खांद्यावरचे चऱ्हाट, हातातील कुऱ्हाड हरवली; अंधारात आयुष्य जगणाऱ्या गोंड वस्तीची व्यथा

देश स्वतंत्र होऊन 75 वर्षे झाली तरी गोंड वस्तीतील हाडामासांच्या माणसांच्या नशिबी मात्र यातनाच आहेत.
Gond
Gond Sakal

नागपूर : ही बिनचेहऱ्यांच्या माणसांची वस्ती. ‘गोंड वस्ती’ असे नावं. दोनशे दहा घरं. घरं कसले, बांधलेल्या आड्यावर प्लास्टिक, फाटक्या कपड्यांनी पांघरूण घातलेल्या झोपड्या. उघड्यावरच बांधलेली आंगधुनी. वस्तीत शिरले की, किळस येते अन आपोआपच रुमाल काढण्यासाठी हात खिशात जातात. सारी उघडीनागडी काळपट पोरं सताड खेळताना दिसतात. प्रत्येक झोपडीतील कर्त्या पुरुषांचा एकच व्यवसाय होता. खांद्यावर चऱ्हाट अन हातात कुऱ्हाड घेऊन झाडे तोडणे. परंतु पोलिस पकडतात, जेलमध्ये रवानगी करतात, यामुळे हे काम सुटले आणि आता कुटुंबाच्या पोटासाठी मिळेल ते काम करण्यासाठी सूर्याने डोके वर काढण्यापूर्वीच झोपडी सोडून ठिय्यावर मेहनत विकण्यासाठी उभे होतात.

अंधारात आयुष्य जगणाऱ्या या गोंड वस्तीची कथाच न्यारी. इंग्रज गेले, देश स्वातंत्र्य झाला, वरपासून तर खालपर्यंत लोकशाही झिरपली. निवडणूक होते, मात्र या गोंड वस्तीत, निवडणूक आली की, हातात हिरवी नोट, दोन चार ठुसे असलेल्या मटनाच्या रस्स्याने भरलेली वाटी, दारूचा पव्वा भेटला की, बस्सं....पुढची पाच वर्षे बोंबलत बसा, अशी अवस्था यांची हाय. ३० वर्षांपासून वसलेल्या या गोंडवस्तीत स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीनंतरही पारतंत्र्यातील चित्र दिसते. सभोवताली दगड विटांच्या इमारती दिसत असून मध्यभागी असलेल्या गोंड वस्तीतील हाडामासांच्या माणसांच्या नशिबी मात्र शरणावरच्या मरणाचा विदारक अनुभव येतो. (Gond Vasti: Struggling story of Gond Peoples)

Gond
रोहित पवारांनी मांडल्या पोलिसांच्या व्यथा; विधीमंडळात वेधलं समस्यांकडे लक्ष

का मिळत नाही यांना घरकुल-

येथील प्रत्येक माणसांकडे आधार कार्ड आहे. जातीचा दाखला आहे, निवडणूक कार्ड आहे, परंतु यांच्या झोपड्यांच्या जागी यांना हक्काचे घरकुल का बांधून मिळत नाही. मोकळ्या भूखंडावर अंथरूण आणि आकाशाचे पांघरूण करून गोंड वस्तीतील बायाबापडी राहतात. कोरोना काळानंतरही तग धरुन असलेली ही वस्ती घरकुलांच्या प्रतीक्षेत आहेत. या वस्तीत नळ नाही, दोन तीन हात पंप लावून दिले. त्यातील एक पंप बंद. किळसवाण्या चिखलात रुतलेला दुसरा हातपंप. या हात पंपाजवळ उभे राहणे कठीण आहे, मात्र पिण्याच्या पाण्यासाठी या वस्तीतील महिलांची गर्दी. या वस्तीतील मुलांना शाळेचा रस्ता दिसला आहे, या विद्यार्थ्यांना नवा मार्ग शोधून देण्यासाठी शासकीय मदत हवी आहे. विभागीय आयुक्त कार्यालयासह जिल्हाधिकारी कार्यालयातील सनदी अधिकाऱ्यांनी एकदा तरी या गोंड वस्तीला भेट द्यावी, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.

Gond
घिसाडी समाज महासंघाचा आझाद मैदानात मोर्चा

या वस्तीचे जगणे-

हातमजुरी करुन जगणारे, तेल-मीठ घ्यायचे ते संध्याकाळीच, घरचा कमविता माणूसगडी संध्याकाळी आपल्या मेहनतीची मिळकत घेऊन आणल्या नंतरच वस्तीतील चुली पेटतात. चुलीवरच्या विस्तवाचा जाळ मध्यरात्री पर्यंत यांच्या झोपड्यांवर दिसतो...या वस्तीतील लोकांच्या हाताला काम नसल्याने मध्यरात्रीपर्यंत झिंगत असलेली तरुणाई दिसते.

''कोणीही झाडं कटाईचे काम सांगितले की, आम्ही करतो, आमच्या खांद्यावर चऱ्हाट अन हातात कुऱ्हाड घेऊन मिळालेल्या मजुरीत आम्ही पोट भरतो. मात्र आता पोलिस, महापालिकांनी आमच्या व्यवसायावरच बंदी घातली.यामुळे खाण्याचे वांदे झाले.''

-तुफान उईके, गोंड वस्तीतील नागरिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com