esakal | १ मेपासून तरुणांचे लसीकरण तर करणार, पण १५ लाख लसी आणणार कुठून?

बोलून बातमी शोधा

vaccine
१ मेपासून तरुणांचे लसीकरण तर करणार, पण १५ लाख लसी आणणार कुठून?
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : एक मेपासून राज्य सरकारने अठरा वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणाची घोषणा केली असली तरी अद्याप त्याप्रमाणात लसीच उपलब्ध नसल्याने ही मोहीम पुढे ढकलावी लागणार असल्याचे दिसून येते. सध्या नागपूर महापालिकेकडे दोन दिवस पुरेल एवढाच लसींचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणेने सावध भूमिका घेतली असून लसीकरणासाठी घाई करू नये, असे आवाहन केले आहे.

हेही वाचा: नागपूरकरांनो घाबरू नका! बाधितांची संख्या होतेय कमी; कोरोनावर मात करणाऱ्यांचं प्रमाण अधिक

सध्या पूर्व विदर्भासाठी सव्वा लाख लसींचे डोस उपलब्ध झाले आहेत. यापैकी एक लाख १० हजार कोविशिल्ड तर १५ हजार कोव्हॅक्सिनचे डोस आहेत. सुरुवातीला साठ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली होती. कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि वयोगट लक्षात घेऊन त्यानंतर ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देणे सध्या सुरू आहे. तरुणांमध्येही लागण होत लक्षात आल्यानंतर आता १८ ते ४४ वयोगटातील सर्वांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी कोविन पोर्टललवर नोंदणी करणे आवश्यक आहे. मंगळवार (ता.२७) रात्री बारापासून नोंदणीसाठी ती खुली राहणार आहे.

नागपूरची लोकसंख्या सुमारे ३० लाखांच्या घरात आहे. अठरा वर्षांवरील सर्वांना लस द्यायची झाल्यास किमान १५ लाख लसींची आवश्यकता भासणार आहे. याशिवाय पुरेसे लसीकरण केंद्रे नसल्याने एकच गर्दी उसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या नागपूरमध्ये एकूण ११३ लसीकरण केंद्र आहेत. त्यात महापालिका आणि राज्य सरकारचे ८१ आणि खासगी ३५ आहेत. लोकसंख्येचा विचार करता ही केंद्रे पुरेशी नाहीत. शहरातील लोकसंख्या पाहता सुलभतेने लसीकरणासाठी दोनशेपेक्षा जास्त केंद्रांची गरज आहे. युवकांच्या गर्दीत साठ वर्षांच्यावरील नागरिकांना लस घेणे अडचणीचे ठरू शकते. अद्याप ४५ वर्षांवरील नागरिकांचा दुसरा डोस बाकी आहे.

हेही वाचा: बाळांना कोरोनाचा धोका असतो का? वाचा काय सांगतात डॉ. देशमुख

  • पहिला डोस घेतलेले -४ लाख १० हजार ४७०

  • दुसरा डोस घेतलेले - ४ लाख ८५ हजार ४५९

  • लसीकरण केंद्रांची एकूण संख्या - ११३

  • मनपा व शासकीय - ८१

  • खासगी लॅब - ३५

उपलब्ध लसी

मनपा - ३० हजार (दोन दिवस पुरेल एवढाच साठा)