प्रशिक्षणार्थी डॉक्‍टर महोदयांचा "इगो' दुखावला अन्‌ गाठले पोलिस ठाणे

Employee beaten up by trainee doctors at a super hospital
Employee beaten up by trainee doctors at a super hospital

नागपूर : मेडिकलशी संलग्न सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मंगळवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान प्रशिक्षणार्थी डॉक्‍टरांनी बाह्यरुग्ण विभागात कर्तव्य बजावत असलेल्या लिपिकाला खिडकीतून ओढून मारहाण केल्याची घटना घडली. विशेष असे की, या कर्मचाऱ्याला ओढत बाहेर नेण्याचा प्रयत्न चार ते पाच प्रशिक्षणार्थी डॉक्‍टरांनी केला. कर्मचाऱ्याला मारहाण होत असल्याचे बघून तंत्रज्ञ, परिचारिका व इतर कर्मचारी धावून आले. संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी कामबंदची घोषणा केली. साडेबारानंतर सुपरमधील रुग्णसेवा विस्कळीत झाली. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा पोहोचल्याने हा तणाव निवळला. अधिष्ठाता कक्षात सुमारे दोन तास या प्रकरणावर चर्चा झाली. शरद साबळे असे मारहाण झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. 

मंगळवारी सकाळी 8 वाजता बाह्यरुग्ण विभागात कार्ड काढत रुग्णांच्या नोंदीचे काम सुरू झाले. सकाळी नऊ वाजता येथे एक प्रशिक्षणार्थी (आंतरवासिता) डॉक्‍टर आजारी महिला नातेवाइकाला उपचारासाठी सुपरमध्ये घेऊन आला. अंगात डॉक्‍टरांचा पांढरा कोट नव्हता. त्याच्या वेशभूषेवरून तो डॉक्‍टर आहे, हे स्पष्ट न झाल्याने कर्मचाऱ्याने रांगेत उभे राहण्याची विनंती केली. विशेष असे की, गंभीर रुग्ण नसल्यामुळे थांबता येते असे सुचविले. यामुळे या प्रशिक्षणार्थी डॉक्‍टर महोदयांचा "इगो' दुखावला गेला. या कारणावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. 

डॉक्‍टर येथून निघून गेला. मात्र, सुमारे साडेबाराच्या दरम्यान अपमानाचा वचपा काढण्यासाठी तो चार ते पाच प्रशिक्षणार्थी डॉक्‍टरांना घेऊन आला. कार्डाच्या नोंदी करत असलेल्या शरदची कॉलर पकडून त्याला खिडकीतून बाहेर ओढले. साऱ्यांनी मिळून शरदला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याला जबरदस्तीने प्रवेशद्वाराच्या बाहेर नेण्याचा प्रयत्न यांनी सुरू केला. परंतु, शरद ओरडला. इतर कर्मचाऱ्यांचे लक्ष जाताच सारे धावून आले. आरडा-ओरड सुरू झाली. प्रशिक्षणार्थी डॉक्‍टर पसार झाले. महाराष्ट्र गव्हर्नमेंट विदर्भ नर्सेस असोसिएशनच्या अध्यक्ष कल्पना विंचूरकर यांच्यासह इतर तंत्रज्ञ व कर्मचारी वर्गाने कामबंद आंदोलन सुरू केले. 

कर्मचारी धडकले पोलिस ठाण्यात

सुपर स्पेशालिटीतील कर्मचारी येथील अधिष्ठाता कार्यालय परिसरात गोळा झाले. प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. दोषी डॉक्‍टरांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, पोलिसांत तक्रार करावी अशी मागणी केली. मात्र, प्रशासनाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतरच पुढची कारवाई होईल, असे संकेत दिले. यामुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा मोर्चा अजनी पोलिस ठाण्याच्या दिशेने वळला. दरम्यान, दीडशेवर प्रशिक्षणार्थी डॉक्‍टर अचानक सुपरच्या आवारात आले. कर्मचारी आणि डॉक्‍टर आमनेसामने आल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली. अधिष्ठातांनी प्रशिक्षणार्थी डॉक्‍टरांना सुपरच्या बाहेर जाण्याचा आदेश दिला. याची माहिती अजनी पोलिस ठाण्यात पोचली, परंतु अजनी पोलिस दुपारी साडेचार वाजतापर्यंत येथे पोचले नव्हते. अखेर महाराष्ट्र गव्हर्नमेंट विदर्भ नर्सेस असोसिएशनच्या अध्यक्ष कल्पना विंचूरकर, विदर्भ वैद्यकीय महाविद्यालय आरोग्य कर्मचारी संघटनेचे त्रिशरण सहारे, महात्मा फुले अनुसूचित जाती जमाती महासंघाचे आर. सी. अंभोर, रामू रगडे अजनी पोलिस ठाण्यावर धडकले. या घटनेची तक्रार दिली. कामबंद आंदोलनामुळे रुग्णांच्या ईसीजी, रक्त चाचण्यांसह इतरही तपासण्या खोळंबल्या.

अधिष्ठात्यांसह वरिष्ठ डॉक्‍टरांनी गाठले सुपर

घटनेची माहिती मिळताच मेडिकल-सुपरचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा घटनस्थळी तत्काळ पोहोचले. सुपरचे विशेष कार्य अधिकारी डॉ. मिलिंद फुलपाटील रजेवर असल्याने प्रभारी विशेष कार्य अधिकारी डॉ. संजय सोनुने, गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी विभागप्रमुख डॉ. सुधीर गुप्ता, हृदयरोग विभागाचे डॉ. मुकुंद देशपांडे यांच्यासह इतरही विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने दोन्ही गटाशी संवाद साधत स्थिती नियंत्रणात आणली. यावेळी कर्मचाऱ्यांनी गुन्हा नोंदवण्याची मागणी लावून धरली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com