Nagpur BJP : नागपूरमध्ये भाजपच्या कार्यक्रमात दोन महिलांचा मृत्यू; अनेकजण जखमी झाल्याची माहिती, वडेट्टीवार म्हणाले...

भाजप व महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने आयोजित ‘किचनकिट’ वाटप कार्यक्रमात सुरेश भट सभागृहाच्या प्रवेशद्वारावर झालेल्या चेंगराचेंगरीत ६३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. याशिवाय किमान दहा महिला जखमी झाल्या...
Nagpur BJP
Nagpur BJP esakal

नागपूरः भाजप व महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने आयोजित ‘किचनकिट’ वाटप कार्यक्रमात सुरेश भट सभागृहाच्या प्रवेशद्वारावर झालेल्या चेंगराचेंगरीत ६३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. याशिवाय किमान दहा महिला जखमी झाल्या. ही घटना शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. कार्यक्रमात १० ते १२ हजार महिला कामगार उपस्थित होत्या. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या घटनेत आणखी एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

या घटनेत मरण पावलेल्या महिलेचे नाव मनुबाई राजपूत (वय ६३) असे असून ती हातमजुरीचे काम करायची. कामगार महिलांना लाभ देण्याच्या उद्देशाने आठ मार्च ते ११ मार्चदरम्यान ‘किचनकिट’ वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानुसार शुक्रवारी (ता.८) पहाटे पाचपासून सभागृहात कामगार महिलांनी गर्दी केली होती.

Nagpur BJP
Pakistan President : पाकिस्तानच्या अध्‍यक्षपदी असिफ अली झरदारी; दुसऱ्यांदा स्वीकारला पदभार

कामगार कल्याणकारी मंडळाचे सहायक आयुक्त राजदीप धुर्वे यांच्यासह सर्व अधिकारीही यावेळी उपस्थित होते. सुरुवातीला सभागृहात तीन ते साडेतीन हजार महिलांना बोलावून घेण्यात आले. मात्र, बाहेर अंदाजे दहा हजार महिलांनी रांगा लावल्या होत्या. मंडळाद्वारे सर्व्हर डाऊन झाल्याचे सांगून महिलांना परत पाठवण्यात येत होते. किचनकिट मिळत नसल्याने महिलांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावेळी काही महिलांनी चक्क गेट बंद केल्यावरही त्यावरून सभागृहात जाण्याचा प्रयत्न केला.

शनिवारी सकाळीही महिलांनी अशीच गर्दी केली. अंदाजे १२ हजार महिला कामगार सुरेश भट सभागृहाच्या बाहेरील परिसरात किचनकिट मिळेल या आशेने उपस्थित होत्या. याशिवाय आतमध्येही त्यांनी रांगा लावल्या होत्या. मात्र, ढिसाळ नियोजनामुळे सभागृहात गोंधळ उडाला. याशिवाय सभागृहात पाणी आणि पंख्याची व्यवस्था नसल्याने गुदमरायला लागल्याने महिलांनी बाहेर येण्याचा प्रयत्न सुरू केला.

यावेळी मुख्य द्वाराजवळ गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊन चेंगराचेंगरीस सुरुवात झाली. त्यात मनुबाई राजपूर ही महिला खाली पडून बेशुध्द झाली. उपचालास नेल्यानंतर तिला मृत घोषित करण्यात आले. याशिवाय दहा ते पंधरा जणांना गंभीर दुखापत झाली. ही घटना कळताच, महिलांनी रोष व्यक्त केला आणि घोषणाबाजी केली.

Nagpur BJP
Yogi Adityanath : ''धार्मिक व्यक्ती सत्तेत असेल तर चांगले परिणाम दिसून येतात'', न्यायाधीशांकडून योगी आदित्यनाथांचं कौतुक

मृत्यूला जबाबदार कोण?- विजय वडेट्टीवार

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महिलांच्या मृत्यूनंतर भाजपला धारेवर धरलं आहे. सोशल मीडियात पोस्ट करत वडेट्टीवार म्हणाले की, भाजपच्या नागपूर येथील कार्यक्रमात चेंगराचेंगरीत झालेल्या मृत्यूला कोण जबाबदार ? नागपूर शहरात कामगारांना किचनकिट वाटपाचा कार्यक्रम भाजपने आज आयोजित केला होता. या कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीत दोन महिलांचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींचा आकडा सुद्धा मोठा असल्याची माहिती मिळाली आहे.

वडेट्टीवार पुढे म्हणतात, राज्यातील भाजप नेत्यांनी झालेल्या दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारून मृताच्या कुटुंबाला २५ लाख आणि जखमींना प्रत्येकी १० लाखाची मदत पक्षाकडून द्यावे ही आमची मागणी आहे. मागील वर्षी महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात निष्पाप लोकांचा जीव गेला होता. त्या दुर्घटनेची जबाबदारी सत्ताधाऱ्यांनी घेतली नाही. आज पुन्हा तशीच घटना घडली. निवडणुकीच्या तोंडावर कामगारांच्या हक्काच्या शासकीय पैशांनी पक्षाच्या कार्यक्रमात त्यांना भांडी वाटप करून प्रसिध्दी मिळवण्याच्या नादात भाजप निष्पाप लोकांचा जीव घेणार का? याला जबाबदार कोण? दोषींवर कारवाई होणार ? की फक्त आकस्मिक मृत्यूची नोंद म्हणून फाईल बंद करणार ? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com