
जलालखेडा (जि. नागपूर) : नरखेड व काटोल तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली होती. कापसाच्या त्रासापायी शेतकरी सोयाबीनकडे वळला होता. पण फुले येईपर्यंत जोमात असलेले सोयाबीन शेंगा येईपर्यंत कोमात गेले व शेतकरी हतबल झाला. तसेच त्याचे नगदी पीक मोसंबी देखील गळल्यामुळे शेतकरी आता संपूर्णपणे खचला आहे.
आता याचे श्रेय घेण्यासाठी सत्ताधारी व विरोधी पक्षाचे निवेदने देणे सुरु झाले. शेतात जाऊन पाहणी केली व मागणी करण्यात येत आहे. कृषीमंत्र्यांपासून तर तालुका कृषी अधिकारी यांचे पाहणी दौरे झाले. पण आता पाहणी खूप झाली. आता शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत करण्याची मागणी हतबल झालेला शेतकरी करीत आहे.
नरखेड व काटोल तालुक्यात ३० हजार हेक्टरमध्ये यावर्षी सोयाबीनची पेरणी करण्यात आली होती. पण ऐन तोंडाशी आलेल्या घासावर निसर्गाची अवकृपा झाली व पिक पिवळे पडून वाळण्यास सुरुवात झाली. जून महिन्यात पाऊस सुरु झाला नंतर बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणी केली. काही शेतकऱ्यांना बियाणे उगवले नसल्यामुळे दुबार पेरणी देखील करावी लागली होती. यात जुलै महिन्यात पावसाचा खंड पडला. पण त्यावेळस पिकला पावसाची गरज असते. बऱ्याच शेतकऱ्यांनी कमी दिवसात येणाऱ्या वाणाची पेरणी केली होती. पण हेच पिक आता नष्ट झाले आहे.
शासनाकडून महाबीज बियाणे पुरेसे मिळाले नसल्यामुळे शेतकऱ्यांनी खासगी बियाणे कंपनीचे बियाणे खरेदी केले, पण त्याबाबतचे बुकलेट मात्र शेतकऱ्यांना देण्यात आले नाही. सोयाबीन या पिकावर जुलै महिन्यात खोडअळी तसेच चक्रीभुंगा या कीटकांनी या पिकाचे शोषण करण्यास सुरुवात केली. त्याचा परिणाम ऑगस्ट महिन्यात दिसण्यास सुरुवात झाला. फुलधारणा झाल्यानंतर शेंगा भरण्याच्या अवस्थेत उभे पिक पिवळे पडून सुकण्याच्या मार्गात असल्याचे चित्र शेतात आहे. आता कृषी विभागाचे व कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ हे प्रत्यक्ष पाहणी करीत आहे. हे जर जुलै महिन्यात केले असते व शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन केले असते तर शेतकऱ्यांचे सोयाबीनच्या पिकाचे नुकसान टाळता आले असते. अशीच अवस्था संत्रा व मोसंबी फळ पिकाची झाली आहे.
मागील एक आठवड्यात पिकाचे नुकसान झाल्यानंतर मात्र तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक, कृषी विभागाचे सहसंचालक व कृषी मंत्री या सर्वांनी पिकाचे नुकसानाची पाहणी केली. याचबरोबर लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ यांनी देखील पाहणी केली. सत्तापक्ष व विरोधक हे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले. इतकेच नव्हे तर निवेदन देखील दिले गेले. पण आता हे नाटक पुरे झाले, जे जेव्हा करायला पाहिजे होते तेव्हा केले नाही, आता करून काही उपयोग? या पेक्षा शेतकऱ्यांना शासनाकडून व विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळून देण्यासाठी प्रयत्न होण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
विदर्भाच्या शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील लहान शेतकऱ्यांचे रोख पिक सोयाबीन आहे. तसेंच मोठी रक्कम देणारे संत्रा व मोसंबी हे फळ पीक आहे. या शेतकऱ्यांना योग्यवेळी मार्गदर्शनाची गरज आहे. पण ही जबाबदारी टाळून यंत्रणा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पडू नये. नुकसानीची टक्केवारी न काढता सोयाबीन उत्पादक व फळ उत्पादक शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसान भरपाई शासनाकडून देण्यासंबंधी लोकप्रतिनिधींनी शासनाला भाग पाडावे.
वसंत चांडक
माजी सभापती, नरखेड
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.