वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या तर झाल्या, पण नियुक्त्यांचे काय?

साईनाथ सोनटक्के
Thursday, 29 October 2020

जिल्ह्यात उत्तर वनवृत्त, दक्षिण वनवृत्त, वनविकास महामंडळ असून, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचाही आवाका मोठा आहे. त्यामुळे वनविभागाच्या कनिष्ठांपासून वरिष्ठांपर्यंतची सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे महत्त्वपूर्ण समजली जातात. मात्र, महिनाभरापूर्वी काही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.

चंद्रपूर : शासकीय सेवेत बदली, नियुक्ती या बाबी सेवानिवृत्तीपर्यंत सुरूच असतात. बदलीचे आदेश जारी केल्यानंतर संबंधित ठिकाणी रुजू व्हावे लागते. परंतु, वनविभागातील अनेक अधिकारी रुजूच झालेले नाहीत. त्यामुळे दुसऱ्या अधिकाऱ्यांना प्रभार सांभाळावा लागत असून, त्यांच्या कामाचा व्याप वाढला आहे. परिणामी, कामांवरही मोठा परिणाम झाला आहे.

चंद्रपूर जिल्ह्याला निसर्गाने भरभरून दिले. याठिकाणी मोठ्या प्रमाणात वने असल्याने हा वनविभाग  शासनदरबारी महत्त्वाचा समजला जातो. कामाच्या दृष्टीने सोयीचे व्हावे म्हणून जिल्ह्यातील वनाचे विभाजन केले आहे. जिल्ह्यात उत्तर वनवृत्त, दक्षिण वनवृत्त, वनविकास महामंडळ असून, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचाही आवाका मोठा आहे. त्यामुळे वनविभागाच्या कनिष्ठांपासून वरिष्ठांपर्यंतची सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे महत्त्वपूर्ण समजली जातात. मात्र, महिनाभरापूर्वी काही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. तरीही ते अधिकारी आपल्या ठिकाणी रुजू झालेले नाहीत. त्यामुळे अनेक अधिकाऱ्यांना प्रभारी म्हणून जबाबदारी सांभाळावी लागत आहे. दोन ठिकाणचा कारभार सांभाळताना संबंधित अधिकाऱ्यांची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे.

हेही वाचा - धक्कादायक! एका तपानंतर ‘रामाळा’ तलावात ‘जलपर्णी’ने काढले डोके वर; जलचर प्राणी धोक्यात

वनविभागाच्या एसीएफ जगताप यांची बदली झाली. मात्र, त्यांच्या ठिकाणी अधिकारी रुजू न झाल्याने चिचपल्लीचे राजूरकर यांच्याकडे प्रभार आहे. बल्लारपूर डेपोचे वनसंरक्षक हिंगे सेवानिवृत्त झाले. त्यामुळे येथे नवीन अधिकारी नियुक्त होणे अपेक्षित होते. मात्र, कुणीही अधिकारी रुजू न झाल्याने मध्य चांदा वनविभागाचे उपवनसंरक्षक अरविंद मुंडे यांच्याकडे प्रभार आहे. ताडोबा बफर क्षेत्रातील वनपरिक्षेत्राधिकारी चिडे यांची बदली गोंदिया जिल्ह्यातील देवळी येथे झाली. मात्र, या ठिकाणी अजूनही भद्रावतीच्या वनपरिक्षेत्राधिकारी महेशकर या रुजू न झाल्याने चिडे हे देवळीला रुजू होऊ शकले नाहीत. विभागीय वनाधिकारी (दक्षता) या पदाचा पदभार धोतरे यांच्याकडे आहे. विशेष म्हणजे, धोतरे यांचीसुद्धा बदली झाली आहे. मात्र, ते सुद्धा बदलीच्या ठिकाणी रुजू होऊ शकले नाही.

हेही वाचा - यंदा शासकीय डॉक्टरांची दिवाळी रुग्णांसोबतच, उन्हाळ्यापाठोपाठ दिवाळी सुट्ट्याही रद्द

अधिकाऱ्यांच्या रुजू न होण्याने कामावर परिणाम होत आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने रुजू करून जनतेची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: most of officers of forest department not joined yet in chandrapur