नगरपंचायतींच्या निवडणुकांचा बिगूल मार्चमध्ये, विदर्भातील ४३ ठिकाणी रणधुमाळी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 4 February 2021

अमरावती विभागातील १३ नगरपंचायतींचा यामध्ये समावेश आहे, तर विदर्भातील तीन नगरपरिषद व ४३ नगरपंचायतींमध्ये निवडणुका होणार आहेत.

अमरावती : राज्यातील मुदत संपलेल्या नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले असून साधारणतः मार्च महिन्यात सार्वत्रिक निवडणुका होण्याची शक्‍यता आहे. अमरावती विभागातील १३ नगरपंचायतींचा यामध्ये समावेश आहे, तर विदर्भातील तीन नगरपरिषद व ४३ नगरपंचायतींमध्ये निवडणुका होणार आहेत.

हेही वाचा - वर-वधू मंडपात उभे झाले, डोक्यावर अक्षता पडणार इतक्यात काही जण धडकले अन् उडाला थरकाप

विभागातील अमरावती जिल्ह्यातील तिवसा, नांदगावखंडेश्‍वर, भातकुली व धारणी, बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर व मोताळा, यवतमाळ जिल्ह्यातील महागाव, कळंब, झरी, बाभूळगाव, मारेगाव, राळेगाव तर वाशीम जिल्ह्यातील मानोरा या नगरपंचायतींची मुदत नोव्हेंबर २०२० मध्ये संपुष्टात आली होती. कोरोना संक्रमणामुळे या नगरपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. ते बंधन आता हटविण्यात आले असून निवडणूक आयोगाने निवडणुका घेण्याची तयारी सुरू केली आहे. 

हेही वाचा - सात महिलांनी नाकारले चक्क सरपंच पद, 'बाळू'साठी धरला हट्ट

नगरपंचायत व नगरपरिषदांसाठी प्रभागनिहाय मतदारयादी तयार करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले असून १५ जानेवारी २०२१ ची यादी अंतिम मानण्यात येणार आहे. १५ फेब्रुवारीस प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. एक मार्चला अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagarpanchayat election will held in march in amravati division