Firing By Lover : गोळी झाडली अन् गोळी बंदुकीतच अडकली; प्रेयसी थोडक्याच बचावली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Firing

गोळी झाडली अन् गोळी बंदुकीतच अडकली; प्रेयसी थोडक्याच बचावली

नागपूर : ‘मी तुझ्यावर प्रेम केले... निभवणंही गरजेचं आहे... तू माझी आहेस... माझ्याशी बोल...’ अशी सुरवातीला विनवणी केली. मात्र, प्रेयसी ऐकत नसल्याने संतप्त झालेल्या त्या प्रेमवीराने तिच्या कानशिलावर बंदूक रोखली. गोळी झाडली, परंतु गोळी बंदुकीतच अडकून राहिली. यामुळे मोठा अनर्थ टळला. प्रेयसीने आरडाओरड करताच आरोपी हवेत गोळ्या झाडत पळून गेला. परंतु, या घटनेने मेडिकलमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

मेडिकलमधील ई-लायब्ररीच्या समोरच्या मोकळ्या परिसरात दुपारच्या समयी घटलेली ही घटना. हातात बंदूक घेऊन आलेल्या त्या प्रेमवीराचे नाव विक्की चकोले असे आहे. मुळचा खापरखेडा येथील वलनी भागातील. तर मुलगी अर्थात प्रेयसी प्रिया (बदललेले नाव) मेडिकलच्या २०१७ सालच्या बॅचलर ऑफ पॅरामेडिकल (बीपीएमटी)अभ्यासक्रमाला होती. सद्या ती इंटर्नशिप करीत आहे.

हेही वाचा: सेक्समुळे स्पेनचा समुद्रकिनारा झाला उद्ध्वस्त; आढळले २९८ स्पॉट

विक्की आणि प्रिया हे दोघेही पूर्वाश्रमीचे मित्र. फेसबुकवरून यांची मैत्री जुळली. या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. मात्र अल्पकाळात ब्रेक अप झाले. चार महिन्यांपासून विक्की आणि प्रिया यांचे संबंध तुटले होते. मात्र ई-लायब्ररीमध्ये अभ्यास करून निघाल्यानंतर अचानक विक्की तिच्यासमोर उभा झाला. हात पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने हात झटकला.

लगेच प्रेमाच्या आणाभाका करीत होता, मात्र तीने त्याला टाळत निघून जात होती. यामुळे त्याने स्वतःच्या कानशिलावर बंदूक ठेवली मै मर जाऊंगा अशी धमकी दिली, मात्र या धमकीला भीक न घातल्याने लगेच विक्कीने प्रियाच्या कानशिलावर बंदूक रोखली. दरम्यान बंदुकीतून गोळी झाडली, परंतु बंदूक लॉक झाल्यामुळे गोळी सुटली नाही. यामुळे भयभीत झालेल्या प्रियाने आरडाओरड केली.

लायब्ररीत अभ्यास करीत असलेले सर्व विद्यार्थी बाहेर आले. मात्र या वेळात प्रियकर पळून जाण्यात यशस्वी झाला. या प्रकरणी अजनी पोलिस ठाण्यात कलम ३०७ नुसार खूनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. फरार विक्कीच्या शोधासाठी पोलिसांचे सहा पथक पाठवण्यात आल्याची माहिती अजनीचे ठाणेदार विजय तलवारे यांनी दिली.

हेही वाचा: दारूसोबत चकणा म्हणून या पदार्थांचे तर सेवन करत नाही ना?

मेडिकलची सुरक्षा धोक्यात

पहिल्यांदा मेडिकलमध्ये विद्यार्थिनीवर गोळी झाडण्याचा प्रकार घडला. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे. तर नुकतेच सुरक्षेच्या समस्येवरून मार्डच्या निवासी डॉक्टरांनी आठ दिवसांपूर्वी संप पुकारला होता. सुरक्षारक्षक वाढवून देण्यात येईल, असे आश्वासन मेडिकल प्रशासनाकडून निवासी डॉक्टरांना देण्यात आले. मेडिकलमध्ये महाराष्ट्र सुरक्षा बलाचे ६९ जवान तैनात आहेत. यात वाढ करून अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांनी नुकतेच ९८ सुरक्षा रक्षकांच्या मागणीचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाकडे सादर केला आहे. लवकरच वाढीव सुरक्षारक्षक मेडिकलमध्ये उपलब्ध होतील अशा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला.

बंदूक लॉक झाली नसती तर...

विक्कीने बंदूक कमरेला खोचली होती. पूर्वाश्रमीची मैत्रिण अन प्रियाची मनधरणी केली. नंतर मात्र ऐकत नसल्याने ‘गेम’ करण्याचा निर्णय घेतला होता. वाट चुकलेल्या संतप्त झालेल्या प्रियकराने प्रेमाची मागणी घातली. परंतु, तिने नकार देताच त्याने थेट तिच्या कानशिलावर बंदूक रोखली. ट्रिगर दाबला. मात्र, नशिब बलवत्तर होते. ट्रिगर दाबताच बंदूक लॉक झाली. त्यामुळे पिस्टलमधून गोळी सुटली नाही. त्याने दोन ते तीन वेळा ट्रिगर दाबला. परंतु, बंदूक लॉक झाल्यामुळे प्रियाचा जीव वाचला.

तीन गोळ्या झाडल्या?

मेडिकलमधील आंतरवासिता अर्थात प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची संघटना असलेल्या स्टुडंट काऊंसिल ऑफ मेडिकलच्या पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आरोपी वाचनालय परिसरातून पळून जाताना तीन गोळ्या झाडल्याचा आवाज झाला. विद्यार्थ्यांनी त्याचा पाठलाग केला, परंतु आरोपी पसार झाला. मेडिकलला महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान प्रवेशद्वारावर तैनात असतात, असे असताना आरोपी बंदुकीसह परिसरात पोहचला कसा? येथील सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या विषयावर अधिष्ठातांना निवेदन देण्यासाठी संपर्क साधला, परंतु योग्य प्रतिसाद मिळाला नसल्याची भावना व्यक्त करीत मंगळवारी अधिष्ठातांशी भेट घेण्यात येईल. तातडीने सुरक्षा वाढवण्याची मागणी केली जाईल. प्रतिसाद न मिळाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला आहे.

loading image
go to top