कोका जंगलातील मृतदेहाची ओळख पटली; मित्रांनीच दारू पाजून केली हत्या, तिघे अटकेत

Murder of a friend by drinking alcohol in Bhandara
Murder of a friend by drinking alcohol in Bhandara

भंडारा : कोकालगतच्या नवेगाव जंगलात एक डिसेंबर रोजी कुजलेल्या अवस्थेत आढळलेल्या मृतदेहाची ओळख अखेर पटली आहे. त्याची दारू पाजून हत्या केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी तीन जणांना कारधा पोलिसांनी अटक केली आहे. दयाराम पुंडलिक टिचकुले (वय ५०, रा. सोमलवाडा, ता. लाखनी) असे मृताचे नाव आहे. योगेश तितिरमारे, संजय काटगाये, नरेंद्र पुडके (तिघेही रा. रेंगेपार कोठा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

दयाराम टिचकुले, योगेश तितिरमारे, संजय काटगाये व नरेंद्र पुडके हे चौघेजण २६ नोव्हेंबर रोजी योगेशच्या मारुती व्हॅनने (एमएच ४०- ए. सी. ४११३) पार्टी करण्याच्या उद्देशाने सकाळी ११च्या सुमारास सोमलवाडा येथून निघाले होते. गावातील काही व्यक्तींनी त्यांना सोबत जाताना पाहिले होते. त्यावरून पोलिसांनी तिघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिस तपासात आरोपी उडवाउडवीची उत्तरे देत होते. परंतु, योगेशच्या बयाणात तफावत आढळून आली. दरम्यान, पोलिसी हिसका दाखवताच आरोपींनी दयाराम टिचकुले यांची हत्या केल्याचे कबूल केले.

एक डिसेंबरला कोका जवळ नवेगाव जंगलात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळला. त्यावरून कारधा पोलिसांनी मृताची ओळख पटविण्यासाठी माध्यमातून त्याचे फोटो प्रकाशित केले. त्यावरून तो सोमलवाडा येथील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले. आरोपींनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही आरोपींनी दयाराम टिचकुले यांना सोबत घेऊन अत्याधिक दारू पाजली. त्यानंतर त्याला सौंदडजवळील धाब्यावर जेवणाकरिता घेऊन गेले. परंतु, दयाराम हे अत्याधिक दारू प्याली असल्याने त्यांनी जेवण केले नाही. वाहनातच झोपून राहिले.

आरोपींनी साकोलीवरून एकोडी मार्गाने सोनेगाव कोका जंगलाकडे वाहन नेले. तिथे सोन्याच्या अंगठ्या तसेच गोफच्या लालसेने दयारामचा गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याच मार्गाने नवेगाव जंगलात रस्त्याच्या पुलाजवळ थांबून पुलाच्या पायलीत त्याचा मृतदेह टाकला. एवढेच नव्हे, तर दयाराम पूर्णपणे मृत्युमुखी पडला नसावा, म्हणून एका विटेने तोंडावर व नाकावर वार केले. तो मृत झाल्याची खात्री झाल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पुलाखालील पायलीत दयारामचा मृतदेह लपवून ठेवला.

मृत दयारामजवळचे दोन मोबाईल व चप्पल कोका जंगलात फेकून दिली. त्याच्या खिशातील २,८०० रुपये आरोपी संजय काटगाये याने आपल्याजवळ ठेवून घेतले. याप्रकरणी कारधा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करीत तिन्ही आरोपींना अटक केली आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलिस अधिकारी तुकाराम काटे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार दीपक वानखडे, उपनिरीक्षक माधव परशुरामकर,रवींद्र रेवतकर, हवालदार गिरीश बोरकर, विवेक रणदिवे, आकाश सोनुने, श्री. कराडे यांनी केली.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com