esakal | प्रेमातील एका चुकीने संसाराचे झाले वाटोळे, प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल

बोलून बातमी शोधा

 crime news
प्रेमातील एका चुकीने संसाराचे झाले वाटोळे, प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : एकाच गावात आणि शेजारीच राहणाऱ्या युवक व युवतीचे सूत जुळले. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. सोबत जगण्या-मरण्याच्या आणाभाका घेतल्या. मात्र, कुटुंबीयांना कुणकुण लागताच युवतीच्या प्रेमास विरोध दर्शवला. तसेच घाईगडबडीत तिचे लग्न नागपुरातील तरुणाशी उरकून टाकले. प्रेयसीचा विरह सहन न झाल्याने प्रियकराने तिच्यासोबत घालविलेल्या क्षणांचे (अश्‍लील फोटो आणि व्हिडिओ) पती आणि नातेवाइकांना पाठवले. याप्रकरणी प्रेयसीच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला. किशोर मनोहर घाडगे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्रियकराचे नाव आहे.

हेही वाचा: नागपूरकरांनो घाबरू नका! बाधितांची संख्या होतेय कमी; कोरोनावर मात करणाऱ्यांचं प्रमाण अधिक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १९ वर्षीय विवाहित युवती रिया (बदललेले नाव) नरखेड तालुक्यातील एका खेड्यात राहते. तिचे नुकतेच बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. त्याच गावात आरोपी किशोर घाडगे हा शेजारी राहतो. गेल्या दोन वर्षांपासून दोघांचे प्रेमसंबंध होते. त्यांच्या प्रेमसंबंधाची चर्चा गावभर होती. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. या दरम्यान किशोरने प्रेयसीचे अश्लिल फोटो आणि व्हिडिओ काढले. दरम्यान, दोघांच्या प्रेमाची कुणकुण कुटुंबीयांना लागली. त्यांनी किशोर आणि रियाची समजूत घातली. काही दिवस दोघांनीही एकमेकांशी संपर्क केला नाही. परंतु, काही दिवसांतच एकमेकांचा विरह सहन झाला नाही. त्यामुळे त्यांचे पुन्हा प्रेम बहरले.

हेही वाचा: 'मी माझं आयुष्य जगलो', ८५ वर्षीय आजोबाने दिला तरुणाला बेड अन् स्वतः पत्करले मरण

रियाचे ठरवले लग्न -

रियामुळे गावात होणारी बदनामी आणि किशोरचे वाढलेले प्रेम बघता कुटुंबीयांनी रियाचे लग्न पटकन उरकून टाकण्याचा निर्णय घेतला. त्यांनी घाईघाईत नागपुरातील बोरगावात राहणाऱ्या एका युवकाशी लग्न ठरवले आणि डिसेंबर २०२० मध्ये लावून दिले आणि मोकळे झाले. तिने किशोर याच्यासोबत संबंध तोडले. त्यामुळे किशोर संतापला. त्याने तरुणीचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ तिच्या नातेवाइकांच्या व्हॉट्सअ‌ॅपवर व्हायरल केले. तरुणीला याबाबत माहिती मिळाली. तिने गिट्टीखदान पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे

संसाराचे झाले वाटोळे -

नातेवाइकांच्या व्हॉट्सअ‌ॅपवर अश्लिल फोटो आल्याने त्यांनी रियाला विचारणा केली. तिने चुकी कबूल करीत किशोरच्या कृत्याबाबत कल्पना दिली. त्याने रियाच्या पतीलाही अश्‍लील फोटो पाठवले. त्यामुळे घरातील वातावरण बिघडले. प्रेमात केलेल्या एका चुकीमुळे रियाचा संसार तुटण्याच्या मार्गावर आहे.