जागा रिक्त तरीही वाढीव जागांची मागणी | Nagpur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

admission

जागा रिक्त तरीही वाढीव जागांची मागणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशादरम्यान तीनदा मुदतवाढ देण्यात आली असताना रिक्त जागांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यानंतरही महाविद्यालयांकडून पुढल्या वर्षासाठी वाढीव तुकड्यांची मागणी करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत विद्वत परिषदेमध्ये अनेक नामवंत महाविद्यालयांनी प्रस्ताव सादर केले आहेत.

गेल्या काही वर्षात विज्ञान आणि वाणिज्य अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला. त्यामुळे या विषयातील महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी झुंबड उडते. शहरातील नामवंत महाविद्यालयात प्रवेशासाठी पालकांचीही गर्दी होते. मात्र, पदवी अभ्यासक्रमात शहरातील महाविद्यालयांकडे विद्यार्थ्यांचा ओढा असल्याने ग्रामीण भागातील महाविद्यालयांमध्ये त्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत नाही असे यावेळी दिसून आले. विद्यापीठाने ५ ऑगस्टपासून पदवी प्रवेश प्रक्रियेला सुरवात केली. प्रत्यक्षात प्रवेशास सुरवात झाल्यावर केवळ नामवंत महाविद्यालयांमध्ये प्रवेश फुल्ल झाल्याचे दिसून आले. पदवी प्रथम वर्षांचे प्रवेश ३१ ऑगस्टपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण होणार होती. मात्र, इतर महाविद्यालयातील जागा रिक्त राहिल्या.

हेही वाचा: अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला आजन्म कारावास

प्रवेश झाले नसल्याने प्रवेशाला मुदतवाढ देण्याची मागणी महाविद्यालयांनी केली. त्यावर विद्यापीठाने सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर प्राचार्यांच्या संघटनेच्या मागणीवर ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर पुन्हा जागा रिक्त असल्याचे कारण समोर केल्याने आता ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत प्रवेश देण्यात येणार आहेत.

अद्यापही ३५ टक्के जागा रिक्त आहे. मात्र, या जागा रिक्त असताना, ज्या महाविद्यालयांमध्ये जागा भरल्या गेल्या त्या महाविद्यालयांनी विद्यापीठाकडे नव्या तुकड्यांसाठी अर्ज केले आहेत. जवळपास २२ महाविद्यालयांनी नव्या तुकड्यांची मागणी केली आहे.याबाबत सादर केलेल्या प्रस्तावावर चर्चाही करण्यात आली. पुढल्या शैक्षणिक वर्षापासून या तुकड्यांना मान्यता मिळण्याची शक्यता आहे.

‘एमएसस्सी, एमकॉम’साठीही प्रस्ताव

विद्यापीठाने यावर्षी संलग्नित महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया रद्द केली. त्यामुळे खासगी महाविद्यालयातील एमएसस्सी, एमकॉमच्या जागा काहीच दिवसात संपल्या. याशिवाय प्रस्ताव सादर करणाऱ्या महाविद्यालयांना २० टक्के वाढीव जागाही देण्यात आल्या. त्यावरही १० ऑक्टोबरला प्रवेश संपले. अभ्यासक्रमांना वाढती मागणी लक्षात घेता, अनेक विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयांनी वाढीव व नव्या अभ्यासक्रमांसाठी प्रस्ताव सादर केले आहेत.

loading image
go to top