esakal | भाऊबीजेच्याच दिवशी भावाला अखेरचा निरोप, हुतात्मा जवान भूषण सतईंच्या बहिणीचा टाहो
sakal

बोलून बातमी शोधा

martyr soldier bhushan satai sister reaction in nagpur

घरचा कर्ता मुलगा गेल्याने आता आम्ही मजूर-मायबापांनी कोणाकडे पाहायचे? असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. दरम्यान, हुतात्मा जवान भूषण सतई यांच्या पार्थिवावर दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार झाले.

भाऊबीजेच्याच दिवशी भावाला अखेरचा निरोप, हुतात्मा जवान भूषण सतईंच्या बहिणीचा टाहो

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : माझ्या भावाने देशासाठी जीवाची बाजी लावली याचा मला सार्थ अभिमान आहे. मात्र, भाऊबीजेच्या दिवशी भावाला अखेरचा निरोप द्यावा लागेल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. भावाला निरोप देताना ती, तिच्या आईने टाहो फोडला. घरचा कर्ता मुलगा गेल्याने आता आम्ही मजूर-मायबापांनी कोणाकडे पाहायचे? असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. दरम्यान, हुतात्मा जवान भूषण सतई यांच्या पार्थिवावर दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार झाले.

हेही वाचा - 'एम्स’मध्ये सुरू झाले हृदयावर उपचार; तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती

श्रीनगरमधील गुरेज सेक्टर येथे पाकिस्ताने केलेल्या भ्याड हल्ल्यात नागपूर जिल्ह्यातील काटोलचे सुपूत्र जवान भूषण सतई यांना वीरमरण आले. घरी दिवाळीची तयारी सुरू होती अन् ऐन दिवाळीच्या पूर्वसंध्येला जवानाच्या वीरमरणाची बातमी समजली. त्यामुळे कुटुंबीयांसह संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला. देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आले असून ते केवळ २८ वर्षांचे होते. 

हेही वाचा - अखेरचाच ठरला ‘भूषण’चा वाढदिवस; आज शासकीय इतमामात अंतिम संस्कार

भूषण सतई यांनी महाविद्यालयात असतानाच सैन्यात भर्ती होण्यासाठी तयारी केली होती. ते वयाच्या वीसाव्या वर्षी भारतीय सैन्यात सहभागी झाले होते. दिवाळीच्या पूर्वसंध्येला गुरेज सेक्टरमध्ये भूषण कर्तव्य बजावत होते. यावेळी पाकिस्तानी लष्कराने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. त्यावेळी भारतीय जवानांनी शत्रूला जोरदार प्रत्युत्तर दिले. यामध्ये तीन सामान्य नागरिकांसह आठ भारतीय जवानांना वीरमरण आले. यामध्ये भूषण सतई यांचाही समावेश आहे. त्यांचे पार्थिव रविवारी वायूसेनेच्या विमानाने नागपुरात दाखल झाले. त्यानंतर कामठी रेजिमेंट येथे त्यांना मानवंदना देण्यात आली. आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळगावी आणण्यात आले. त्यानंतर काटोल शहरातून त्यांची शवयात्रा प्रस्थान झाली. काटोल नगरपरिषेदेच्या आयुडीपी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

संपादन - भाग्यश्री राऊत

loading image