
नागपूर : दोन चेंबरमध्ये साडेतीन हजार ‘लॉकर्स’
नागपूर : नागपुरातील ईतवारीत असलेल्या भुतडा चेंबर आणि गणेश चेंबरसह सहा ठिकाणी पोलिस उपायुक्त गजानन राजमाने यांनी टाकलेल्या छाप्यात ८६ लाखांची रक्कम जप्त करण्यात आली असून ३ हजार ७०० पेक्षा जास्त लॉकर्स मिळून आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इतवारीत भुतडा चेम्बर, गणेश चेम्बर आणि काही सराफा व्यापारी लॉकर्स ठेवून हवालाचा व्यापार करीत होते, अशी माहिती डीसीपी राजमाने यांना मिळाली. त्यामुळे त्यांनी शुक्रवारी छापा घालून या अवैध धंद्यांचा पर्दाफाश केला. पोलिसांना भुतडा चेंबरमध्ये १९०० लॉकर्स, गणेश चेंबर्समध्ये ९५० लॉकर्स आणि सराफा व्यापाऱ्यांकडे ७०० आणि २०० लॉकर्स मिळून आले. या लॉकर्समध्ये कोट्यवधी रुपये मिळण्याची शक्यता आहे.
पोलिसांचा बंदोबस्त
शनिवारी प्राप्तीकर विभागाचे पथक भुतडा चेंबरसह अन्य ठिकाणी कारवाईसाठी गेले. दरम्यान पोलिस बंदोबस्त लावला होता. हा तपास प्राप्तीकर विभागाकडे वळता करण्यात आला आहे. प्राप्तीकर खात्याकडून आता भूतडा आणि गणेश चेंबरमध्ये मिळालेले लॉकर्स उघडण्याची शक्यता आहे.
व्यापारी जमा करणार होता ४० लाख
एक हवाला व्यापारी ४० लाखांची रक्कम घेऊन जमा करण्यासाठी आला होता. पोलिसांनी सापळा रचला होता. मात्र, पोलिसांना पाहून त्या व्यापाऱ्याने रक्कम जमा न करता माघारी फिरला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. त्याच्या घरी नोटा मोजण्याच्या मशिन आणि ४० लाख रुपये जप्त केले. चौकशी केली असता ही रक्कम कुठून आली, याबद्दल तो योग्य उत्तरे देऊ शकला नाही. त्यामुळे ही रक्कम हवालाची असण्याची शक्यता आहे.
सर्वच लॉकर गुमास्ता परवान्यावर चालविण्यात येत होते. त्यासाठी कोणतीही परवानगी घेतली होती अथवा नाही, याची तपासणी केली जात आहे. प्राथमिक तपासणीत चुकीच्या परवान्यावर ते हा व्यवसाय करीत असल्याचे उघड झाले आहे. ते अवैध आहे. या छाप्यात १२ लोकांना ताब्यात घेतले असून त्यांना लकडगंज पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत. काही व्यापारी आपल्या व्यवसायाची रक्कम सुरक्षेच्या दृष्टीने ठेवत होते. मात्र, काही रक्कम हवाल्याची असल्याची माहिती मिळाल्याने छापे घालण्यात आले.
डॉन आंबेकरचाही पैसा लॉकरमध्ये?
सूत्रांच्या माहितीनुसार, कुख्यात डॉन संतोष आंबेकर याचीही रक्कम या लॉकरमध्ये असल्याची माहिती आहे. त्याचा राईट हॅंड राजा अरमरकर याने याच लॉकरमध्ये आंबेकरची रक्कम जमा केली होती, असा खुलासा केला होता.