esakal | माता कोमात गेली, तरीही गोंडस बाळाला दिला जन्म; एक नव्हे तर १ हजार कोरोनाग्रस्त गर्भवतींची सुरक्षित प्रसूती

बोलून बातमी शोधा

file photo
माता कोमात गेली, तरीही गोंडस बाळाला दिला जन्म; एक नव्हे तर १ हजार कोरोनाग्रस्त गर्भवतींची सुरक्षित प्रसूती
sakal_logo
By
केवल जीवनतारे

नागपूर : मध्यप्रदेशातील मुलताई येथील ९ महिन्यांची गर्भवती. अवघे २० वर्षांचे वय. प्रसूती वेदना सुरू झाल्या. २०० किलोमीटर अंतर कापून नागपुरात कोविड हॉस्पिटलमध्ये (Nagpur covid hospital) दाखल केले. मातेला मिरगीचा झटका आल्याने नातेवाइकांनी मिरगीच्या आजारावरील औषधाचा डोस दिला. डोस जास्त झाला. माता कोमात गेली. सोबतच कोरोनाचा संसर्ग...डॉक्‍टरांनी गर्भातील बाळाला धोका होऊ नये म्हणून व्हेंटिलेटवर (ventilator) कोमातील मातेचे सिझेरियन केले. एका गोंडस बाळाला या मातेने जन्म दिला. अशा बिकट अवस्थेत कोरोना संसर्गाच्या विळख्यात अडकलेल्या एक दोन नव्हे तर तर तब्बल १ हजार गर्भवतींची सुरक्षित प्रसूती मेडिकल (government medical college) आणि मेयोतील कोविड हॉस्पिटलच्या प्रसूती विभागातील डॉक्टरांनी केल्या आहेत. कोरोना (corona) संसर्ग असलेल्या मातांची प्रसूती शस्त्रक्रिया करताना मेयो, मेडिकलमधील अनेक डॉक्टर कोरोना बाधित झाले. परंतु, त्या कर्तव्यापासून ढळल्या नाही. (1000 corona positive pregnant women had safe delivery in nagpur)

हेही वाचा: वादळानं पाळण्यातील बाळ १०० फूट उंच उडालं, आईनं फोडला एकच हंबरडा

नागपुरातील मेयो आणि मेडिकलच्या कोविड हॉस्पिटल प्रसूती विभागातील डॉक्‍टरांनी स्वतःचा जीव धोक्‍यात घालून या मातांची प्रसूती केली. येथील डॉक्टरांनी एप्रिल २०२० ते एप्रिल २०२१ या लॉकडाउनच्या काळात ९८६ गर्भवती मातांची प्रसूती केली. मेयो-मेडिकलमधील डॉक्टरांनी आपले कर्तव्य सांभाळत या मातांची यशस्वी प्रसूती केली. या डॉक्टरांना सलाम, तर गर्भातील लेकरासाठी कोरोनाशी लढणाऱ्या मातांच्या जिद्दीलाही सलाम करावा लागणार आहे.

डॉक्टरांसाठी आव्हान -

कोरोनासारख्या गंभीर आजारावर मात करताना गर्भवती असलेल्या मातांना खूप मोठा संघर्ष करावा लागतो. कोरोनाबाधित मातांनी बाळाला जन्म दिल्यानंतर चिमुकले कोरोनामुक्त असतात. गर्भवती स्त्रीला आपल्या आत एक जीव वाढत असल्याने कोरोनाच्या वातावरणात स्वत:ची जास्त काळजी घ्यावी लागते. बाधित गर्भवतींची प्रसूती करताना येणारा मानसिक ताण आणि कोरोनापुढे हात टेकलेल्या या जगात येणाऱ्या बाळाला सुरक्षित जीवन देणे हे डॉक्टरांसाठी आव्हानात्मक जबाबदारी आहे, असे स्त्री व प्रसूतीरोग तज्ज्ञ डॉ. कांचन गोलावार म्हणाल्या.

हेही वाचा: उपराजधानीत भडकले गॅंगवॉर; भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी महिलेसह दोघांवर तलवारीने हल्ला

मनपा रुग्णालयात फक्त १४ प्रसूती -

शहरातील प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य जपण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. परंतु, नागपूर मनपा आरोग्य सेवा देण्यात अकार्यक्षम ठरली आहे. ३० लाखांच्या शहरात कोरोनाच्या काळात मेयो, मेडिकलमध्ये १ हजाराच्या जवळ कोरोनामातांची प्रसूती झाली असताना महापालिकेच्या रुग्णालयांत अवघ्या १४ कोरोनाबाधित मातांची प्रसूती झाली.

गर्भवतींची हॉस्पिटलनिहाय संख्या

  • मेडिकल -५७०

  • मेयो - ४१६

  • मनपा - १४

कोरोना काळात गर्भवती महिला घाबरलेल्या असतात. मात्र, त्यांनी घाबरू नये. व्यवस्थित काळजी घेतली तर काहीच त्रास होत नाही. गर्भधारणेदरम्यान शरीराची प्रतिकारशक्ती बदलते. कोविड -१९ पासून गर्भवती महिलांना धोका असतो. खबरदारी म्हणून त्यांना आयसीयूत दाखल केले जाते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पोटात वाढणाऱ्या बाळावर कोरोनाग्रस्त आईच्या संसर्गाचा परिणाम होत नाही. काही दिवस बाधित मातेपासून नवजात शिशूंना दूर ठेवावे लागते.
-डॉ. कांचन गोलावार, स्त्री व प्रसूतीरोग तज्ज्ञ, मेडिकल, नागपूर.