दुसरे ऊर्जामंत्री आले, पण महावितरणचे शंभरावर धोकादायक 'स्पॉट' जैसे थे

चेतन देशमुख
Wednesday, 13 January 2021

महावितरणची यंत्रणा जिल्हाभर पसरली आहे. हजारो किलोमीटरच्या वीजवाहिनीचे जाळे महावितरणचे आहेत. गावे, शहरे, जंगल, नदी-नाल्यांमधून वीजवाहिनी गेल्या आहेत. या सर्व ठिकाणी लक्ष ठेवणे महावितरणच्या आवाक्‍याबाहेर आहे.

यवतमाळ : वीज महावितरण कंपनीची यंत्रणा उघड्यावर व विस्तीर्ण आहे. अशास्थितीत सर्वच ठिकाणी लक्ष ठेवणे महावितरणला शक्‍य नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी धोकादायक स्थिती निर्माण होते. सद्य:स्थितीत जिल्ह्यात शंभरापेक्षा जास्त धोकादायक 'स्पॉट' आहेत. विद्युत निरीक्षक कार्यालयाने हे स्पॉट शोधून काढले आहेत. त्यांची यादी महावितरणला पाठविली असली, तरी यावर फार काही काम झाल्याचे दिसत नाही. 

हेही वाचा - लग्नानंतरच दीड वर्षात झाले पतीचे निधन, तरीही खिचडी शिजविली तिथेच गाठले नगराध्यक्षपद

महावितरणची यंत्रणा जिल्हाभर पसरली आहे. हजारो किलोमीटरच्या वीजवाहिनीचे जाळे महावितरणचे आहेत. गावे, शहरे, जंगल, नदी-नाल्यांमधून वीजवाहिनी गेल्या आहेत. या सर्व ठिकाणी लक्ष ठेवणे महावितरणच्या आवाक्‍याबाहेर आहे. मात्र, वीजवाहिनीमुळे नुकसान व जीवितहानी होऊ नये, याची काळजी घेण्याची जबाबदारीही महावितरणची आहे. दोन्हींकडून येणारा वीजपुरवठा यामुळे अनेक ठिकाणी धोका संभवत आहे. याशिवाय वस्तीत धोकादायक ठिकाणे असतात. जिल्ह्यात अशी किती धोकादायक ठिकाणे आहेत, याची विचारणा तत्कालीन ऊर्जामंत्र्यांनी जनता दरबारात केली होती. ऊर्जामंत्र्यांनीच अशा ठिकाणाची यादी महावितरणला देण्याचे आदेश विद्युत निरीक्षक कार्यालयाला दिले होते. विद्युत निरीक्षक कार्यालयाने सर्वेक्षण करून शंभरावर धोकादायक 'स्पॉट' निश्‍चित केले आहेत. या सर्व ठिकाणांची यादी महावितरणला देऊन त्या ठिकाणी उपाययोजना करण्याचे सांगितले होते. त्यात गर्दीच्या ठिकाणी असलेली विद्युत व्यवस्था, शाळेजवळ असलेले रोहित्रे, दोन ठिकाणांचा वीजपुरवठा असलेली ठिकाणे अशा अनेक ठिकाणांचा समावेश आहे. मात्र, अजूनही जिल्ह्यातील अशा स्पॉटची दुरुस्ती झालेली नाही. अनेक ठिकाणी धोकादायक स्थिती असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता महावितरण या ठिकाणी कधी उपाययोजना करणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा - घरात लक्ष्मी आली म्हणून बाप वाटत होता पेढे, पण एक फोन आला अन् सर्वच संपलं

ऊर्जामंत्र्यांची टर्म संपली -
राज्याचे तत्कालीन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्ह्यातील उपकेंद्रांच्या शुभारंभप्रसंगी आगमन झाले होते. यावेळी त्यांनी जनता दरबार घेतला. त्यात हा मुद्दा उपस्थित झाला. यावर ऊर्जामंत्र्यांनीच आदेश दिल्याने कारवाई होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, तसे झाल्याचे चित्र सध्या तरी दिसत नाही. आदेश देणाऱ्या ऊर्जामंत्र्यांची टर्म संपवून दुसरे ऊर्जामंत्री आले आहेत. मात्र, अजूनही या 'हॉट स्पॉट'वर काम झाल्याचे दिसून येत नाही.

हेही वाचा - बहिण भावाला बोलवायला गेली, खिडकीतून दृश्य बघताच मोठ्यानं किंचाळली

विद्युत सुरक्षा सप्ताह -
जिल्ह्यात 11 ते 17 जानेवारीदरम्यान विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा केला जात आहे. याकाळात अपघात कमी करण्यासंदर्भात उपाययोजना व सुरक्षेच्यादृष्टीने काम केले जाते. मात्र, जिल्ह्यात असलेले धोकादायक ठिकाणे असल्याचे सध्यातरी दिसून येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MSEB dangerous spot still not repair in yavatmal