esakal | देशमुख यांना हटविण्यासाठी मोर्चेबांधणी; नागपुरात हालचाली
sakal

बोलून बातमी शोधा

देशमुख यांना हटविण्यासाठी मोर्चेबांधणी; नागपुरात हालचाली

देशमुख यांना हटविण्यासाठी मोर्चेबांधणी; नागपुरात हालचाली

sakal_logo
By
प्रमोद काकडे

चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेतील भाजपचे गटनेते वसंता देशमुख यांना पदावरून हटविण्यासाठी भाजप आणि मित्र पक्षाचे ३६ नगरसेवक नागपूरला रवाना झाले. बुधवारी विभागीय आयुक्तांसमोर त्यांच्या स्वाक्षरीची शहानिशा होणार आहे. भाजपच्या जयश्री जुमडे नव्या गटनेत्या होतील. आता वसंता देशमुख काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. भाजप आणि मित्र पक्षाच्या तीन नगरसेवकांनी मात्र नागपूरला जाणे टाळले आहे.

देशमुख यांना हटविण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू झाल्यानंतर त्यांनी आठ दिवसांपूर्वी नागपूर येथे जाऊन विभागीय आयुक्तांची भेट घेतली होती. त्यांच्या विरोधातील कारवाईला कायदेशीर आव्हान देऊ, असे त्यांनी सांगितले होते. परंतु, मधल्या काळात भाजपअंतर्गत बऱ्याच घडामोडी घडल्या आणि देशमुखांची विकेट पडणार यावर शिक्कामोर्तब झाले.

हेही वाचा: सुधीर मुनगंटीवारांची मुलाखत घेणारी स्वामीनी झाली डीआयजी!

या वादाची सुरुवात सहा महिन्यांपूर्वी झाली. देशमुख यांना स्थायी समितीच्या सभापतिपदाचे आश्वासन मिळाले होते. त्यासाठी त्यांच्या सभागृह नेतेपदाचा राजीनामा घेतला. मात्र, ऐनवेळी रवी आसवानी यांच्या गळ्यात सभापतिपदाची माळ पडली. तेव्हापासून देशमुख नाराज झाले. पंधरा दिवसांपूर्वी दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेले आठ सदस्य स्थायी समितीतून निवृत्त झाले. निवृत्त सदस्यांमध्ये सभापती आसवानी यांचाही समावेश होता. त्यामुळे नव्या सदस्यांच्या नियुक्तीचा विषय आमसभेच्या कामकाज पत्रिकेवर येईल.

आपल्या सभापतिपदाचा मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा देशमुख यांना होती. देशमुख यांना भाजपच्या तीन सदस्यांची नावे स्थायी समितीसाठी द्यायची होती. त्यांच्याकडे संदीप आवारी आणि संजय कंचर्लावार यांच्या नावाची शिफारस पक्षनेतृत्वाने केली. परंतु, दोन्ही नावाला देशमुख यांनी विरोध केला. त्यामुळे महापौर राखी कंचर्लावार यांनी नव्या सदस्यांच्या समावेशाच्या विषयाला आमसभेच्या कामकाजातून बाद केले. देशमुख आपल्या निर्णयावर ठाम होते. त्यामुळे त्यांना गटनेते पदावरून हटविण्याच्या प्रक्रियेला वेग आला.

हेही वाचा: राज्यात वाढतोय साक्षरतेचा टक्का; महाराष्ट्र बाराव्या क्रमांकावर

देशमुख यांना हटविण्याच्या बाजूने कौल

आठवडाभरापूर्वी भाजप आणि मित्र पक्षांच्या नगरसेवकांची बैठक आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली. त्यात भाजप आणि मित्र पक्षाच्या ३९ पैकी ३६ नगरसेवकांनी देशमुख यांना हटविण्याच्या बाजूने कौल दिला. आता या नगरसेवकांची विभागीय आयुक्तांसमोर ओळख परेड होणार आहे. गटनेते पदासाठी जयश्री जुमडे यांच्याऐवजी सविता कांबळे यांच्या नावावर एकमत झाले होते. परंतु, शेवटच्या क्षणी जुमडे यांच्या नावावर एकमत झाले.

पत्रकार परिषदेतून भूमिका मांडणार

सकाळी ११ वाजताच्या सुमाराला स्थानिक शामाप्रसाद मुखर्जी वाचनालयात भाजपचे नगरसेवक एकत्र आले. त्यांना बसने नागपूर येथे रवाना करण्यात आले. नेत्यांचा आदेश असल्यामुळे जावे लागत आहे. आमची इच्छा नव्हती, असे बऱ्याच नगरसेवकांनी बोलून दाखविले. आता या घडामोडींनंतर देशमुख काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे स्थायी समिती सभापतीपदासाठीसुद्धा भाजपअंतर्गत मोर्चेबांधणी सुरू होणार आहे. पत्रकार परिषदेतून लवकरच भूमिका मांडणार, असे वसंता देशमुख यांनी सांगितले.

loading image
go to top