शेतकऱ्यांच्या संकटात आणखी बोंडअळीची भर, उत्पन्न होणार कमी

file
file

जलालखेडा (जि.नागपूर)ः नरखेड तालुक्यात गेल्या पाच वर्षांत नैसर्गिक आपत्ती, ओला व कोरडा दुष्काळ, २०१७ मध्ये गुलाबी बोंडअळी, तर यंदा कोरोनाच्या संकटात शेतकरी सापडले आहेत. यात सोयाबीन हातचे गेले. मोसंबी गळाली, संत्र्याला भाव नाही व तो ही आता गळत आहे. हे संकट ताजे असतानाच आता पुन्हा गुलाबी बोंडअळीचे संकट आले आहे. तालुक्यातील अनेक भागांत बोंड अळीची संख्या वाढली असल्यामुळे आर्थिक नुकसान परिस्थितीच्याही वर गेले आहे. शिवाय अवकाळी पावसाने कपाशीवर बोंडअळी दिसून येत आहे.

अधिक वाचाः खरंच का सरकार! शेतकऱ्यांची दिवाळी साजरी होईल का?
 

कापूस विकण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची सर्कस
नैसर्गिक संकटांना तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांसमोर गेल्या तीन वर्षांपासून फवारणीतून विषबाधा, गुलाबी बोंडअळी, त्यानंतर आता कोरोनाचे संकट घोंघावत आहे. गेल्या २०१७ मध्ये गुलाबी बोंडअळीने शेतकऱ्यांना गारद केले होते. त्यानंतर करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे दोन वर्षांपासून याला 'ब्रेक' लागला आहे. बोंडअळी तयार होण्याची साखळी खंडित करण्यात आली होती. मात्र, यंदा पुन्हा एकदा बोंडअळीचे आक्रमण झाले आहे. कोरोनामुळे ऑगस्ट महिन्यापर्यंत काही शेतकऱ्यांच्या घरात कापूस शिल्लक होता. जिनिंगमध्ये कापसाची आवक वाढल्याने ढीग होत होते. कापूस विकण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची सर्कस करावी लागली.

हे आहे कारण...
 गुलाबी बोंड अळीचे धोका असल्यामुळे या ठिकाणी कामगंध सापळे किंवा लाइट ट्रॅप लावणे आवश्‍यक आहे. मात्र,  या बाबींची खबरदारी घेण्यात आलेली नाही. परिणामी, तालुक्यातील अनेक भागांत बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. गेल्या दोन वर्षांत शासनाने खबरदारी घेतली होती. बियाण्यांची विक्री, पेरणीचा कालावधी निश्‍चित करून दिला होता. मात्र, त्यानंतरही पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर बोंड अळीचे संकट ओढवले आहे. सद्यस्थितीत कापसाची बोंडे पक्व होण्याच्या अवस्थेत आहेत, तर काही ठिकाणी वेचणी सुरू झालेली आहे. गुलाबी बोंड अळीची दुसऱ्या पिढीपर्यंत नियंत्रण करण्यात यशस्वी झाले, तरी अळ्यांची संख्या ही आर्थिक नुकसान परिस्थितीच्याही वर गेलेली आहे. नरखेड तालुक्‍यांत बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. काही भागांत २५ ते ३५ टक्के, तर काही ठिकाणी त्यापेक्षा जास्त प्रादुर्भाव असल्याची शक्‍यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. याशिवाय, ऑक्‍टोबर महिन्यात आलेल्या पावसाने कपाशीवर बोंडसळ दिसून येत आहे.

अधिक वाचाः प्रशासनाच्या अजब सर्वेक्षणाचा गजब अहवाल; शेतकऱ्यांच्या चिंतेत भर आणि पडला नवीन प्रश्न

उपाय म्हणून हे करावे...
बोंड अळीच्या नियंत्रणासाठी एकरी किमान दोन कामगंध सापळे लावावेत. कामगंध सापळ्याची वितरण कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. एकरी २० बोंड टिचवून त्यामधील कीडक बोंडे व अळ्यांची संख्या मोजावी. अळी बोंडमध्ये जाण्यापूर्वीच उपाययोजना कराव्यात. सुरुवातीच्या अवस्थेत निंबोळी अर्काची फवारणी केली तरी नुकसान टाळता येते. प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून ट्रायझोफॉस ३५ टक्के, डेल्हामेथ्रीन एक टक्के, क्‍लोरॅट्रानिलीप्रोल ९.३ टक्के, लॅब्डासाहॅलोथ्रीन ४.६ टक्के, क्‍लोरपपायरीफॉस ५० टक्के, सायपरमेथ्रीन पाच टक्के, किंवा इंडोक्‍झाकार्ब १४.५ टक्के प्रतिदहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
-डॉ. योगीराज जुमडे
तालुका कृषी अधिकारी, नरखेड

संपादनःविजयकुमार राऊत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com