esakal | लसीकरणानंतरही ११ विद्यार्थ्यांना कोरोना; ग्रामीण भागात अचानक रुग्णवाढ
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Patient

लसीकरणानंतरही ११ विद्यार्थ्यांना कोरोना; अचानक रुग्णवाढ

sakal_logo
By
केवल जीवनतारे

नागपूर : जिल्ह्यात ३ सप्टेंबरला शहरात केवळ एक कोरोनाबाधित आढळला होता. मात्र, सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसांत २० रुग्ण आढळल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे. मंगळवारी १८ नागरिकांना कोरोना झाला असून यामध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमाला असलेल्या ११ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. चिंतेची बाब म्हणजे या सर्व विद्यार्थ्यांनी कोविड लस घेतली होती. या विद्यार्थ्यांच्या संपर्कातील सर्वांना संस्थात्मक विलगिकरणात ठेवण्यात आले आहे.

तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त होत असतानाच सोमवारी १२ तर मंगळवारी १८ जणांना कोरोना झाला. मंगळवारी वानाडोंगरी येथील दत्ता मेघे मेडिकल कॉलेजमधील एमबीबीएस प्रथम वर्षातील ११ विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. या विद्यार्थ्यांच्या संपर्कातील सर्वांना संस्थात्मक विलगिकरणात ठेवण्यात आल्याचे महाविद्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा: पावसाचा कहर! विदर्भातील चार युवक गेले वाहून

जिल्ह्यातील वानाडोंगरी परिसरातील दत्ता मेघे मेडिकल कॉलेजमध्ये यावर्षीपासून एमबीबीएसची पहिल्या तुकडीचे शैक्षणिक सत्र सुरू झाले आहे. १५० विद्यार्थी क्षमतेचे हे कॉलेज आहे. त्यातील १०० विद्यार्थी वसतिगृहात तर ५० विद्यार्थी स्थानिक असल्याने त्यांच्या नागपुरातील घरून महाविद्यालयात ये- जा करीत आहेत. दुसऱ्या लाटेमुळे सुरवातीला या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग झाले.

जून-२०२१ मध्ये कोरोनाचा प्रभाव ओसरला. सोमवारी या विद्यार्थ्यांमधील २ मुलींना सर्दी, खोकला, तापासह इतर लक्षणे आढळली. त्यांची कोरोना चाचणी केली असता, बाधित असल्याचा अहवाल पुढे आला. त्यानंतर तातडीने त्यांच्या थेट संपर्कातील विद्यार्थ्यांची चाचणी केली. यात दोन मुलीसह एकूण ११ विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. या सर्व विद्यार्थ्यांनी लसही घेतली होती.

आज दिवसभरात साडेचार हजार चाचण्या झाल्या आहेत. यापैकी शहरात ८ तर ग्रामीण भागात १० जण बाधित आढळले. यामुळे जिल्ह्यात सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या ६५ वर पोहचली आहे. यापूर्वी खासगी रुग्णालयातील दोन तर सार्वजनिक आरोग्य विभागातील एका डॉक्टरला कोरोना झाला. त्यांच्यासोबत एका १६ वर्षीय मुलालाही बाधा झाली. या डॉक्टरवर एम्समध्ये उपचार सुरू आहेत.

हेही वाचा: गोंदिया : मारबत विसर्जनासाठी गेले अन् चार युवक वाहून गेले

८२ विद्यार्थ्यी विलगीकरणात

महाविद्यालय प्रशासनाने तातडीने रुग्णांना त्यांच्या कोविड रुग्णालयात दाखल केले. तर संपर्कातील सुमारे ८२ विद्यार्थ्यांना येथील वसतिगृहात विलगिकरणात ठेवले आहे. या सर्व विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात येईल. कोरोनाग्रस्तामध्ये वसतिगृहातील १० मुलींचा समावेश आहे. तर १ विद्यार्थी नागपूरच्या नरेंद्रनगर भागातील आहे. या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. कुणालाही श्वास घेण्यासह इतर असह्य त्रास नाही. त्यामुळे सर्व लवकरच बरे होण्याची आशा महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दिलीप गोळे यांनी व्यक्त केली. विलगिकरणातील प्रत्येक विद्यार्थ्यांवर डॉक्टरांचे लक्ष असून महाविद्यालयातील प्रत्यक्ष वर्ग बंद करून आता ऑनलाइन सुरू केल्याचेही त्यांनी सांगितले.

आकडे बोलतात

  • जिल्ह्यात एकूण चाचणी - ३४ लाख ५२ हजार ४८३

  • आरटीपीसीआर चाचणी -२५ लाख १३ हजार ५७३

  • रॅपिड ॲन्टिजेन चाचणी - ९ लाख ३८ हजार ९१०

  • एकूण कोरोनाबाधित - ४ लाख ९३ हजार ९०

  • एकूण कोरोनामुक्त -४ लाख ८२ हजार९०६

  • एकूण कोरोना मृत्यू - १० हजार ११९

लसीकरणानंतर कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. परंतु लसीकरणामुळे कोरोनाचा संसर्ग झालेला व्यक्ती अचानक गंभीर होणार नाही. मुलांनी १८ वर्षे वयानंतर लस घेतली असल्याचे कळले. लक्षण दिसून येऊ शकतात. वयस्क देखील दोन्ही डोस टोचून घेतल्यानंतरही कोरोनाबाधित झाले. मात्र गंभीर झाले नाही. कोरोना बचावासाठी मास्क, सॅनिटायझर व इतर खबरदारी घ्यावी.
- डॉ. प्रशांत पाटील, प्राध्यापक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर
loading image
go to top