esakal | भाजपची महापालिका निवडणुकीसाठी रणनिती, ज्येष्ठ नगरसेवकांनाही आजमावणार
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur NMC

भाजपची महापालिका निवडणुकीसाठी रणनिती, ज्येष्ठ नगरसेवकांनाही आजमावणार

sakal_logo
By
- राजेश प्रायकर

नागपूर : गेल्या साडेचार वर्षांत नागरिकांना चेहराही न दाखविणाऱ्या नगरसेवकांबाबत नागरिकांत संताप आहे. याशिवाय उद्धट वागणाऱ्या नगरसेवकांनीही पक्षाची प्रतिमा मलीन केली. त्यामुळे भाजप (BJP) पुढील महापालिका निवडणुकीत (nagpur municipal corporation election) ‘फ्रेश' चेहऱ्यांसोबत अनेकदा सदस्य म्हणून निवडून आल्याने इच्छा नसलेल्या ज्येष्ठांनाही आजमावणार असल्याची चर्चा रंगली आहे. (bjp may give candidature to old corporator for nagpur municipal corporation election)

हेही वाचा: यवतमाळ : कळंबच्या कन्येला विठ्ठल पूजेत सहभागी होण्याचा मान

मागील महापालिका निवडणुकीत भाजपचे १०८ सदस्य निवडून आले. यात अनेक नवे चेहरे महापालिकेत निवडून आले. परंतु, गेल्या पाच वर्षात या नगरसेवकांना नागरिकांवर छाप पाडण्यात अपयश आले. काही नगरसेवकांना साडेचार वर्ष लोटल्यानंतरही नागरिक ओळखत नाही, अशी स्थिती आहे. याशिवाय काही नगरसेवकांनी नागरिकांशी उद्धटपणे वागत पुढील महापालिका निवडणुकीत मनपा सभागृहात पोहोचण्याचे दोरच कापले. शिवाय पक्षाचीही प्रतिमा या नगरसेवकांनी मलिन केली. परिणामी मागील निवडणुकीत प्रथमच निवडून आलेल्या बऱ्याच नगरसेवकांना पुढील मनपात उमेदवारी मिळणे कठीण आहे. अशा स्थितीत नवे चेहरे देतानाच नागरिकांत चांगली प्रतिमा असलेल्या ज्येष्ठ नगरसेवकांनाही रिंगणात उतरविण्याशिवाय पर्याय नसल्याचे एका नेत्याने नमुद केले. सध्या महापालिकेत माजी महापौरांमध्ये नंदा जिचकार, संदीप जोशी, महापौर दयाशंकर तिवारी, माजी उपमहापौर सुनील अग्रवाल, डॉ. छोटू भोयर आहे. याशिवाय मागील निवडणुकीत पराभूत झालेल्या व आता पक्षाची जबाबदारी सांभाळत असलेल्या माजी महापौर अर्चना डेहनकर यांनाही मनपा निवडणुकीत उमेदवारीची शक्यता नाकारता येत नाही. माजी महापौर संदीप जोशी यांनी मनपा निवडणूक न लढविण्याची घोषणा केली आहे. परंतु, पक्षापुढे नागरिकांच्या विरोधाचे असलेले संकट दूर करण्यासाठी त्यांनाही पक्ष उमेदवारी देण्याची शक्यता एकाने वर्तविली. इतर माजी महापौर, उपमहापौरही अनेक वर्षांपासून निवडून येत आहे. महापालिकेत यश मिळवून देण्यासाठी भाजप पुन्हा त्यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. याशिवाय मागील निवडणुकीत महापालिकेत पदावर असताना कामाची छाप उमटविणारे गोपाल बोहरे यांच्यासारख्या माजी नगरसेवकांच्या नावावर खलबते होत आहे. त्यामुळे इच्छा असो की नसो? त्यांना पक्षासाठी पुन्हा रिंगणात उतरावे लागणार असल्याची चर्चाही भाजपअंतर्गत रंगली आहे.

पुढील महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयार केलेल्या रणनितीनुसार पक्षाचे काम करीत आहेत. नव्या दमाच्या लोकांना प्रोत्साहित करीत आहे. परंतु, पक्षाने आदेश दिल्यास महापालिका निवडणूक लढविणार.
- अर्चना डेहनकर, माजी महापौर.
महापालिकेत सर्वोच्च पद भूषविले आहे. त्यामुळे पुन्हा तिथे जाण्याची इच्छा नाही. महापालिका निवडणूक लढणार नाही, अशी जाहीर घोषणाही केली. याशिवाय पक्षालाही सांगितले आहे. पक्षाने म्हटले तरी लढणार नाही.
- संदीप जोशी, माजी महापौर.
loading image