काही वर्षांपूर्वी अमरावतीनेही अनुभवल्या होत्या किंकाळ्या; गेला होता नवजात शिशुंचा जीव

Amaravti people also experienced Big Fire in Hospital in 2017
Amaravti people also experienced Big Fire in Hospital in 2017

अमरावती ः भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात शनिवारी (ता.9) 10 नवजात बाळांचा होरपळून मृत्यू झाल्याच्या हृदयद्रावक घटनेमुळे अमरावतीत घडलेल्या काहीशा अशाच स्वरूपाच्या घटनेला उजाळा मिळाला आहे. त्यावेळी पालकांच्या किंकाळ्यांनी साऱ्यांच्याच मनाचा थरकाप उडाला होता.

अमरावतीमध्ये दोन प्रमुख रुग्णालयामधील अतिदक्षता कक्षात नवजात बालकांच्या जीविताशी खेळ झाला. या घटना अद्यापही अमरावतीकरांच्या स्मरणातून गेलेल्या नाहीत.

तीन वर्षापूर्वी म्हणजेच सन 2017 मध्ये डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील (पीडीएमसी) नवजात शिशू अतिदक्षता विभागातील परिचारिकेकडून चुकून दिलेल्या इंजेक्‍शनमुळे चार नवजात बाळांना जग पाहण्यापूर्वीच हे जग सोडावे लागले होते. त्यानंतर चिमूकल्यांच्या जिविताच्या सुरक्षेचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला होता. या घटनेनंतर रुग्णालयातील उपचाराच्या हलगर्जीपणाचा मुद्दा चर्चेला आला होता. नेहमीप्रमाणे या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले, मात्र त्यानंतर चौकशीचे काय झाले ?, याचे उत्तर अद्यापही सापडले नाही.

भंडारा प्रमाणेच एक घटना 22 एप्रिल 2019 मध्ये जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशू दक्षता वॉर्डात घडली होती. या वॉर्डात त्यावेळी 22 नवजात बालक उपचार घेत होते. मात्र त्याचवेळी रात्रीच्या सुमारास अचानक शॉर्टसर्किट झाले आणि सर्वत्र धावपळ उडाली. सर्वत्र धुराचे लोट दिसू लागले होते. विशेष म्हणजे कक्षातील सर्व इलेक्‍ट्रीक साहित्य आगीच्या भक्ष्यस्थळी पडले होते, असे असतानाच त्याठिकाणी ड्यूटीवर असलेल्या परिचारिकांनी आणि कर्मचाऱ्यांनी सर्व बालकांना सुखरूप बाहेर काढले. या घटनेनंतर फायर ऑडिटचा मुद्दा चर्चेला आला. डफरीनमध्ये झालेल्या या घटनेनंतर प्रशासन खडबडून जागे झाले. या घटनेनंतर आता संपूर्ण अतिदक्षता विभागात सुरक्षात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

भंडारा सारखीच परिस्थिती राज्यात अनेक ठिकाणच्या शासकीय रूग्णालयांमध्ये आहे. प्रसूतीसाठी जाणाऱ्या महिलांना तेथे आपण सुरक्षित आहो की नाही, याची शंका येण्याइतपत शासकीय रुग्णालयांची स्थिती झाली आहे. आयसीयू सारख्या ठिकाणी सुद्धा नवजात सुरक्षित नाहीत हे भंडारा येथील घटनेने दाखवून दिले आहे. सुरक्षात्मक उपाययोजनांचा अभाव हे एक महत्त्वाचे कारण म्हणावे लागेल.
- नवनीत राणा,
 खासदार, अमरावती.

भंडारा येथे घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. यामागे कोण कारणीभूत आहे याची चौकशी झाली पाहिजे. भविष्यात कुठल्याही रुग्णालयात अशी घटना होऊ नये यासाठी खबरदारी घेणे गरजेचे आहे. झालेले नुकसान भरून निघणार नाही. दोषींवर कारवाई करण्यात येईल. शासनाकडून त्या पालकांना जी काही मदत करता येईल तेवढी मदत सरकारकडून करण्याचा प्रयत्न करू.
- बच्चू कडू, 
राज्यमंत्री.

आज राज्यातील प्रत्येक शासकीय रुग्णालयांची स्थिती विदारक आहे. अनेक ठिकाणी अग्निशामक सुरक्षात्मक उपाययोजनाच नाहीत. यंत्रे बंद आहेत. अनेक ठिकाणी डॉक्‍टरांची कमतरता आहे. भंडारा येथील घटनेवरून सरकारने काही तरी धडा घेतला पाहिजे. या घटनेनंतर सरकारने सर्व शासकीय रुग्णालयामध्ये कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, अग्निशामक तसेच इतर सुरक्षात्मक उपाययोजना करून द्याव्यात, अशी आमची सरकारकडे मागणी राहील.
- रवी राणा, 
आमदार, बडनेरा.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com