नागपूर : उपराजधानीतील ‘कस्तुरी’चा जगभरात दरवळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

scating
नागपूर : उपराजधानीतील ‘कस्तुरी’चा जगभरात दरवळ

नागपूर : उपराजधानीतील ‘कस्तुरी’चा जगभरात दरवळ

नागपूर : अवघ्या पाच वर्षांची असताना तिने मुलांना रस्त्यावर स्केटिंग(Scating) करताना पाहिले. हा खेळ वेगळा व रोमहर्षक वाटल्याने ती त्याकडे आकर्षित झाली. गुरूंच्या मार्गदर्शनात तंत्रशुद्ध प्रशिक्षण(Tactical training) घेतले; कसून मेहनत केली आणि एकेक स्पर्धा गाजवत थेट जागतिक स्तरावर पोहोचली.

हेही वाचा: नागपूरात विदेशी प्रवास न करता ६ जण ओमिक्रॉनबाधित

ही प्रेरणादायी कहाणी आहे जागतिक स्केटिंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारी नागपूरची आंतरराष्ट्रीय महिला स्केटर कस्तुरी ताम्हणकरची. घरात कुणालाच खेळाची आवड नसल्यामुळे खेळात करिअर करण्याचा कस्तुरीने स्वप्नातही कधी विचार केला नव्हता. मात्र अचानक एक दिवस स्केटिंगबद्दल आकर्षण निर्माण झाले आणि तिची पावले मैदानाकडे वळली. कस्तुरीने सांगितले, साधारण १५ वर्षांपूर्वी गांधीसागर परिसरातील टाटा पारसी शाळेत शिकत असताना शाळेसमोरील रस्त्यावर अनेक मुले-मुली स्केटिंग करायचे. त्यांना पाहून माझ्याही मनात स्केटिंग करण्याचा विचार आला. आईबाबांकडे इच्छा व्यक्त केल्यानंतर त्यांनी स्केट घेऊन दिले, क्लबमध्ये नेले आणि तेथून माझा स्केटिंगचा खऱ्या अर्थाने प्रवास सुरू झाला. डागा ले-आउटमधील नागपूर सुधार प्रन्यासच्या स्केटिंग रिंकवर प्रवीण देशपांडे यांच्या मार्गदर्शनात प्राथमिक धडे गिरविल्यानंतर कस्तुरीने पदके जिंकण्याचा सपाटा सुरू केला. जिल्हा, विभागीय, राज्य, विद्यापीठ व राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करत तिने अल्पावधीतच आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेतली.

कस्तुरीने आतापर्यंत २४ राज्य व १७ राष्ट्रीय स्पर्धांमध्ये नागपूरचे प्रतिनिधित्व केले आहे. नॅशनल्समध्ये चार सुवर्णांसह १८ पदके तिच्या नावावर आहेत. कस्तुरीला नोव्हेंबर महिन्यात कोलंबिया (दक्षिण अमेरिका) येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करण्याचीही संधी मिळाली. दुर्दैवाने या स्पर्धेत तिला पदक जिंकता आले नाही. मात्र, ६० देशांतील अव्वल खेळाडूंमध्ये वैयक्तिक गटात २५ वे स्थान पटकावून तिने निश्चितच आपली छाप सोडली. ही आपल्यासाठी फार मोठी गोष्ट असल्याचे ती म्हणाली. सध्या यशराज स्पीड स्केटिंग अकादमीचे प्रशिक्षक यशराज आनंद यांच्या तालमीत सराव करणाऱ्या कस्तुरीने भविष्यात देशासाठी पदक जिंकण्याचा मानस बोलून दाखविला.

हेही वाचा: गाझीपूर जिल्ह्यात ट्रकच्या भीषण अपघातात 6 जणांचा मृ्त्यू

लॉकडाउनमध्येही फिटनेस कायम

लॉकडाउन काळात शहरातील बहुतांश ‘स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज बंद होत्या. परंतु कस्तुरी अजिबात शांत बसली नाही. घराजवळील खुल्या जागेत तिने सकाळ-संध्याकाळ सराव करून स्वतःला सतत बिझी ठेवले. शिवाय फावल्या वेळेत रनिंग, सायकलिंग व इतर वर्कआउट करून फिटनेस कायम राखले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nagpur
loading image
go to top