esakal | शासकीय आकडेवारीत दिसतात शिल्लक खाटा, पण नातेवाइकांची खाटांसाठी भटकंती सुरूच

बोलून बातमी शोधा

oxygen bed
शासकीय आकडेवारीत दिसतात शिल्लक खाटा, पण नातेवाइकांची खाटांसाठी भटकंती सुरूच
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येने ७७ हजारांचा टप्पा पार केला आहे. दर दिवसाला सात हजार पार नवे बाधित रुग्ण आढळून येत असल्याने खाटा वेगाने भरल्या जात आहेत. गंभीर रुग्णांची संख्याही वेगाने वाढत असून सध्या ५८६ रुग्ण व्हेंटिलेटवर आहेत. शासकीय आकडेवारीत खाटा शिल्लक असल्याचे दर्शविल्या जात असताना खाटांसाठी कोरोना बाधितांना भटकंती का करावी लागत आहे, असा प्रश्न रुग्णांच्या नातेवाइकांकडून विचारला जात आहे.

हेही वाचा: कोरोना रुग्णांसाठी देवदूत ठरले लाखनीचे युवक; ऑक्‍सिजन सिलिंडरची केली व्यवस्था

जिल्ह्यातील २११ कोविड हॉस्पिटलमध्ये ९ हजार ६१ उपचाराधीन रुग्ण आहेत. मात्र, प्रशासनाच्या कागदांवर १० हजार ७०४ खाटा असल्याची माहिती आहे. ९ हजार ५२ बाधित दाखल आहेत. तज्ज्ञांच्या मते, दर दिवसाला सुमारे ३०० ते ४०० खाटांची गरज आहे. तर प्रशासनाच्या आकडेवारीनुसार १ हजारावर खाटा शिल्लक असल्याचे दाखवण्यात आले. आकडेवारीचा हा घोळ कधी संपेल हे मात्र गुलदस्त्यात आहे.

प्रशासनाने पहिल्या लाटेनंतर ऑक्टोबरमध्ये आम्ही दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज आहोत, असा दावा केला होता. परंतु, प्रशासनाचा हा दावा फोल ठरला. जिल्ह्यात मेयो, मेडिकलसह, खासगी कोविड हॉस्पिटल, कोविड केअर सेंटरची संख्या २११ आहे. सध्या येथे ९ हजार ६१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र, दर दिवसाला सात हजार पार नवे रुग्ण आढळून येत असल्याने खाटांसह, ऑक्सिजन, औषधांचा तुटवडा निर्माण होत आहे. वैद्यक तज्ज्ञांच्या मते दर दिवसाला ४०० कोरोनाबाधितांना उपचारासाठी खाट मिळत नसल्याचे वास्तव पुढे आले आहे. जिल्ह्यात ऑक्सिजन, कोविड केअर सेंटर, आयसीयू, तसेच व्हेंटिलेटरच्या खाटांची संख्या १० हजार ७०४ असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा: वॉर्डबॉयनेच चोरले रेमडेसिव्हीर इंजेक्शन, कारागृहात रवानगी

खाट न मिळाल्याने लेकरांसमोर गेला आईचा जीव -

दुपारी चार वाजताची वेळ. पारडीतील कोरोनाबाधित महिला आशा (बदललेले नाव) यांना रुग्णवाहिकेतून मेडिकलमध्ये आणले. ट्रॉमाच्या प्रवेशद्वारातच खाट उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. महिलेची स्थिती गंभीर होती. सर्व खासगी रुग्णालयातून खाट न मिळाल्याने निराश झाले. शेवटी मेडिकलमध्ये आणले. येथेही तीन तास लोटूनही महिला रुग्णवाहिकेतच होती. अखेरचा श्वास संपेपर्यंत बघितले नाही. शेवटी ही महिला रुग्णवाहिकेतच मरणपंथाला पोहोचली. शरीराची हालचाल बंद होताच नातेवाइकांनी रडणे ओरडणे सुरू झाले. येथे तैनात मख्य वैद्यकीय अधिकारी (सीएमओ) आले, आणि बघितले मृत अन घोषित केले. हेच डॉक्टर जीव जाण्यापूर्वी आले असते, तपासले असते तर नातेवाइकांना समाधान मिळाले असते. मात्र, लेकरांच्या नजरेसमोर आईचा जीव जात असताना डॉक्टर बघत नाही, त्याचे दुःख मोठे आहे. खाटा, ऑक्सिजन अभावी मृत्यूच्या भयावह खेळात गरिबांचे मरणे सोपे झाले आहे.

हेही वाचा: पेटंट सादर करण्यात विदर्भातील विद्यापीठ पिछाडीवर, 'अभिमत' मात्र आघाडीवर

कोरोना रुग्णांच्या तुलनेत जिल्ह्यातील एकूण खाटांचा लेखाजोखा -

 • रूग्णांची संख्या -९ हजार ६१

 • जिल्ह्यात एकूण खाटा - १० हजार ७०४

महापालिका रुग्णालयातील खाटा -

 • इंदिरा गांधी रुग्णालय १२०

 • आयुष रुग्णालय ४०

 • आयसोलेशन ३६

 • पाचपावली सुतीकागृह ११० (लवकरच सुरू होणार)

 • केटीनगर रुग्णालय १०० (लवकरच सुरू होणार)

विलगिकरण केंद्र व खाटा -

 • आमदार निवास २२५

 • पाचपावली पोलिस क्वार्टर १५५

 • व्हीएनआयटी ८५

 • शासकीय तंत्रनिकेतन ८०

 • विधी महाविद्यालय १६०