
शेती सध्या तोट्याचा व्यवसाय झाला आहे. उत्पादनापेक्षा खर्च जास्त होत असल्याने शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती ऐवजी भाजीपाला व बागायत शेती करण्यावर भर दिला आहे. त्याअनुरूप वेलतूर परिसरातील शेतकऱ्यांनी शेतीत आंब्याची झाडे लावून अनेक बागायती निर्माण केल्या आहेत.
यंदा फळांचा राजा होणार दिसेनासा? मोहोराला लागली गळती; बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव
वेलतूर (जि. नागपूर) : पारंपरिक शेती मध्ये दरवर्षी तोटा होत असल्याने वेलतूर भागातील शेतकऱ्यांनी आंब्यांची बागायत शेती मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे. यावर्षी आंबे बागा मोहराने फुलून गेल्या होत्या. पर्यायाने आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होईल, या आनंदात शेतकरी असतानाच बदलत्या हवामानामुळे या बागायतींवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने आंब्याचा मोहर पार करपून गेला आहे. यामुळे भरघोस आंबा उत्पादन होईल, या आनंदात असलेल्या शेतकऱ्यांचा आनंद मोहराबरोबरच मावळला आहे. या आसमानी संकटाने बळीराजा पार हवालदिल झाला आहे.
शेती सध्या तोट्याचा व्यवसाय झाला आहे. उत्पादनापेक्षा खर्च जास्त होत असल्याने शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती ऐवजी भाजीपाला व बागायत शेती करण्यावर भर दिला आहे. त्याअनुरूप वेलतूर परिसरातील शेतकऱ्यांनी शेतीत आंब्याची झाडे लावून अनेक बागायती निर्माण केल्या आहेत. ही आंब्याची कलमे यावर्षी ऐन भरात येऊन त्यांना जोमदार मोहर आला होता. यावर्षी आंब्याचे भरघोस उत्पादन येऊन चांगला नफा मिळेल, या आनंदात या भागातील शेतकरी होता. मात्र वातावरणात अचानक मोठ्या प्रमाणात रात्री गारवा व दिवसा कडक उन्ह आल्याने हवेत आद्रर्ता येऊन दवाचे प्रमाणही जास्त वाढले.
नक्की वाचा - घरात लक्ष्मी आली म्हणून बाप वाटत होता पेढे, पण एक फोन आला अन् सर्वच संपलं
सकाळी दाट धुक्याची चादर असते. पर्यायाने हवेत दमटपणा आल्याने तुडतुडे या किटकांनी आंबामोहरावर हल्ला करून त्याचा रस शोषून घेतला. त्याचबरोबर तुडतुड्याची विष्ठा आंबामोहरावर पडल्याने त्यावर बुरशी मोठ्या प्रमाणात वाढल्याने आंबा मोहर काळवंडून गेला. पर्यायाने आंबामोहराची फळधारणा पूर्णता थांबली आहे. त्यामुळे आंबा उत्पादन मोठ्या प्रमाणात येऊन मोठा नफा मिळेल या स्वप्नात असलेल्या शेतकऱ्यांचे स्वप्न पार भंगले आहे.
काही बागायतदारांनी आंबा बागायतींवर कीटकनाशके मारूनही त्यांच्या बागांची अवस्था इतर शेतकऱ्यांसारखी झाली आहे. त्यामुळे या आसमानी संकटाचा सामना कसा करायचा या विवंचनेत परिसरातील शेतकरी सापडला आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांचे इतके नुकसान होत असताना कृषी विभागाचे अधिकारी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत, असा आरोप होत आहे.
शासनाच्या फळबाग विकास कार्यक्रमांतर्गत कर्जाऊ रकमेतून शेतकऱ्यांनी आबा फळबाग उभी केली आहे. मात्र त्यांना योग्य तांत्रिक माहिती प्रशासनाकडून पुरविली जात नाही. कृषी विभागाने ती नियमित पुरवावी.
-राजानंद कावळे
शेतकरी कार्यकर्ते
जाणून घ्या - बहिण भावाला बोलवायला गेली, खिडकीतून दृश्य बघताच मोठ्यानं किंचाळली
आबा मोहर मोठ्या प्रमाणात गळत आहे. फळधारणेसाठी तात्काळ उपाय सूचवावा व मार्गदर्शन व्हावे.
-पंकज शेंडे
आंबा फळबाग उत्पादक
संपादन - अथर्व महांकाळ