
कोरोनाचा प्रादुर्भाव भारतामध्ये वाढू नये, याकरिता मार्च महिन्यामध्ये संपूर्ण देशात लॉकडाउन लागू करण्यात आले होते. यामुळे सर्व व्यवसाय बंद होते. त्याकारणाने व्यावसायिक तसेच मजूरवर्गांना या चार ते पाच महिन्यांत घरातच राहावे लागले.
मोर्शी (जि. अमरावती) : कोरोना काळातील नागरिकांकडे थकीत असलेले वीजबिल 50 टक्के तरी भरावे, यासाठी महावितरण कंपनीने आवाहन केले होते. मात्र ग्राहकांनी ते न भरल्याने महावितरणने वीजजोडणी कापायला सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिकांवर आता अंधारात राहण्याची वेळ येणार आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव भारतामध्ये वाढू नये, याकरिता मार्च महिन्यामध्ये संपूर्ण देशात लॉकडाउन लागू करण्यात आले होते. यामुळे सर्व व्यवसाय बंद होते. त्याकारणाने व्यावसायिक तसेच मजूरवर्गांना या चार ते पाच महिन्यांत घरातच राहावे लागले. त्यातच उन्हाळा असल्याने व सर्व कुटुंब घरात असल्याने विजेची उपकरणे जास्तीत जास्त सुरू राहिली, परिणामतः या काळामध्ये विजेच्या बिलाची रक्कम मोठ्या प्रमाणात आली.
हेही वाचा - ‘व्हॅलेंटाईन विक’ने घातला घोळ अन् दोन कुटुंबांमध्ये...
जुलै व ऑगस्टपर्यंत मोलमजुरी न मिळाल्याने नागरिकांजवळ बिलाची रक्कम भरण्याकरिता पैसे नव्हते. त्याकारणाने बिलाची रक्कम वाढतच गेली. शासनाच्या वतीने वाढलेल्या विजेच्या बिलाची रक्कम काही प्रमाणात कमी होईल, अशी अपेक्षा नागरिकांनी केली होती. परंतु शासनातर्फे वीजबिलाची रक्कम कमी करण्यात आलेली नाही.
त्यातच वीजबिलाचा भरणा करावा, अशी मागणी महावितरण कंपनीकडून होत असतानासुद्धा काही नागरिकांनी अजूनपर्यंत वीजबिल भरलेले नाही. निव्वळ मोर्शी तालुक्यातील घरगुती, व्यावसायिक, वाणिज्य असे मिळून पाच हजारांवरील थकबाकी असलेले 5936 ग्राहक असून ही थकबाकी 5.93 कोटींच्या जवळपास आहे. थकीत रक्कम पाहता वीज वितरण कंपनीतर्फे मोर्शी शहरात वीजजोडणी कापणे सुरू केलेले आहे.
आठ फेब्रुवारीला मुख्य बाजारपेठेत व काही भागांत वीज वितरण कंपनीचे अभियंता श्री. देऊळकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ज्या नागरिकांकडे थकीत वीजबिले आहेत त्यांच्या घरातील वीजजोडणी कापणे सुरू केले आहे. त्यामुळे नागरिकांवर अंधारात राहण्याची वेळ आली आहे. या वेळी विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता वरिष्ठांच्या आदेशाने सदर मोहीम राबविण्यात येत असून घरगुती वीजजोडणी धारकांनी किमान पन्नास टक्के रक्कम भरून आपले नुकसान टाळावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
हेही वाचा - "मोदींच्या कानमंत्रावर चालताहेत राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल"
लोकप्रतिनिधींच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष
मागील काही दिवसांपासून कोरोना काळातील वीजबिल महावितरण कंपनीने माफ करावे, यासाठी आंदोलने व मोर्चे काढण्यात आली. मात्र तरीदेखील वीजबिल माफ झाले नाही. त्यातच आता मोर्शी शहरातील थकबाकीदारांची वीजजोडणी कापायला सुरुवात केली आहे. आता यावर लोकप्रतिनिधी काय भूमिका घेतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
संपादन - अथर्व महांकाळ