Quick Earning : झटपट कमाईचा ‘टास्क’ येतोय अंगलट

महिला, युवक सर्वाधिक टार्गेट : पाच महिन्यात आठ घटना, कोटीचा गंडा
cyber crime extra income task of quick earning fraud nagpur
cyber crime extra income task of quick earning fraud nagpursakal

नागपूर : अतिरिक्त वा झटपट कमाईच्या नादात गेल्या वर्षभरात सायबर चोरट्यांनी ‘टास्क’च्या नावावर अनेकांना गंडा घातला आहे. पाच महिन्यात जवळपास ‘टास्क’च्या नावावर प्रलोभन देत, आठ घटनांमध्ये एक कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. फसवणूक होणाऱ्यांमध्ये युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे.

जगभरात ऑनलाइनची खरेदी-विक्री तसेच व्यवसायाची क्रेझ वाढली आहे. त्यामुळे मोबाईलच्या एका क्लिकवर सर्वकाही मिळत असल्याने त्याचा अमर्याद वापरही वाढला आहे. याचा फायदा घेत सायबर गुन्हेगारीचे प्रमाणही वाढले आहे. एखादा क्रमांक गुगलवरून शोधताच, फोन येऊन त्यातून समोरचा फसवणूक करून जात असल्याच्या अनेक घटना नियमित बघायला मिळतात.

cyber crime extra income task of quick earning fraud nagpur
Nagpur: नवे शैक्षणिक धोरण गुंतागुंतीचे; महाविद्यालयांना अडचणी, अनेकांना काय करावे कळेना

त्यातच आजकाल व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम या ॲपच्या माध्यमातून झटपट कमाईचे आमिष दाखवून गंडा घालण्याचा नवा फंडा सायबर चोरट्यांनी स्वीकारल्याचे समोर येत आहे. शहरात गेल्या वर्षी सायबर पोलिस ठाण्यात एका गुन्ह्याची तर इतर पोलिस ठाण्यात दहावर या पद्धतीचे गुन्हे दाखल झाले होते. मात्र, यावर्षी मे महिन्यापर्यंत टास्कच्या नावावर फसवणूक केल्याचे आठ गुन्हे दाखल झाले आहे. यामध्ये तक्रारदात्यांना ९९ लाख ७४ हजार ५३६ रुपयांचा गंडा घातला गेला आहे.

अद्याप एकाही गुन्हेगाराला अटक नाही

सायबर चोरट्यांच्या या आमिषाला तरुण आणि महिला सर्वाधिक बळी पडत असल्याचे दिसून आले आहे. प्रामुख्याने नोकरीच्या शोधात असलेली तरुण पिढी आणि अतिरिक्त कमाई करीत, त्यातून कुटुंबाचा खर्च भागविण्यासाठी महिला सायबर चोरट्यांच्या जाळ्यात अडकताना दिसून येतात. मात्र, यापैकी दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत अद्याप एकाही गुन्हेगाराला अटक करण्यात सायबर पोलिसांना यश आले नाही हे विशेष.

टास्कसाठी नामवंत कंपन्यांचा नावाचा वापर

सायबर चोरट्यांकडून ‘टास्क’ देण्यासाठी नामवंत कंपनीचे बनावट प्रोफाईल तयार करण्यात येते. ते हुबेहुब कंपनीच्या प्रोफाईलसारखे असल्याने त्याची भुरळ युवक आणि महिलांना पडते. त्यातून कमी पैसे लावल्यावर सुरुवातीला जास्तीत जास्त नफा मिळत असल्याने गुंतवणुकीची रक्कम वाढविण्यात येते. ती रक्कम लाखाच्या घरात गेल्यास नफा मिळणे बंद होते. त्यानंतर पैसे आणि नफा मिळविण्यासाठी ‘टास्क’ पूर्ण करण्याची सक्तीही सायबर चोरट्यांकडून केली जाते.

cyber crime extra income task of quick earning fraud nagpur
Nagpur Crime : 'अंत्यविधीला का गेलीस?' नवऱ्याने संतापच्या भरात ढकलून दिले, पत्नीचा मृत्यू

सायबर पोलिसांकडून खाते ‘फिज’

टास्कच्या नावावर गुंतवणूकदाराची फसवणूक झाली असताना त्याने तक्रार देताच, सायबर पोलिसांकडून संबंधित खाते फ्रिज केले जाते. गुन्हा दाखल होईपर्यंत ती प्रक्रिया पूर्ण होत असल्याने त्यातील रक्कम तशीच राहते. त्यातूनच सायबर पोलिसांकडे दाखल झालेल्या ९ तक्रारीमध्ये १ कोटी ४९ लाख ४३ हजार ६६० रुपयांचे खाते सध्या फ्रिज करण्यात आले आहे. न्यायालयीन प्रक्रियेनंतर ते पैसे तक्रारकर्त्यांना परतही मिळतात.

cyber crime extra income task of quick earning fraud nagpur
Nagpur: मरणानंतरही थांबत नाहीत नरक यातना; स्मशानभूमीचा रस्ता नसल्याने, मृतदेहांची अवहेलना

झटपट पैसे कुठनही मिळत नाही. ही बाब युवक, महिला आणि समाजातील ज्येष्ठ नागरिकांनी लक्षात घ्यावी. त्यामुळे सायबर चोरट्यांकडून दाखविलेल्या आमिषाला बळी न पडता, नागरिकांनी सतर्क राहून अशा जाहीरातींना प्रतिसाद देऊ नये.

-मारोती शेळके, सहायक पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com