मराठी पाऊल पडते पुढे! महाराष्ट्राची युद्धकला आता जाणार मध्यप्रदेशात; महिला सशक्तीकरणास मिळणार बळ

Art of war of maharashtra will now go in Madhya pradesh
Art of war of maharashtra will now go in Madhya pradesh

नागपूर : दांडपट्टा, लाठीकाठी व तलवारबाजीसारखी भारतीय प्राचीन युद्धकला ही एकेकाळी महाराष्ट्राची ओळख राहिली आहे. या कलेचा प्रचार व प्रसार आता मध्यप्रदेशातही होणार आहे. नागपूरच्या काही युवक-युवतींनी यात पुढाकार घेतला आहे. या निमित्ताने मध्यप्रदेशातील तरुणाईला युद्धकलेचे तर प्रशिक्षण मिळेलच, शिवाय महिला सशक्तीकरणालाही बळ मिळणार आहे.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी जोपासलेल्या शिवकालीन कला व शस्त्रविद्येचे ऐतिहासिक महत्त्व आहे. महाराष्ट्राची देशभर ओळख बनलेली ही कला काळाच्या ओघात लोप पावत चालली असली, तरी नागपुरातील काही युवकांनी मात्र शिवशक्ती आखाडाच्या माध्यमातून तिला जिवंत ठेवले आहे. 

शिवशक्‍ती भारतीय युद्धकला प्रशिक्षण केंद्राचे संस्थापक अध्यक्ष हितेश डफ व त्यांचे सहकारी गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण व शहरी भागांतील तरुणांना दांडपट्‌टा, लाठीकाठी व तलवारबाजीचे प्रशिक्षण देत आहेत. त्यांनी आतापर्यंत शेकडो मुला-मुलींना आत्मरक्षणाचे धडे देऊन सशक्‍त युवापिढी घडविण्याचे महान कार्य केले आहे. महाराष्ट्राला वारसा लाभलेली ही प्राचीन शिवकला लवकरच मध्यप्रदेशातही पोहोचणार आहे. 

सौंसर येथील बजरंग दल व शिवशक्ती आखाडाच्या संयुक्त प्रयत्नातून हा उपक्रम राबविला जात आहे. यासंदर्भात शहरातील अण्णाभाऊ साठे सभागृहात अलीकडेच एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात शिवशक्तीच्या सदस्यांनी आकर्षक प्रात्यक्षिके सादर करून या युद्धकलेचे बारकावे मुला-मुलींना पटवून दिले. कार्यक्रमाला सौंसरचे तहसीलदार अजयभूषण शुक्ला, एम. एम. पूरी, जयंत गुरू, पवन सरोदे, आदित्य दवंडे यांच्यासह डॉ. मृणालिनी कंटक, पूनम वाडेकर, राजनंदिनी दवंडे, आरती मानेकर, रुचिता आगत्रे, आसावरी परसापूडे व संजना सातपूते या प्रतिष्ठित महिलाही उपस्थित होत्या.

कलेबाबत तरुणांमध्ये उत्सुकता

शिवशक्ती आखाडाची नवीन शाखा लवकरच सौंसरमध्ये सुरू होत आहे. या शाखेत स्थानिक युवक-युवतींना सकाळ-सायंकाळ युद्धकलेचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाणार आहे. शिवाय वेळोवेळी शिबिरांचेही आयोजन करण्यात येणार आहे. या कलेबाबत तरुणांमध्ये उत्सुकता असून, शिकण्याची त्यांनी तयारी दर्शविल्याचे डफ यांनी सांगितले. या कलेच्या माध्यमातून देशभक्ती रुजविण्यासोबतच मध्यप्रदेशातील तरुणींना दैनंदिन जीवनात असामाजिक तत्त्वांचा निर्भीडपणे सामना करण्याची ताकद व ऊर्जा मिळणार आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com