esakal | औषधांचा ऑनलाइन शोध घेताना सावधान! सायबर गुन्हेगार सक्रिय
sakal

बोलून बातमी शोधा

cyber crime

औषधांचा ऑनलाइन शोध घेताना सावधान! सायबर गुन्हेगार सक्रिय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : सायबर गुन्हेगारांकडून (cyber crime) वेगवेगळ्या पद्धतीने नागरिकांना लुटले जात आहे. औषधांचा ऑनलाइन शोध घेणाऱ्यांनाही ‘टार्गेट’ केले जाऊ लागले आहे. सायबर गुन्हेगाराच्या (cyber criminal) जाळ्यात अडकून एका युवकाला तब्बल १ लाख ८१ हजारांचा फटका सहन करावा लागल्याचे प्रकरण सोनेगाव हद्दीत उघडकीस आले आहे. (cyber fraud of 2 lakh with man in nagpur)

हेही वाचा: corona positive story : एचआरसीटी स्कोअर १८ तर ऑक्सिजन लेव्हल ८२; मग झाला पुनर्जन्म

अलिकडच्या काळात कोरोनासह व अन्य आजारांचे औषध ऑनलाइन मागविणे किंवा औषधांचा ऑनलाइन शोध घेणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. हीच बाब हेरून गुन्हेगारही संधीचा फायदा घेण्यासाठी सक्रिय झाले आहेत. यामुळे नागरिकांनीच सावधगिरी बाळगणे आवश्यक झाले आहे. थोडाही बेसावधपणा फसगत होण्याचे कारण ठरू शकते. सोनेगाव तलावाजवळील परातेनगरात राहणारे अनिरुद्ध माईंदे (३२) हे औषधांचा शोध घेत फिरत होते. रविवारी सायंकाळी औषधीची अनेक दुकाने पालथी घालूनही एक औषध मिळत नव्हते. निराश होऊन घरी परतत असताना ऑनलाइन शोध घेऊन बघण्याची कल्पना सुचली. गुगलवर सर्च करीत असतानाच त्यांच्या मोबाईलवर कॉल आला. पलीकडून बोलणाऱ्याने तुम्ही शोध घेत असलेल्या औषधाची होम डिलेव्हरी करून देण्याची तयारी दर्शविली. अनिरुद्धने औषध घेण्याची तयारी दर्शविताच त्यासाठी आधी ऑनलाइन कार्ड पेमेंट करावे लागणार असल्याचे सांगितले. आरोपीवर विश्वास ठेवत अनिरुद्धने क्रेडीट कार्डचा क्रमांक व मोबाईलवर आलेला ओटीपी नंबर सांगितला. त्यानंतर अनिरुद्धच्या बँक खात्यातून पाच वेळा एकूण १ लाख ८१ हजार ४७० रुपये विड्रॉल करण्यात आले. या प्रकाराने अनिरुद्ध यांना धक्काच बसला. त्यांनी बँकेत चौकशी केली असता सायबर गुन्हेगाराने फसवणूक केल्याची बाब समोर आली. त्यांनी सोनेगाव ठाणे गाठून तक्रार दिली. त्या आधारे पोलिसांनी फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करून घेत आरोपीचा शोध सुरू केला आहे.