नागपूर जिल्हा टॉपच, पण नेमका कशात ?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 जानेवारी 2020

डेंगीवर नियंत्रण मिळविण्यात नागपूर शहर सोडून इतर जिल्ह्यांमध्ये आरोग्य विभाग यंत्रणेला यश आल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. मात्र, नागपूर शहरात वर्षभरात 601 तर ग्रामीण भागात 94 असे 695 डेंगीग्रस्त आढळून आले. महापालिकेला डेंगीवर नियंत्रण मिळविण्यात अपयश आले आहे.

नागपूर : स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणारे नागपूर नागरिकांच्या आरोग्याविषयात मात्र पिछाडीवर आहे. दरवर्षी कुठलातरी आजार डोके वर काढतो आणि त्यानंतर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी होते. अस्वच्छता आणि ढिसाळ नियोजनाचे हजारो नागरिक बळी ठरतात. गतवर्षी मलेरियाचे थैमान होते. यावर्षी डेंगीने कहर केला आहे. नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये गतवर्षीपेक्षा अधिक डेंगीग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे. गतवर्षी 1196 रुग्णांची नोंद झाली होती. यावर्षी 1301 रुग्ण आढळून आलेत. यावर्षी उपराजधानी डेंगीग्रस्तांची राजधानी बनली आहे. नागपूर जिल्हा डेंगीमध्ये विभागात टॉपवर असल्याची माहिती पुढे आली आहे.

हे वाचाच - सुरू होेते जाम पे जाम; पळता पळता फुटला घाम

डेंगीवर नियंत्रण मिळविण्यात नागपूर शहर सोडून इतर जिल्ह्यांमध्ये आरोग्य विभाग यंत्रणेला यश आल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. मात्र, नागपूर शहरात वर्षभरात 601 तर ग्रामीण भागात 94 असे 695 डेंगीग्रस्त आढळून आले. महापालिकेला डेंगीवर नियंत्रण मिळविण्यात अपयश आले आहे. तरीदेखील येथील प्रशासन ढिम्म आहे. शहरातील झोपडपट्टी व इतरही भागांत डेंगीच्या डासअळ्यांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत असताना महापालिकेकडून कोणतीही उपाययोजना करण्यात येत नाही. विशेष असे की, कीटकनाशक फवारणीही होत नसल्याची खंत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
आरोग्य विभागाच्या नोंदीनुसार, 1 जानेवारी ते 31 डिसेंबर या कालावधीत 1301 रुग्णांची नोंद झाली. यात नागपूर जिल्ह्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात 465 रुग्णांची नोंद झाली आहे. गोंदिया, वर्धा, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यांत आरोग्य विभागाने डेंगीवर नियंत्रण मिळविले आहे.

विभागात दहा मृत्यू

2018 मध्ये नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये 1196 जणांना डेंगीची लागण झाली होती. यात 11 जण दगावले होते. यावर्षी 1301 डेंगीग्रस्तांची नोंद झाली असून, 10 जणांचा मृत्यू झाला. भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यात प्रत्येकी 10 डेंगीच्या रुग्णांची नोंद झाली. गोंदियातही अवघ्या 31 जणांना, तर वर्धा जिल्ह्यात 72 जणांना डेंगीची लागण झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur District Topch, but exactly what?