esakal | Nagpur Crime : व्हिडिओ व्हायरल करून व्यापाऱ्याची आत्महत्या; भावंडाविरुद्ध गुन्हा
sakal

बोलून बातमी शोधा

suicide case

व्हिडिओ व्हायरल करून व्यापाऱ्याची आत्महत्या; भावंडाविरुद्ध गुन्हा

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : एका व्यापाऱ्याने दोन भावंडांनी वारंवार मानसिक त्रास दिल्यामुळे आत्महत्या करीत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून आत्महत्या केली. या प्रकरणी व्यापाऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्यामुळे जरीपटका पोलिसांनी दोघा भावांवर गुन्हा दाखल केला आहे. राजेश नामोमल सेतिया (४५) आणि मुलचंद नामोमल सेतिया अशी आरोपींची नावे आहेत. तर मुकेशकुमार हरीचंद्र रिझवानी (४६) असे आत्महत्या केलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे.

हेही वाचा: 'महाराष्ट्र बंद'ला भाजपचा विरोध; जबरदस्तीनं दुकानं बंद केल्यास...

मुकेशकुमार रिझवीनी यांचे जरीपटका येथे सौंदर्य प्रसाधनाचे दुकान आहे. रिझवानी यांनी सेतिया यास त्यांच्या घरातील दोन खोल्या भाड्याने दिल्या होत्या. राजेश हा दरमहा भाडे देत नव्हता. मुकेश यांनी भाडे मागितले असता राजेशने त्यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली होती. १० डिसेंबर २०१९ रोजी मुकेश यांच्या दुकानाचे वीज मिटर जळाले होते.

याप्रकरणी मुकेशने राजेशचा मोठा भाऊ मुलचंद सेतिया याच्याकडे तक्रार केली होती. त्याचप्रमाणे राजेश हा घर रिकामे करीत नाही आणि शिवीगाळ करतो आणि मारण्याची धमकी देतो असे सांगितले होते. मुलचंद हा त्याच्या भावाला समजाविण्याऐवजी राजेश यास मदत करीत होता. सप्टेंबर २०१९ मध्ये राजेशने मुकेश यास घर रिकामे करण्यासाठी दहा लाखांची खंडणी मागितली होती. वेळोवेळी मुकेशने त्यास ६० हजार रुपये दिले होते. उर्वरित साडेचार लाखांसाठी राजेश हा मुकेशचा शारीरिक व मानसिक छळ करीत होता. या छळाला कंटाळून ६ ऑक्टोबर रोजी मुकेशने गळफास लावून आत्महत्या केली.

हेही वाचा: पंतप्रधानपदासाठी शिवसेनेचा ममतांऐवजी राहुल गांधींना पाठींबा?

व्हिडिओ झाला व्हायरल

आत्महत्या करण्यापूर्वी मुकेशने आपला व्हिडिओ तयार केला. त्याचप्रमाणे सुसाईड नोट लिहून ठेवली. या व्हिडिओत सेतीया भावंडामुळे आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख आहे. हा व्हिडिओ वेगाने सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी राजेश आणि मुलचंद सेतिया यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

loading image
go to top