Nagpur | बाबासाहेबांचे साहित्य खंड ‘इंटरनेट’वर कधी? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाबासाहेबांचे साहित्य खंड ‘इंटरनेट’वर कधी?

बाबासाहेबांचे साहित्य खंड ‘इंटरनेट’वर कधी?

sakal_logo
By
केवल जीवनतारे ः @kewalsakal

नागपूर - महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य वाचकांना एका ‘क्‍लिक’वर उपलब्ध व्हावे, हा उदात्त हेतू बाळगून इंटरनेटवर प्रकाशित साहित्याचे सर्व खंड उपलब्ध करून देण्याचा निर्णय तत्कालीन राज्य सरकारने घेतला होता. परंतु, या निर्णयाची अंमलबजाणी करण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती अपयशी ठरली आहे. २० वर्ष लोटल्यानंतरही समितीने बाबासाहेबांच्या खंडातील एक अक्षरही इंटरनेवर टाकले नाही, हे विशेष.

महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या पुढाकाराने तत्कालीन सदस्य सचिव वसंत मून यांच्या प्रयत्नातून १७ खंड प्रकाशीत झाले. तर दिवंगत मुन यांच्या कारकिर्दीत संशोधन करुन संकलित केलेल्या बाबासाहेबांच्या अप्रकाशित साहित्याचे पुढे ४ खंड प्रकाशीत झाले. मुन यांच्या निधनानंतर बाबासाहेबांच्या साहित्याचे खंड प्रकाशनाची गती मंदावली. २००४ पासून स्वतंत्र स्वरुपात एकही खंड प्रकाशीत झाला नाही.

हेही वाचा: अनिल देशमुखांसारखा भ्रष्टाचार यांना करता येणार नाही; म्हणूनच...

समितीकडून ४० वर्षात एकूण २२ खंड प्रकाशित झाले. यात २२ वा खंड बाबासाहेबांच्या छायाचित्रांचा आहे. या खंडात प्रचंड त्रृटी आढळून आल्या आहेत. यामुळे हा खंड पुर्नमुद्रित केला होता. बाबासाहेबांच्या लेखनाचे प्रकाशित झालेले २२ खंड वाचकांना इंटरनेटवर उपलब्ध करुन देण्यासंदर्भात १३ मार्च २००१ रोजी राज्याचे तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांच्या उपस्थित निर्णय घेण्यात आला. परंतु, या निर्णयाची अमलबजावणी करण्यात समिती नापास झाली आहे. यावर्षी नवीन समिती गठित झाली आहे. सदस्य सचिव डॉ. प्रदीप आगलावे आहेत. या समितीने सर्व साहित्य इंटरनेटवर उपलब्ध करून द्यावे अशी मागणी भारतीय दलित पॅंथरतर्फे करण्यात आली आहे.

२६ नोव्हेंबरला व्हावे द प्रॉब्लेम ऑफ रूपीचे प्रकाशन

बाबासाहेबांच्या अर्थशास्त्रीय प्रबंध व संकीर्ण लिखाणातील ‘द प्रॉब्लेम ऑफ रूपी’ या प्रबंधाचा समावेश असलेला चा इंग्रजी भाषेतील ६ व्या खंडाचा मराठी अनुवादाचा निर्णय घेतला. २५ वर्षे लोटूनही खंड प्रकाशित झाले नाहीत. त्यामुळे येत्या २६ नोव्हेंबरला संविधान दिनाच्या पर्वावर हा खंड प्रकाशीत व्हावी, अशी मागणी उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे भारतीय दलित पॅंथरने केली आहे.

खंड प्रकाशनाचा निर्णय होऊन ४ महिने लोटले आहेत. मात्र ‘द प्रॉब्लेम ऑफ रूपी’ या प्रबंधाचा समावेश असलेला सहावा खंड वाचकांच्या हाती आला नाही. येत्या संविधान दिनाला तरी वाचकांच्या हाती आतातरी हा खंड येईल का?

- प्रकाश बनसोड, अध्यक्ष, दलित पॅंथर, नागपूर

loading image
go to top