मॉन्सूनची यंदाही विदर्भावर मेहरबानी; चार जिल्ह्यांमध्ये स्थिती चिंताजनक

नरेंद्र चोरे
Friday, 2 October 2020

विदर्भात १ जून ते ३० सप्टेंबर या चार महिन्यात सरासरी ९४३ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा ८५२ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली, जो सरासरीइतका पाऊस मानला जात आहे. विदर्भात अकोला (- २७ टक्के), यवतमाळ (-२४ टक्के), अमरावती (-२० टक्के) आणि चंद्रपूर (-१८ टक्के) हे चार जिल्ह्यांचा अपवाद वगळता सर्व जिल्ह्यांनी सरासरी गाठली. 

नागपूर  : विदर्भातून निरोप घेण्याच्या तयारीत असलेल्या मॉन्सूनने यंदाही विदर्भावर मेहरबानी केली आहे. मॉन्सूनने दमदार हजेरी लावत प्रादेशिक हवामान विभागाचा अंदाज शंभर टक्के खरा ठरविला.

हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विदर्भात १ जून ते ३० सप्टेंबर या चार महिन्यात सरासरी ९४३ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा ८५२ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली, जो सरासरीइतका पाऊस मानला जात आहे. विदर्भात अकोला (- २७ टक्के), यवतमाळ (-२४ टक्के), अमरावती (-२० टक्के) आणि चंद्रपूर (-१८ टक्के) हे चार जिल्ह्यांचा अपवाद वगळता सर्व जिल्ह्यांनी सरासरी गाठली. 

सविस्तर वाचा - अचानक का कमी झाली कोरोना बाधितांची संख्या? अतिशय धक्कादायक कारण आले समोर
 

सर्वाधिक १६ टक्के पाऊस वाशीममध्ये झाला. नागपूर जिल्ह्यातही पावसाने सरासरी गाठली. २०१५ पासूनचा इतिहास बघितल्यास यंदा तिसऱ्यांदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. २०१५ मध्ये ८४८ मिलिमीटर, २०१६ मध्ये १०४४ मिलिमीटर, २०१७ मध्ये ७३१ मिलिमीटर, २०१८ मध्ये ८७५ मिलिमीटर आणि गतवर्षी सर्वाधिक १०५४ पावसाची नोंद करण्यात आली. मागील चार महिन्यांत नागपुरात सर्वाधिक पाऊस (४०७ मिलिमीटर) जुलै महिन्यात कोसळला. तर गोंदियामध्ये ७०९ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. दमदार पावसामुळे भूजल पातळीत वाढ झाली असून, विदर्भातील तलावही काठोकाठ भरले आहेत. त्यामुळे यावर्षीच्या उन्हाळ्यातही पिण्याच्या पाण्याची समस्या सुटणार आहे.

सलग दुसऱ्या वर्षात जास्त पाऊस

भारतीय हवामान विभागाने यंदा संपूर्ण देशात सरासरी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. तो अंदाजही तंतोतंत खरा ठरला. लागोपाठ दुसऱ्या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद करण्यात आली. देशात यावर्षी १०९ टक्के पाऊस पडला. १९५८ नंतर सलग दोन वर्षे अधिक पाऊस पडण्याची गेल्या ६२ वर्षांतील ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी १९५८ मध्ये ११० टक्के व त्यानंतरच्या वर्षी ११४ टक्के पावसाची नोंद झाली होती.

 

विदर्भात यंदाचा पाऊस (मिलिमीटरमध्ये)

जिल्हा सरासरी पाऊस प्रत्यक्ष पाऊस तूट/अधिक

 • नागपूर ९२० मिमी ९८५ मिमी +७
 • वर्धा ८७४ मिमी ८०७ मिमी -८
 • अमरावती ८६२ मिमी ६९३ मिमी -२०
 • भंडारा ११५७ मिमी ११०७ मिमी -४
 • गोंदिया ११२० मिमी ११२० मिमी -८
 • अकोला ६९३ मिमी ५०४ मिमी -२७
 • वाशीम ७८९ मिमी ९१२ मिमी +१६
 • बुलडाणा ६५९ मिमी ६९३ मिमी +५
 • यवतमाळ ८०५ मिमी ६१३ मिमी -२४
 • चंद्रपूर १०८३ मिमी ८८८ मिमी -१८
 • गडचिरोली १२५४ मिमी ११५५ मिमी -८

संपादन  : अतुल मांगे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Monsoon favors Vidarbha this year too, Meteorological Department forecast correct