esakal | वादळी पावसाचा शहरात पुन्हा धुमाकूळ; मॉन्सूनच्या पहिल्याच पावसाने उडाली तारांबळ
sakal

बोलून बातमी शोधा

वादळी पावसाचा शहरात पुन्हा धुमाकूळ; पावसाने उडाली तारांबळ

वादळी पावसाचा शहरात पुन्हा धुमाकूळ; पावसाने उडाली तारांबळ

sakal_logo
By
नरेंद्र चोरे

नागपूर : तीन दिवसांपूर्वी उपराजधानीची दाणादाण उडविणाऱ्या वादळी पावसाने शुक्रवारी पुन्हा झोडपून (Heavy rain in Nagpur) काढले. विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह बरसलेल्या मॉन्सूनच्या पहिल्या धुवाधार पावसाने नागपूरकरांची चांगलीच तारांबळ उडविली. विदर्भात आणखी दोन-तीन दिवस वादळी पावसाची शक्यता (Chance of heavy rain for two-three days) आहे. तसा इशारा हवामान विभागातर्फे (Warning from the Meteorological Department) देण्यात आला आहे. (Heavy-rains-hit-Nagpur-again)

बुधवारी चोरपावलांनी विदर्भात दाखल झालेल्या मॉन्सूनने दोन दिवस हुलकावणी दिली. मात्र, शुक्रवारी आपला खरा रंग दाखविला. पहाटे व सकाळी दमदार सरी बरसल्यानंतर रात्री चांगलाच दणका दिला. साडेआठच्या सुमारास विजांचा प्रचंड कडकडाट व मेघगर्जनेसह आलेल्या दणकेबाज वादळी पावसाने शहरात चांगलाच धुमाकूळ घातला.

हेही वाचा: किती ही हिंमत! वनविभागाच्या जमिनीवरच पाडले प्लॉट

जवळपास तासभर आलेल्या पावसाने नागपूरकरांची अक्षरशः दाणादाण उडविली. जोरदार पावसामुळे शहरातील रस्ते जलमय झाले होते. जागोजागी ट्राफिक जॅम झाले. अनेक खोलगट वस्त्यांमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांची धावपळ झाली. काही भागांत विद्युत पुरवठा खंडित झाल्याने अनेकांना बराच वेळपर्यंत अंधारात राहावे लागले. अचानक आलेल्या वादळाने अनेकांना ओल्या अंगाने घर गाठावे लागले.

सकाळी देखील शहरातील अनेक भागांत मॉन्सून बरसला. पहाटे आरंभ झालेला पाऊस सकाळी दहापर्यंत सुरूच होता. त्यानंतर दिवसभर उघड दिल्यानंतर रात्री पावसाने पुन्हा रौद्ररूप दाखविले. सकाळी व रात्री झालेल्या पावसामुळे कमाल तापमानात आठ डिग्रीची घसरण झाली. वातावरणात थंडावा निर्माण झाल्याने नागपूरकरांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला. पावसाळा सुरू झाल्याने रेनकोट व छत्र्या खरेदीसाठीही दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी पाहायला मिळाली. विदर्भात मॉन्सून सक्रिय झाल्याने बळीराजा सुखावला असून, पेरण्यांना हळूहळू सुरुवात झाली आहे.

हेही वाचा: ...म्हणून महाविकासआघाडीतून बाहेर पडा आणि महायुतीचे सरकार स्थापन करा

दोन-तीन दिवस वादळी संकट

विदर्भात वादळी पावसाचे संकट पुढील दोन-तीन दिवस कायम राहणार आहे. हवामान विभागानुसार, बंगालच्या उपसागरात चक्रवाती स्थिती निर्माण झाली आहे. हा कमी दाबाचा पट्टा मध्य भारताकडे वेगाने सरकत आहे. त्याच्या प्रभावामुळे पुढील काही दिवस विदर्भात जोरदार पाऊस अपेक्षित आहे. १२ व १३ जूनला गडचिरोली, चंद्रपूर व आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचाही अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

(Heavy-rains-hit-Nagpur-again)