लहान भावानेच मित्रांच्या मदतीने केला खून

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 डिसेंबर 2019

आसेगाव पेन येथील नदीपात्रात आढळलेल्या मृतदेहाचा रहस्यमय खुनाचा उलगडा झाला आहे. या प्रकरणी चारही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

वाशीम : रिसोड तालुक्‍यातील आसेगाव पेन येथील नदीपात्रात ता. 6 डिसेंबरला सकाळी संदीप शेषराव बकाल (वय 28) रा. धोडप उगले याचा मृतदेह दुचाकीला बांधलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या खून प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उलगडा केला. तसेच सदरील खून हा मृतकाच्या लहान भावाने मित्रांच्या मदतीने केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे या चारही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणाबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्यावतीने दिलेली माहिती अशी की, रवी संतोष आरू (वय27) रा. रिठद यांनी रिसोड पोलिसांत तक्रार नोंदविली होती की, त्यांचा आतेभाऊ संदीप शेषराव बकाल (वय 28) रा. धोडप उगले हा ता. 27 नोव्हेंबरला दुपारी साडेबाराच्या सुमारास रिठद येथे आला होता. त्यानंतर तो सायंकाळी दुचाकीत पेट्रोल टाकून येणार असल्याचे सांगून निघून गेला होता. 

हेही वाचा - पाइपगण आली अन् वन्यप्राण्यांची पळापळ झाली

आसेगाव पेन नदीपात्रात आढळला होता मृतदेह
बराच वेळ होऊनही तो परत आला नाही. रात्री साडेदहाच्या सुमारास त्याचा फोन स्वीच ऑफ येत होता. ता. तीन डिसेंबरपर्यंत तो आढळून न आल्याने रिसोड पोलिसांत हरविल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर ता. 6 डिसेंबरला आसेगाव पेन नदीपात्रात दुचाकीला बांधून तरुणाचा मृतदेह मिळाल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पाहणी केली असता तो संदीप बकाल हाच होता. 

महत्त्वाची बातमी - बुलडाणा जिल्ह्यात प्रथमच ओपन हार्टसर्जरी

घातपात केल्याची तक्रार
त्याचा कुणीतरी घातपात केल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने तपास जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी, सहाय्यक पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात डॉ. पवन बनसोड, पोलिस निरीक्षक शिवाजी ठाकरे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. तसेच तपासाची दिशा निश्‍चित केली. मात्र, कोणताही सुगावा लागत नव्हता. 

क्लिक करा - केंद्रीय राज्यमंत्र्यांना बसला राज्य शासनाच्या निर्णयाचा फटका

अखेर प्रदीप बकालसह त्याचे मित्र ताब्यात
अखेर बारकाईने तपास केला असता प्रदीप शेषराव बकाल (रा. धोडप) याने मावसभाऊ राहुल इंगोले, संतोष उर्फ गोलू इंगोले, रामप्रसाद इंगोले (सर्व रा. शिरसाळा) यांच्या मदतीने संदीप बकाल यास ठार मारून मृतदेह मोटासयकलसह आसेगाव पेन नदीपात्रात टाकल्याचे सांगितले. अशा माहितीवरून पोलिसांनी चारही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच अटक करण्याची कारवाई सुरू होती. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The murder of a Little brother with the help of friends