समता प्रतिष्ठान मुंबईला हलवता-हलवता आली बंद करण्याची वेळ!, ९० टक्के कर्मचारी कपातीच्या सूचना

Movements to close Samata Pratishthan
Movements to close Samata Pratishthan

नागपूर : सरकार बदलताच अनेक कायदे बदलण्यात आले. यामुळे योजना, उपक्रमांना फटका बसला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानलाही याची झळ बसल्याचे दिसते. प्रतिष्ठानचे मुख्यालय मुंबईला हलविण्याच्या प्रयत्नानंतर आता ते बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. गेल्या वर्षभरापासून या विभागाला निधीच देण्यात आला नाही. दुसरीकडे, निधी नसल्याचे कारण पुढे करीत ९० टक्के कर्मचारी कपातीच्या सूचना देण्यात आल्या.

डॉ. आंबेडकर फाउंडेशन दिल्लीच्या धर्तीवर १० जुलै २०१७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनची स्थापना करण्यात आली होती. दुर्बल घटकातील पात्र विद्यार्थ्यांना जागतिक विद्यापीठे व संशोधन संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी स्कॉलरशिप प्रदान करणे, आंबेडकरी साहित्याचे प्रकाशन व वितरण, शिक्षण केंद्र, ग्रंथालये, राज्यात विविध स्पर्धात्मक परीक्षा, संशोधन संस्था सुरू करणे, संविधान जागृती अभियान राबविणे, मार्गदर्शन केंद्र सुरू करणे, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन आणि महामानवांच्या विचारांचा प्रचार-प्रसार हे या प्रतिष्ठानचे मुख्य उद्दिष्ट आहे.

गेल्या वर्षीपर्यंत समता प्रतिष्ठानअंतर्गत मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम पार पडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रम राबविण्यात आले. विदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निवासी प्रशिक्षण, संविधान जनजागृती, मूकनायक पुरस्कार आदी कार्यक्रम राबविण्यात आले.

परंतु, राज्यातील सरकार बदलताच समता प्रतिष्ठानला अवकळा आली. गेल्या वर्षभरात कार्यक्रमासाठी एकही रुपयाचा निधी देण्यात आला नाही. प्रतिष्ठानकडून विविध ऑनलाइन उपक्रम राबविण्यात आलेत. कोरोनाच्या संकटाचे कारण पुढे करून निधी नाकारण्यात आला असला तरी नवीन सरकार आल्यापासूनचीच ही स्थिती आहे.

कर्मचाऱ्यांमध्ये भीती

समता प्रतिष्ठानचे मुख्यालय नागपूर असून, येथे जवळपास ११ कर्मचारी आहेत. याचा विस्तार करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळाची मागणी होती. बार्टीचे व्यवस्थापक यांनी निधीचे कारण पुढे करीत १ ते २ कर्मचारीच ठेवण्याच्या सूचना केल्यात. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com