esakal | माय त् अवघं जीवनच रिकामं झालं! मुलांच्या मृत्यूनंतर आई व आजीने फोडला हंबरडा
sakal

बोलून बातमी शोधा

माय त् अवघं जीवनच रिकामं झालं! आईने फोडला हंबरडा

माय त् अवघं जीवनच रिकामं झालं! आईने फोडला हंबरडा

sakal_logo
By
अनिल यादव

आमगाव देवळी, हिंगणा (जि. नागपूर) : ‘‘अभिषेक आणि आरूषी हेच आमचं जीवन आणि सर्वस्व होते. त्यांची भांडण, हट्ट पाहत आमचं जीवन जगणे सुरू होते. आम्ही दोघेही सायंकाळी शेतातून काम करून घरी आलो की अंगाला येऊन बिलगायचे. रात्री कुशीत झोपायचे. आता ते दोघंही सोडून गेले. आमच्या जीवनाची आशा आणि आनंदच हिरावल्या गेला. अभ्या आणि आरूषीशिवाय घरात आम्हाला कसं गमल. माय त् जीवनच रिकामं झालं’’. अशा करुण शब्दात पुष्पा राऊत दुःख व्यक्त केले. (Emotions-expressed-by-mother-and-grandmother-after-the-death-of-their-children)

विलास आणि पुष्पा राऊत यांचे दोन खोल्यांचे छोटेसे घर आहे. आमगाव-देवळी या गावात गोवारी या आदिवासींची बरीच घरे आहेत. शेतात मजुरी करून जे पैसे येतात त्यावरच संसाराचा गाडा सुरू आहे. रविवारी दोघेही कामासाठी गेले. अभिषेक आणि आरूषी घरीच असायची. शेजारची सारीच मुलं एकत्र खेळत असल्याने फार चिंता नव्हती. पण बालपणच ते! दुर्देव म्हणजे मुलांची आजी कोरोना लस घेण्यासाठी दोन दिवसांपूर्वीच नागपूरला हजारीपहाड येथे राहणाऱ्या मुलीकडे गेली होती. दिवसभर दोघेही आजीसोबत राहायचे. आजीच्या नजरेसमोर असायची. पण वेळ सांगून येत नसते.

हेही वाचा: दुर्दैवी! लहानग्या भावाला वाचविण्याच्या प्रयत्नात बहीणही बुडाली

सायंकाळी विलास आणि पुष्पा शेतावरून आल्यानंतर घराचा दरवाजा बंद होता. एरवी मायच्या पदराशी बिलगणारा अभिषेक आणि आरूषी दिसत नव्हते. घरातील किलबिलाट शांत होता. शेजारी असतील किंवा मित्रांसोबत खेळत असतील म्हणून थोडावेळ प्रतीक्षा केली. जास्तच उशीर झाल्याने पुष्पा यांच्या मनात शंकेने घर केले. अचानक दोघेही बेपत्ता झाल्याने त्यांचे काळीच चरकले.

सर्वत्र शोधाधोश सुरू झाली. रात्री दोन वाजेपर्यंत गाव आणि आजूबाजूच्या परिसरात शोध सुरू होता पण काहीच पत्ता लागला नाही. दोघेही पती-पत्नी रात्रभर झोपले नाही. असतील, सापडतील म्हणून त्यांना शेजारचे सांत्वना देत होते. सोमवार उजाडला आणि पुन्हा शोध सुरू झाला. सकाळी ८ वाजताच्या सुमारास नाल्याच्या काठावर दोघांचे कपडे दिसल्याने पुष्पा यांनी हंबरडा फोडला. त्यांच्या काळजाचे तुकडे या जगातून निघून गेले होते. दोन्ही पिटुकले सोडून गेल्याने माऊलीच्या दुःखाला पारावार उरला नाही.

हेही वाचा: जिवंतपणीच चौकाला दिले ‘अण्णा मोड बस थांबा’ हे नाव; वाचा अण्णाचे कर्म

...आजीला जीवनभराचे दुःख

आजी-आजोबा नातवंडांमध्ये आपल्या मुला-मुलीची प्रतिमा शोधत असतात. आजी लीलाबाई यांची अभिषेक आणि आरूषी अत्यंत लाडकी होते. दोघेही आजीला बिलगून असायची. आई-बाबा कामावर गेल्यानंतर दुपारी आजीसोबतच झोपायची. ‘‘कोरोना इंजेक्शन घेण्यासाठी मी नागपूरला गेली होती. मी घरी असती तर दोघेही माझ्या पदराआड असती. मी का गेली याचे शल्य जीवनभर माझ्या मनाला बोचत राहील. गेल्यावर्षी वीज पडून माझ्या घरातील एक जण मरण पावला. आता माझी चिमुकले गेली’’ असा शब्दात लीलाबाई राऊत यांनी शोक व्यक्त केला.

(Emotions-expressed-by-mother-and-grandmother-after-the-death-of-their-children)

loading image