महाविकास आघाडीत बिघाडी; काँग्रेसने उमेदवार दिल्यावरही राष्ट्रवादीची पदवीधर निवडणुकीत उडी

ncp candidate contest election in nagpur graduate constituency election
ncp candidate contest election in nagpur graduate constituency election

नागपूर : ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसने पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतल्याने महाआघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आम्ही काय काँग्रेसच्या सतरंज्याच उचलायच्या का, असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादीच्या शहर कार्यकारिणीने ठराव करून निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले. 

गुरुवारी दुपारी दोन वाजता राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येईल. एकूण चार उमेदवारांनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली. अंतिम उमेदवार उद्याच ठरवण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अनिल अहीरकर यांनी सांगितले. अमरावती विभगातील शिक्षक मतदारसंघांत शिवसेनेच्या विरोधात काँग्रेसने उमेदवार दिल्याने नागपूरमध्ये दबावतंत्राचा वापर केला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र, यामुळे काँग्रेसचे उमेदवार अभिजित वंजारी यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. 

आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक झाली. शहराध्यक्ष अनिल अहीरकर यांच्याशी संपर्क साधला असता आम्हाला विधानसभेत उमेदवारी दिली जात नाही. सहापैकी एक जागाही सोडण्यास नकार दिला जातो. महापालिकेत आठ-दहा वॉर्डाचे तुकडे फेकले जातात. त्यासाठी शेवटच्या दिवसापर्यंत झुलवत ठेवले जाते. मागील विधानसभेच्या निवडणुकीत सहापैकी एक जागा देण्याची मागणी केली होती. सुरुवातीला काँग्रेसतर्फे होकार देण्यात आला होता. मात्र, शेवटपर्यंत दिली नाही. असेच सुरू राहिले तर राष्ट्रवादीची घड्याळ चालणार कशी, पक्ष मोठा कसा होणार असा सवाल अहीरकर यांनी उपस्थित केला. राज्यपातळीवर अद्याप महाविकास आघाडीने एकमेकांच्या विरोधात उमेदवार उभा करायचा नाही, असा धोरणात्मक निर्णय घेतला नाही. वरिष्ठांकडून विचारण झाल्यास आपण उत्तर देऊ असे अहीरकर म्हणाले. 

घाबरता कशाला -
काँग्रेस विदर्भात राष्ट्रवादीला दुय्यम स्थान देते. निवडणुकीत साधी विचारणाही करत नाही. तुमची ताकदच काय, असे उत्तर दिले जाते. साधा सन्मानसुद्धा दिला जात नाही. विदर्भात आमची ताकदच नसेल, असे काँग्रेसला वाटत असेल तर आम्हाला लढू द्या. घाबरण्याचे कारण नाही. निवडणुकीच्या निमित्ताने किमान चार घरांमध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जातील, घड्याळ चिन्ह पोहोचेल. कोणाला पाडणे आणि विरोधकांना मदत करणे आमचा उद्देश नाही. आम्हाला आमची ताकद आजमावयाची असल्याचे अनिल अहीरकर यांनी सांगितले. 

संपादन - भाग्यश्री राऊत
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com