esakal | बापरे बाप! जगात नागपूर आठवा 'हॉट', कारणही तितकेच 'गरम'...
sakal

बोलून बातमी शोधा

बापरे बाप! जगात नागपूर आठवा 'हॉट', कारणही तितकेच 'गरम'...

चुरू येथे 47.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. मित्रीबाह (कुवैत) व नवाबशाह (पाकिस्तान) नंतर चुरू हे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे उष्ण शहर ठरले. तशी नोंद जागतिक तापमानाची नोंद ठेवणाऱ्या "एल डोराडो' या संकेतस्थळावर आहे. मित्रीबाह येथे कमाल तापमान 48.3 अंश सेल्सिअस तर नवाबशाह येथे 48.2 अंश सेल्सिअस नोंदले गेले. जागतिक तापमानात नागपूरचा क्रमांक आठवा राहिला.

बापरे बाप! जगात नागपूर आठवा 'हॉट', कारणही तितकेच 'गरम'...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : वादळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे यावर्षी आतापर्यंत कडक उन्हाळा जाणवलाच नाही. त्यामुळे उन्हाळा जाणवेल की नाही, याबाबत शंका व्यक्‍त केली जात होती. मात्र, आता सूर्यनारायणाने डोके वर काढल्याने उन्हाचे तीव्र चटके जाणवू लागले आहेत. रविवारी तर उन्हाने विदर्भात चांगलाच कहर केला. नागपूरचा पारा चक्‍क 46.7 अंशांवर गेला होता. हवामान विभागाने येथे नोंदविलेले कमाल तापमान विदर्भासह राज्यात सर्वाधिक ठरले. जगातील आठवे उष्ण शहर म्हणून नागपूरची नोंद करण्यात आली, हे विशेष... सोमवारपासून नवतपा सुरू झाला आहे. यामुळे पारा आणखी भडकण्याची दाट शक्‍यता आहे. तसे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. 

हवामान विभागाने रेड अलर्ट दिल्याने विदर्भात तापमानाची तीव्र लाट येईल, अशी शक्‍यता वर्तविली जात होती. ती शक्‍यता खरी ठरली. रविवारी नागपूरचा पाऱ्यात वाढ होऊन तापमान 46.7 अंशांवर गेले. नागपूरकरांसाठी यंदाच्या उन्हाळ्यातील हा सर्वांत उष्ण दिवस ठरला. नागपूरचे तापमान विदर्भासह राज्यात सर्वाधिक ठरले. शिवाय देशातही राजस्थानातील चुरूनंतर नागपूर दुसऱ्या क्रमांकाचे उष्ण शहर म्हणून नोंद करण्यात आली.

हेही वाचा - होम क्वॉरान्टाईनचा शिक्‍का असलेल्या व्यक्‍तीचा रस्त्यावर तडफडून मृत्यू

चुरू येथे 47.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. मित्रीबाह (कुवैत) व नवाबशाह (पाकिस्तान) नंतर चुरू हे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे उष्ण शहर ठरले. तशी नोंद जागतिक तापमानाची नोंद ठेवणाऱ्या "एल डोराडो' या संकेतस्थळावर आहे. मित्रीबाह येथे कमाल तापमान 48.3 अंश सेल्सिअस तर नवाबशाह येथे 48.2 अंश सेल्सिअस नोंदले गेले. जागतिक तापमानात नागपूरचा क्रमांक आठवा राहिला. नागपूरचा सर्वाधिक तापमानाचा विक्रम 47.9 अंश सेल्सिअस इतका आहे, जो 23 मे 2013 रोजी नोंदला गेला होता. 

विदर्भात चंद्रपूर दुसऱ्या क्रमांकावर

नागपूरखालोखाल तापमानाची नोंद चंद्रपूर (46.6 अंश सेल्सिअस) येथे करण्यात आली. याशिवाय अकोला येथे 46.1 अंश सेल्सिअस, गोंदिया येथे 46.0 अंश सेल्सिअस, वर्धा येथे 45.8 अंश सेल्सिअस, यवतमाळ येथे 45.7 अंश सेल्सिअस व अमरावती येथे पारा 45.6 अंशांवर गेला.

अधिक माहितीसाठी - अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना मृत महिलेने केली हालचाल, अन्‌ पुढे....

नवतपा सुरू

उन्हाच्या चटक्‍यांसाठी प्रसिद्ध असलेला नवतपा सोमवारपासून सुरू झाल्यामुळे तापमान आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. हवामान विभागाने सोमवारी नागपूर व अकोला येथे ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. ऊन व उकाड्यामुळे नागपूरकर चांगलेच घामाघूम झाले. उन्हाच्या झळा रात्री उशिरापर्यंत जाणवत होत्या. 

loading image