esakal | खुशखबर! १२०० बेड होणार उपलब्ध, पाच हजार ऑक्सिजन सिलिंडरही मिळणार
sakal

बोलून बातमी शोधा

beds

खुशखबर! १२०० बेड होणार उपलब्ध, पाच हजार ऑक्सिजन सिलिंडरही मिळणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : शहरातील कोविडरुग्णांची उपचारांअभावी होणारी परवड लक्षात घेता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी १२०० अतिरिक्त बेड उपलब्ध करून देण्याचे निर्देश शुक्रवारी मनपा आणि एम्सच्या डॉक्टरांना दिले. त्यामुळे आता शहरात मेयो १००, मेडिकल कॉलेज हॉस्पिटल १००, एम्स रुग्णालय ५०० आणि मनपाच्या दवाखान्यांमध्ये ३०० अतिरिक्त बेडची व्यवस्था तातडीने करण्यात येत आहे.

हेही वाचा: १५ दिवसांत तब्बल ३४ मृत्यू! गावात स्मशान शांतता

ऑक्सिजनविना आणि व्हेंटिलेटरविना रुग्ण दगावत असताना गडकरी यांनी पाच हजार ऑक्सिजन सिलेंडर आणि दोन हजार व्हेंटिलेटरची व्यवस्थाही केली असून लवकरच सिलेंडर आणि व्हेंटिलेटर नागपुरात उपलब्ध होत आहेत. आजच्या बैठकीत महापालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी, महापौर दयाशंकर तिवारी, आ. प्रवीण दटके, एम्सचे डॉ. मनीष श्रीगिरीवार, मैत्री परिवाराचे चंदू पेंडके उपस्थित होते. एम्समध्ये ५०० बेड ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर्ससह तातडीने उपलब्ध करण्याचे निर्देश गडकरी यांनी दिले. यासाठी महापालिका बेड आणि आवश्यक साहित्य एम्सला देण्यास तयार आहे. युद्धपातळीवर बेड वाढविण्यासाठीचे प्रयत्न गडकरी यांच्याकडून केले जात आहेत. ज्या लागतील त्या व्यवस्था करून देऊ, पण रुग्णाला उपचार मिळाले पाहिजेत, अशी भूमिका गडकरी यांनी सध्या घेतली आहे.

हेही वाचा: आशिया खंडातील सर्वात मोठ्या शासकीय रुग्णालयाचं शवागार हाऊसफुल्ल

मेयो, मेडिकलसह महापालिकेने आपले स्वत:चे ऑक्सिजन प्लांट उभे करण्यास त्वरित कारवाई करावी. या दृष्टीने गडकरी यांनी स्वत:च पुढाकार घेत व प्लांटसंबंधी तज्ज्ञ व्यक्तींशी चर्चा करीत मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. आयनॉक्स कंपनी ८५ टक्के ऑक्सिजन तयार करीत आहे. या कंपनीच्या पुरवठ्यावर सध्या नागपूर सुरू आहे. महापालिकेच्या जागेवर कुण्या एजन्सीला त्वरित प्लांट उभा करणे शक्य आहे काय, यासाठीही गडकरींचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच रेमडेसिव्हिर इंजेक्शनसाठी वर्धा येथील क्षीरसागर यांच्या कंपनीला औषध उत्पादनाची मान्यता मिळवून दिली असून उद्यापासून या फॅक्टरीमधून उत्पादन सुरु होऊ शकते.