कॉंग्रेसच्या अधिवेशनापासून अधिक तीव्र झाली होती स्वातंत्र्य चळवळ; नागपूर अधिवेशनाला तब्बल १०० वर्ष पूर्ण   | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

100 years of Nagpur winter assembly Mahatma Gandhi introduced

२६ डिसेंबर १९२० रोजी नागपुरातील धंतोली परिसरात कॉंग्रेसचे अधिवेशन घेण्यात आले. यानिमित्त महात्मा गांधी विचाराचे गाढे अभ्यासक, माजी मंत्री डॉ. सतीश चतुर्वेदी यांनी येथील अधिवेशनाच्या आठवणींना उजाळा दिला.

कॉंग्रेसच्या अधिवेशनापासून अधिक तीव्र झाली होती स्वातंत्र्य चळवळ; नागपूर अधिवेशनाला तब्बल १०० वर्ष पूर्ण  

नागपूर ः आज २६ डिसेंबर २०२० आजपासून तब्बल शंभर वर्षांपूर्वी नागपूरच्या धंतोलीमध्ये कॉंग्रेसचे अधिवेशन झाले होते याच अधिवेशनात स्वातंत्र्य जळवळीचा पाया रचला गेला होता. आज त्या अधिवेशनाला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या मृत्यूनंतर कॉंग्रेसला नैराश्यातून काढण्यासाठी एका सोहळ्यासोबतच एका नेतृत्वाची गरज होती. २६ डिसेंबर १९२० ला नागपुरात झालेल्या अधिवेशनातून कॉंग्रेसमध्ये स्वातंत्र्य चळवळीसाठी नवचैतन्य आलेच, शिवाय महात्मा गांधी यांच्या रूपात कॉंग्रेसलाच नव्हे तर देशालाही नेतृत्व मिळाले. स्वातंत्र्य आंदोलनात महात्मा गांधी पर्वाचा उदय नागपुरातून झाल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. किंबहुना स्वातंत्र्य चळवळीचा पायाच नागपूर अधिवेशनात मजबूत झाला.

२६ डिसेंबर १९२० रोजी नागपुरातील धंतोली परिसरात कॉंग्रेसचे अधिवेशन घेण्यात आले. यानिमित्त महात्मा गांधी विचाराचे गाढे अभ्यासक, माजी मंत्री डॉ. सतीश चतुर्वेदी यांनी येथील अधिवेशनाच्या आठवणींना उजाळा दिला. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या निधनानंतर स्वातंत्र्य चळवळीत एक पोकळी निर्माण झाली होती. लोकमान्य टिळक यांचे अनुयायी मोठ्या प्रमाणात विदर्भात होते. नेमका हाच धागा पकडून कॉंग्रेसचे अधिवेशन नागपूरला घेण्याचा निर्णय झाला. संपूर्ण देशभरात या अधिवेशनासाठी एक वातावरण तयार करण्यात आले. महात्मा गांधी यांच्यासह मोतीलाल नेहरू, मौलाना अब्दुल कलाम आझाद, बाबू चित्तरंजन दास, सी. राजगोपालचारी, पंडित जवाहरलाल नेहरू, मोहम्मद अली जिना यांच्यासह प्रमुख नेते आले होते. देशातून १४ हजार ५०० प्रतिनिधी आले होते. यात १०५० मुस्लिम, १७० महिलांचाही समावेश होता. परंतु सर्व लक्ष महात्मा गांधी यांच्याकडे लागले होते.

हेही वाचा - "साहब, वो झोपडीमे नही आते, उनकी फोटो लगाके त्यौहार मनाता लेता हू!"   

बंगाल तसेच आसामवरून आलेल्या प्रतिनिधींसह आलेले बाबू चित्तरंजन दास यांनीही विरोध केला. परंतु विदर्भातील टिळक समर्थकांसह असहकार आंदोलनाला विरोध करणाऱ्याची समजूत काढण्यात आली. ते तयार झाल्यानंतर त्यांच्यासोबत असलेले गंगाधर देशपांडे, दादासाहेब खापर्डे, एम. आर. चोळकर यांना इतर लोकांची समजूत काढण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी ती जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली. त्यातूनच नागपूर अधिवेशनात स्वातंत्र्य चळवळीची पुढील दिशा महात्मा गांधी यांच्या नेतृत्त्वात तयार करण्यात आली. विरोध करणारे बाबू चित्तरंजन दास हेही असहकार आंदोलनासाठी पुढे आले. महात्मा गांधी यांनीही स्वातंत्र्य चळवळीसाठी रणशिंग फुंकले. नागपुरातून हा ठराव मंजूर झाल्यानंतर देशभरात असहकार आंदोलनाने पेट घेतला. देशाला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी नागपुरातून दिशा मिळालीच, शिवाय महात्मा गांधी यांच्या नेतृत्त्वावरही शिक्कामोर्तब झाले.

