‘ग्रॅण्डमास्टर’नंतर आता २६०० येलो रेटिंग | Nagpur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बुद्धिबळ

नागपूर : ‘ग्रॅण्डमास्टर’ नंतर आता २६०० येलो रेटिंग

नागपूर : अवघ्या २४ दिवसांत तीन नॉर्मस् मिळवून बुद्धिबळातील प्रतिष्ठेचा ग्रॅण्डमास्टर किताब मिळविल्यानंतर नागपूरच्या संकल्प गुप्ताचे यापुढील टार्गेट आता २६०० येलो रेटिंग गुण मिळविणे आहे. २०२२ पर्यंत हे लक्ष्य पूर्ण करण्याची इच्छा संकल्पने व्यक्त केली.

सर्बिया येथे ऐतिहासिक कामगिरी करून बुधवारी नागपुरात परतलेल्या संकल्पने पत्रकारांशी बोलताना स्पर्धेतील अनुभव व भविष्यातील योजनांचा खुलासा केला. संकल्प म्हणाला, स्पर्धेसाठी घराबाहेर पडलो, त्यावेळी ग्रॅण्डमास्टर किताब मिळवायचाच, हे एकच लक्ष्य डोळ्यासमोर होते. सर्बियामध्ये लागोपाठ तीन स्पर्धा खेळायच्या असल्याने मला पूर्ण खात्री होती. सुदैवाने तिन्ही स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी झाल्याने मी स्वप्न पूर्ण करू शकलो.

हेही वाचा: खुशखबर! आता घर आणि दुकानांनाही मिळणार स्टार रेटिंग; करात मिळणार सूट; राज्यात पहिलाच प्रयोग   

भारताचा ७१ वा आणि विदर्भाचा तिसरा ग्रॅण्डमास्टर झाल्याचा मनापासून खूप आनंद आहे. उल्लेखनीय म्हणजे, वडिलांच्या वाढदिवशी हा बहुमान प्राप्त करू शकलो, याचे अधिक समाधान आहे. या ऐतिहासिक उपलब्धीत प्रशिक्षकांसह आईवडिलांचेही तितकेच योगदान असल्याचे संकल्पने सांगितले. भारताचा महान बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदने ट्विट करून शाबासकी देणे, हा माझ्यासाठी तितकाच आनंद व अभिमानाचा क्षण होता. त्यांचे शब्द मला भविष्यात सदैव मोटिव्हेट करेल, असे संकल्प यावेळी म्हणाला.

ग्रॅण्डमास्टर किताबानंतर पुढचे लक्ष्य काय? या प्रश्नाच्या उत्तरात १८ वर्षीय संकल्प म्हणाला, उद्यापासून नियमित प्रॅक्टिस सुरू केल्यानंतर येत्या २६ नोव्हेंबरपासून वर्ल्ड चॅम्पियनशिप आरंभ होत आहे. त्या व त्यानंतर होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करून २६०० येलो रेटिंगपर्यंत पोहोचायचे आहे. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेली प्रचंड स्पर्धा लक्षात घेता, हे लक्ष्य गाठणे सहजशक्य नाही, याची मलाही जाणीव आहे. मात्र प्रत्येक स्पर्धेत चांगले प्रदर्शन केल्यास २०२२ पर्यंत नक्कीच मी आपले लक्ष्य गाठू शकतो. २००८ मध्ये बुद्धिबळाला सुरवात करणाऱ्या संकल्पने कोरोनामुळे ग्रँडमास्टर किताब मिळविण्याला थोडा उशीर लागल्याचे सांगून, बुद्धिबळामुळे शिक्षणातही खूप फायदा झाल्याचे सांगितले.

हेही वाचा: नागपूर : आधी खड्डे नंतर महोत्सव!

यावेळी उपस्थित संकल्पचे वडील संदीप गुप्ता व आई सुमन गुप्ता यांनीही मुलाच्या ऐतिहासिक कामगिरीवर आनंद व्यक्त केला. संकल्पने आतापर्यंतच्या कारकिर्दीत अनेक चढउतार बघितले. मात्र कठोर परिश्रम, बुद्धिबळाप्रती असलेली समर्पणाची भावना आणि अपयशातही नाउमेद होण्याच्या गुणामुळे तो १८ व्या वर्षी बुद्धिबळातील सर्वोच्च बहुमान मिळवू शकल्याचे त्यांनी सांगितले. संयुक्त परिवार असल्याचाही संकल्पला खूप फायदा झाल्याचे ते म्हणाले.

दर्जेदार प्रशिक्षणामुळेच विदर्भाला यश

गेल्या तीन-चार वर्षांमध्ये विदर्भाने देशाला महिला ग्रॅण्डमास्टर दिव्या देशमुखसह चार ग्रँडमास्टर्स दिल्याचे रहस्य विचारले असता संकल्प म्हणाला, यामागे केवळ एकट्या खेळाडूची मेहनत नाही. गुरूंकडून मिळणारे दर्जेदार प्रशिक्षण, नागपुरात होणाऱ्या भरपूर स्पर्धा आणि बुद्धिबळासाठी एकूणच अनुकूल वातावरण, या गोष्टी मिळाल्यामुळेच वैदर्भी खेळाडू हे यश मिळवू शकले. शिवाय सरकारकडून वेळोवेळी मिळणाऱ्या प्रोत्साहनाचादेखील यात मोलाचा वाटा असल्याचे संकल्पने सांगितले.

राज्यपालांकडून अभिनंदन

नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्राला नावलौकिक मिळवून दिल्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी संकल्पचे अभिनंदन केले आहे. संकल्पची कामगिरी राज्यातील क्रीडाप्रेमींसाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगून, कोश्यारी यांनी भविष्यातही तो आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाला नावलौकिक मिळवून देईल, अशी आशा व्यक्त केली.

loading image
go to top