Dr. Babasaheb Ambedkar Jayanti : भारताच्या वैचारिक परिवर्तनाचा महानायक

गुलामीचे जोखड झुगारून देण्यासाठी महात्मा जोतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी क्रांतिकारी लढा दिला. त्यातून देशात नवे परिवर्तनशील वैचारिक महामंथन घडून आले.
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti
Dr. Babasaheb Ambedkar Jayantisakal

जगामध्ये अनेक ठिकाणी झालेल्या क्रांतीच्या बळावर नवीन स्थित्यंतरे घडून आली. मानव हा समान असून सर्व मानवांचे हक्क समान आहेत. ही विचारगर्भिता प्रबोधन युगापासून निर्माण झाली. मानवाचे हक्क व माणूसपण नाकारणाऱ्या या व्यवस्थेने भारतीय माणसांना गुलाम केले होते.

या गुलामीचे जोखड झुगारून देण्यासाठी महात्मा जोतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी क्रांतिकारी लढा दिला. त्यातून देशात नवे परिवर्तनशील वैचारिक महामंथन घडून आले. या वैचारिक महामंथनातून आंबेडकरी विचारांच्या ज्ञानक्रांतीने आंबेडकरी चळवळ नव्या क्रांतियुद्धासाठी सज्ज झाली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जो अथक संघर्ष केला त्याला जगात तोड नाही. विद्येच्या बळावर आपण किती महान क्रांती करू शकतो, याचे वास्तववादी उदाहरण म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली क्रांती होय. त्यांनी केलेला महाड चवदार तळे सत्याग्रह, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकार्य, गोलमेज परिषदेतील प्रभावी मांडणी, स्वतंत्र मजूर पक्ष, मूकनायक, बहिष्कृत भारत, समता, जनता, प्रबुद्ध भारत अशी पत्रकारिता, वैचारिक व संशोधनात्मक लेखन, ग्रंथनिर्मिती, जातिव्यवस्थेवरील मूलगामी संशोधन, नवीन शैक्षणिक क्रांती, शेतकरी, कामगार व स्त्री यांच्या जीवनाला दिले बळ, भारतीय संविधान निर्माता, बौद्ध धम्माचा स्वीकार, शेड्यूल कास्ट फेडरेशन आणि कायदा मंत्रिपदावर असताना त्यांनी केलेले आमूलाग्र परिवर्तन, यातून नवीन ध्येय व नवीन दृष्टी भारताला मिळाली. या क्रांतितेजाने आंबेडकरी चळवळ नवा आविष्कार घडवत होती. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व धार्मिक क्षेत्रात आंबेडकरी चळवळीने नवा जोश निर्माण केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, या मूलमंत्राने बौद्ध बांधवांनी अभूतपूर्व अशी वैचारिक, शैक्षणिक व वाङ्‍ममयीन झेप घेतली. देशातील प्रस्थापित मंडळी फक्त आंबेडकरवादी विचाराला घाबरतात. या चळवळीचे शक्तिस्थान म्हणजे वेदना, विद्रोह व नकार हा होय. मूलतत्त्ववादी विचारांना मुळासकटच उपटून फेकणे हा त्यांचा प्रण आहे. लोकशाही मूल्यांचा उपयोग करून नवा समतामूलक समाज निर्माण करणे. नवा भारत देश बनविण्यासाठी आंबेडकरी चळवळ अत्यंत महत्त्वाचे काम करत आहे.

आंबेडकरी विचारप्रवाहातूनच नव्या संघटना निर्माण झाल्या. आंबेडकरवादी साहित्याने मराठी साहित्याला जागतिक परिप्रेक्ष्याच्या शिखरावर नेले. जीवनवादी वास्तवगर्भी लेखनातून माणसाचे होणारे शोषण, अन्याय, अत्याचार यावर ताशेरे ओढले. नवा मूल्यवर्धन समाज तयार केला. राजकीय क्रांतीला नवा आयाम दिला. आंबेडकरी चळवळीतून समाज उत्थानाचा नवा बदल होत असताना आंबेडकरी चळवळीमध्ये शिरलेल्या मीपणाच्या अहंकाराने आज आंबेडकरी चळवळीची दशा व दिशा अत्यंत शोचनीय बनली आहे.

पण आज आंबेडकरी चळवळीला चिंतनात्मक विचारांची गरज आहे. आपण कुठे चुकलो याचे आत्मनिरीक्षण करायचे आहे. समाजामधील होणाऱ्या अन्याय अत्याचारावर पेटून उठायचे आहे. आपण व आपला परिवार इतके विश्व न पाहता भारत देशातील इतर समूहातील आंबेडकरवादी व्यक्ती आपला बंधू आहे. त्यांच्या दुःखात सहभागी होणे, त्याला सहकार्य करणे हेच आपले परम कर्तव्य आहे.

देशातील राजकारणाची व समाजकारणाची दिशा ओळखून नवा आकृतिबंध तयार करून समदुःखी लोकांना सोबत घेऊन नवे आयुध निर्माण करणे ही काळाची गरज आहे. तेव्हाच आंबेडकर चळवळीला सोन्याचे दिवस येतील. बौद्ध धम्माच्या क्रांतिगर्भातच मानवमुक्तीचा नवा प्रबुद्ध भारत निर्माण होईल. आंबेडकरी चळवळ म्हणजे धगधगती क्रांतिज्वाला आहे. आंबेडकर चळवळीला नव्या क्रांतिगर्भाची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com