नागरिकांसाठी धोक्याची घंटा; दिवाळीनंतर कोरोना वाढण्याची भीती!, प्रशासन चिंतेत

Fear of growing coronavirus after Diwali
Fear of growing coronavirus after Diwali

नागपूर : दिवाळीतील गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची भीती महापालिकेतील अधिकारी व्यक्त करीत आहेत. विशेष म्हणजे आतापर्यंत कोरोनाची लागण न झालेल्यांसाठी ही गर्दी धोकादायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची चर्चा आहे.

शहरात आतापर्यंत ७४ हजार नागरिक बाधित आढळून आले असून, दोन हजार १३७ नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. गेल्या काही दिवसांत बाधित व बळींचा आलेख घसरला. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत काही प्रमाणात घट झाली. मात्र, दसरा होताच दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी बाजारात गर्दी उसळत आहे. बाधित अन् बळींची दररोजची संख्या घटल्याने नागरिकही जणू कोरोना संपुष्टात आल्याच्या आविर्भावात दुकानांमध्ये गर्दी करीत आहेत.

शहरातील सीताबर्डी, महाल, इतवारी, धरमपेठ, इंदोरा या सारख्या भागातील दुकानांमध्ये नागरिकांची कपडे, घर सजावटीचे साहित्य खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. नागरिकांकडून मास्कचा तर दुकानदारांकडून सॅनिटायजरचा वापर होत असला तरी सोशल डिस्टन्सिंगचा नियम पायदळी तुडविला जात आहे. यातूनच प्रशासनाच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी याबाबत चिंता व्यक्त केली. दिवाळीच्या खरेदीसाठी आतापर्यंत घरांमध्ये सुरक्षित असलेल्या गृहिणी, ज्येष्ठ नागरिकही बाहेर पडत आहेत. घरांमध्ये असल्याने आतापर्यंत कोरोनाची त्यांना लागण झाली नाही. परंतु, गर्दीमधून नागरिकांच्या घरापर्यंत कोरोना पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.

ज्यांना कोरोनाची बाधा झाली अन् त्यातून बरे झाले, अशांची रोगप्रतिकार शक्ती वाढली. त्यांना धोका नाही. परंतु, ज्यांना आतापर्यंत कोरोनाची बाधा झाली नाही, अशा नागरिकांना जास्त धोका असून त्यांनी संयम बाळगण्याची गरज जोशी यांनी व्यक्त केली. गेल्या काही दिवसांत बाधित व बळींच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाल्याने काहीसे सुखावलेले महापालिका व आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांपुढे दिवाळीनिमित्त होत असलेल्या बाजारातील गर्दीने मात्र डोकेदुखी वाढविली आहे.

फटाक्यांच्या प्रदूषणाचा बाधितांवर परिणाम

फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा दम्याच्या रुग्णांना प्रचंड त्रास होतो. कोरोनाचा थेट फुप्फुसावर परिणाम होत असल्याचे आतापर्यंत अनेक वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केले. त्यामुळे फटाक्याच्या प्रदूषणाचा बाधितांवर किंवा जे कोरोनातून बरे झाले, त्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यताही वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

कुणीही गैरसमज करून घेऊ नये
गर्दीमुळे कोरोना वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय अनेक तज्ज्ञांनी थंडीमुळेही कोरोना वाढविण्याची भीती व्यक्त केली आहे. कोरोना संपुष्टात आल्याचा कुणीही गैरसमज करून घेऊ नये. आतापर्यंत जशी काळजी घेतली, तशीच पुढेही प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे. कोरोनातून बरे झालेल्यांनीही सावध राहण्याची गरज आहे.
- डॉ. अविनाश गावंडे,
वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com