Nagpur : सुटा बुटात आला अन् भेटवस्तूंची चोरी करून गेला Nagpur theft Suta came boot and stole gifts | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

chori

Nagpur : सुटा बुटात आला अन् भेटवस्तूंची चोरी करून गेला

नागपूर : लग्न समारंभात सूट-बुटात येऊन वर-वधूच्या भेटवस्तूच पळविणारे चोरटे उपराजधानीत सक्रिय झाले आहेत. हे चोरटे स्वत:ला वर-वधूचे नातेवाईक भासवतात. नुकतेच १९ मार्चला उमरेड रोडवरील कान्हा सेलिब्रेशन लॉनमध्ये सुटाबुटातील चोरट्याने सुमारे दीड ते दोन लाखांचा मुद्देमाल लंपास केला.

पोलिसांच्या माहितीनुसार माजी सैनिक व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वरिष्ठ लिपिक लक्ष्मण उराडे यांचा मुलगा मृणाल उराडे याचे लग्न झाले. स्वागत समारंभ १९ मार्चला सायंकाळी उमरेड रोडवरील कान्हा सेलिब्रेशन लॉनमध्ये होते.

समारंभात मेडिकलच्या अधिष्ठात्यांपासून वैद्यकीय व इतर क्षेत्रातील अधिकारी व नातेवाइकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. दरम्यान रात्री १० ते १०.३० पर्यंत पाहुण्यांनी वर- वधूला सुमारे २५० ते ३०० लिफाफ्यात रोखीने तर काहींनी विविध भेटवस्तू दिल्या. या सगळ्या वस्तू एका पिशवीत वराच्या खोलीत ठेवण्यात आल्या.

दरम्यान ही पिशवी सांभाळणारी लक्ष्मण उराडे यांची पुतणी आयुषीजवळ एक नातेवाईक आला. त्यांच्याशी आयुषी दोन मिनिटे बोलत असतानाच एक आकाशी रंगाचा जॅकेट घातलेल्या तरुणाने शिताफीने बॅग घेऊन बाहेरचा रस्ता धरला.

थोड्याच वेळात आयुषीच्या निदर्शनात बॅग जागेवर नसल्याचे पुढे आले. त्यापूर्वीच हा तरुण वर- वधूचा नातेवाईक असल्याचे सांगत चारचाकी वाहनात बसून तेथून पसार झाला. हा सर्व प्रकार एका कॅमेरात कैद झाला. याप्रकरणी पोलिस तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपाचा शोध सुरू आहे.