलेले व वाकलेले आहेत. त्यामुळे विद्युत पुरवठा करणे शक्‍य नाही. येरवा ते लखमापूर अशी नवीन लाइन प्रस्तावित आहे. त्या कामाची निविदा टाकली आहे. लवकरच येरवा ते लखमापूर अशी लाइन टाकून विद्युत पुरवठा सुरू केला जाईल. 
- एम. टी. राठोड, 
उपकार्यकारी अभियंता, जिवती, जि. चंद्रपूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mobile reached village in Chandrapur district but no electricity