कोलकाता येथे झालेल्या कॉंग्रेस अधिवेशनात इंग्रजांविरुद्ध असहकार आंदोलनाचा प्रस्ताव आला होता. या प्रस्तावाला नागपुरातून दिशा मिळाली. विदेशी कपड्यांचा बहिष्कार, शासकीय नोकरीतील भारतीयांना असहकार करणे, महाविद्यालय तसेच इतर टॅक्स न भरणे, इंग्रजांनी दिलेल्या सर आदी पदव्या परत करणे, इंग्रजांच्या निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार घालणे, अस्पृश्यता नष्ट करणे, वर्षभरात आंदोलनाला वेग देणे आदी प्रस्ताव नागपूर अधिवेशनात मांडण्यात आले अन् ते मंजूर करण्यात आल्याचे डॉ. सतीश चतुर्वेदी यांनी नमूद केले. परंतु विशेषतः असहकार आंदोलनाला लोकमान्य टिळक समर्थकांचा विरोध होता. विदर्भातील मुंजे, खापर्डे यांनीही विरोध केला होता.

असहकार चळवळीचा निर्णय

१९१९ मध्ये जालियनवाला बाग हत्याकांड झाले. रोलेक्ट ॲक्ट लावून नेत्यांची मुस्कटदाबी सुरू झाली होती. त्यामुळे भारतीय जनतेत मोठा संताप निर्माण झाला होता. देशातील जनतेच्या या तीव्र भावना लक्षात घेत महात्मा गांधी यांनी असहकार चळवळीचा निर्णय घेतला. त्यानंतर सप्टेंबर १९२० मध्ये कोलकाता येथे कॉंग्रेसच्या अधिवेशनात हा प्रस्ताव मांडण्यात आला. नागपूर अधिवेशनात या प्रस्तावाला दिशा मिळाली. नागपूरचे अधिवेशन इतिहासाला कलाटणी देणारे ठरले.

इंग्लंडचे संसद सदस्यही उपस्थित

नागपुरात झालेल्या या अधिवेशनाला इंग्लंडमधील लेबर पार्टीचे संसद सदस्यही उपस्थित होते, असेही डॉ. चतुर्वेदी यांनी नमूद केले. ते या अधिवेशनासाठी खास इंग्लंडवरून आले होते. भारतात इंग्लंड सरकार कशाप्रकारे शासन करीत आहे, याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता, हेही एक कारण होते. त्यांनी नागपुरातील या अधिवेशनात भाग घेतला. एकूणच त्यांना येथील परिस्थितीची जाणीव झाली. लेबर पार्टीला भारतीयांबाबत सहानुभूती होती. इंग्लंडमध्ये सत्तेत असताना याच लेबर पार्टीने  भारताच्य स्वातंत्र्याला मंजुरी दिली होती. 

महात्मा गांधी यांचा विदर्भ दौरा

नागपूर अधिवेशन पार पडल्यानंतर महात्मा गांधी यांनी विदर्भात दौरा केला. असहकार आंदोलनासाठी त्यांनी विदर्भ पालथा घातला. यातून विदर्भात या आंदोलनाने चांगलाच जोर पकडला. नागपूर अधिवेशनात फुंकलेल्या रणशिंगानंतर २७ वर्षांनी देशाला स्वातंत्र्य मिळाले. या २७ वर्षांत कॉंग्रेसचे झालेले अधिवेशन असो की नेत्यांचे आंदोलन असो, नागपूर अधिवेशनातील ठरावाची प्रत्येक वेळी आठवण करून देण्यात आली. महात्मा गांधी यांच्या प्रेरणेनेही विदर्भातही असहकार चळवळ चांगलीच फोफावली.

नक्की वाचा - काँग्रेसमधील गटबाजी कायम : शताब्दी ‘स्मरण’ही वेगवेगळेच; स्मरणाला श्रद्धांजलीचे स्वरूप

अभ्यंकरनगर, बजाजनगरही आले अस्तित्वात

नागपुरात ज्या भागात कॉंग्रेसचे अधिवेशन झाले, त्या भागाला कॉंग्रेसनगर असे नाव पडले. आज कॉंग्रेसनगर शहरातील प्रमुख क्षेत्र आहे. याचवेळी अभ्यंकरनगर, बजाजनगरही अस्तित्वात आले. मुळात कॉंग्रेसच्या अधिवेशनासाठी जमुनालाल बजाज, अभ्यंकर यांनी वेगवेगळ्या भागात शामियाने लावले होते. जेथे जमुनालाल बजाज यांचा शामियाना होता त्या परिसराला बजाजनगर तर जेथे अभ्यंकर यांनी लावलेल्या शामियानाला अभ्यंकरनगर नाव पडले. आज बजाजनगर, अभ्यंकरनगर शहरातील प्रमुख वस्त्या आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ 
 

Web Title: 100 Years Nagpur Winter Assembly Mahatma Gandhi Introduced

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..