आणखी एका पट्टेदार वाघाचा मृतदेह आढळला; सिपना वन्यजीव विभागाच्या माडीझडप येथील घटना

संतोष ताकपिरे 
Friday, 22 January 2021

वाघाचे शरीर अबाधित असून 18 नखे, 4 सुळे, सर्व मिशा व कातडी आहे. शिवाय वाघाच्या शरीरावर कुठल्याही प्रकारची जखम किंवा ओरबडल्याची खूण नाही. या मृत वाघाच्या ठिकाणापासून साडेतीन किलोमीटर अंतरावर माडीझडप गाव आहे.

अमरावती ः सीपना वन्यजीव विभागातील रायपूर वनपरिक्षेत्रात बुधवारी (ता. 20) एक पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळला. मेळघाट वनगुन्हे अन्वेषण विभागाच्या चमूसह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

परतवाडा वनविभागांतर्गत माडीझडप बीटमधील 271 कपार्टमेंटमध्ये वाघ मृतावस्थेत आढळला. या वाघाचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला असून अंदाजे सहा ते सात वर्षे वयोगटातील हा वाघ असावा, असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

हेही वाचा - चक्क पोलिस आयुक्तांच्याच नावाने उघडले बनावट फेसबुक अकाउंट, अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट...

वाघाचे शरीर अबाधित असून 18 नखे, 4 सुळे, सर्व मिशा व कातडी आहे. शिवाय वाघाच्या शरीरावर कुठल्याही प्रकारची जखम किंवा ओरबडल्याची खूण नाही. या मृत वाघाच्या ठिकाणापासून साडेतीन किलोमीटर अंतरावर माडीझडप गाव आहे. शिवाय आसपास कुठल्याही प्रकारची विद्युत वाहिनीदेखील नाही. त्यामुळे मृत वाघाची शिकार झाली असल्याचे निदर्शनात आलेले नाही.

परिसरात डॉग युनिटलाही पाचारण करण्यात आले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पशू शल्यचिकित्सकांच्या उपस्थितीत मृत वाघाचे शवविच्छेदन केले. त्यातही वाघाच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही.

नक्की वाचा - वय अडीच वर्ष अन् 'इंडिया बूक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद, गुण ऐकूण तुम्हीही व्हाल...

पाणवठ्यातही विषप्रयोग नाही

वाघाचा मृतदेह आढळला तेथून जवळच दोन मोठे पाणवठे आहेत. तेथील पाण्याची तपासणी केली असता त्यात कुठल्याही प्रकारचा विषप्रयोग केल्याची बाब वनअधिकाऱ्यांच्या निदर्शनात आली नाही. त्यामुळे वनविभागाला शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mortal of Tiger found in Amravati district