esakal | नागपूर : दिव्यांग राष्ट्रीय खेळाडूची फरफट
sakal

बोलून बातमी शोधा

nagpur

नागपूर : दिव्यांग राष्ट्रीय खेळाडूची फरफट

sakal_logo
By
नरेंद्र चोरे

नागपूर : राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर पन्नासपेक्षा जास्त पदके जिंकणारा नागपूरच्या दिव्यांग खेळाडूवर उदरनिर्वाहासाठी आधार केंद्र चालविण्याची वेळ आली आहे. विपिन विटणकर असे या खेळाडूचे नाव आहे. त्याला महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठित एकलव्य पुरस्कारही मिळाला आहे. खेळाडूंसाठी असलेल्या कोट्यातून नोकरी मिळावी यासाठी त्याने शासनाचे उंबरठे झिजविले पण काहीच उपयोग झाला नाही.

सेरेब्रल पालसी या आजाराने ग्रस्त राष्ट्रीय दिव्यांग खेळाडू ३५ वर्षीय विपिन विटणकरने ॲथलेटिक्स, पॉवरलिफ्टिंग, तलवारबाजी आणि टेबलटेनिस या चार खेळांची मैदाने गाजविली आहेत. ॲथलेटिक्स व पॉवरलिफ्टिंगमध्ये त्याने राष्ट्रीय पातळीवर पदके जिंकली तर तलवारबाजी व टेबलटेनिसमध्ये राज्य स्तरापर्यंत मजल मारली.

हेही वाचा: डॉ. दिलीप मालखेडेंची अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती

विपिननं या चारही खेळांमध्ये आतापर्यंत पन्नासच्या वर पदके जिंकली आहेत. या चमकदार कामगिरीच्या आधारावर राज्य शासनाने २०१७ मध्ये त्याला एकलव्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित केले. पुण्यात झालेल्या समारंभात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विपिनला ट्रॉफी देण्यात आली.

उमेदीचा काळ खेळासाठी देऊनही पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या विपिनला नोकरी मिळाली नाही. नागपुरातील संदीप गवई, अभिषेक ठवरे, दिनेश यादव व अन्य दिव्यांग खेळाडूंची अवस्था पाहून त्याने नोकरीसाठी प्रयत्नच केला नाही.

हेही वाचा: चंद्रपूर : आदीलाबाद-गडचांदूर राष्ट्रीय महामार्ग चार तास बंद

अर्ज व शासनदरबारी वारंवार चकरा मारूनही नोकऱ्या मिळत नसल्याचे माहीत झाल्यावर विपिनने खेळाला कायमचा रामराम ठोकून उदरनिर्वाहासाठी महालमध्ये स्वतःचे आधार केंद्र सुरू केले. केंद्रातून जेमतेम कमाई होत असली तरी सन्मानाने आयुष्य जगत असल्याचे समाधान त्याला आहे. विपिनच्या परिवारात आई व दोन भाऊ आहेत.

मी सहा ते सात वर्षे विविध खेळ खेळलो. नागपूर व महाराष्ट्रासाठी अनेक पदके जिंकली. मात्र, या कामगिरीनंतरही नोकरी लागण्याची कसलीही चिन्हे दिसत नसल्याने नाइलाजाने मला आधार केंद्र सुरू करावे लागले. मुळात दिव्यांगांबद्दल राज्य शासनाचे धोरणच उदासीन आहे. त्यामुळेच इच्छा व गुणवत्ता असूनही खेळाडू खेळात करिअर करण्यास मागेपुढे पाहत आहेत.

- विपिन विटणकर, राष्ट्रीय दिव्यांग खेळाडू

loading image
go to top